इतिहास साक्षी आहे..! १३ वे शतक : विजयनगर साम्राज्य विरुद्ध बहमनी सल्तनत आणि त्या काळातील गोव्याचे सामरीक महत्व

ऋषभ | प्रतिनिधी
- दिल्लीच्या सल्तनतीच्या पतनाने दक्षिण भारतात गुलबर्गा आणि विजयनगर साम्राज्य या दोन बलाढ्य राज्यांना जन्म दिला.
- बहमनी हे मुस्लिम शासक होते, तर विजयनगरचे राज्यकर्ते हिंदू होते .
- बहमनी राज्याची स्थापना जफर खान (हसन) याने केली ज्याने अलाउद्दीन बहमन शाह ही पदवी घेतली . त्याने गुलबर्गाची राजधानी म्हणून निवड केली आणि त्याचे नाव एहसानाबाद ठेवले
- बहमनी सल्तनतीत एकूण अठरा सुलतान होते आणि त्यांनी 1327 ते 1527 पर्यंत राज्य केले.

चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धात १३२३ साली हसन नावाच्या व्यापाऱ्याने सांदापूर येथे मशीद उभारली पण नंतर त्याला शहर सोडावे लागले. हसन आणि त्याचे कुटुंब दक्षिणेकडे समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या होनावर येथे स्थलांतरित झाले आणि 1343 मध्ये इब्न बतुताच्या भेटीपर्यंत त्याचा मुलगा जमाल उद-दीन होनावरचा सुलतान म्हणून ओळखला गेला. तो एक शक्तिशाली स्थानिक राजपुत्र होता, जो कमीत कमी 6,000 सैन्य तसेच अभूतपूर्व नौदलाचा नायक होता. त्याला विजयनगरच्या नवनिर्मित हिंदू साम्राज्याला मानवंदना देणे म्हणजे आपल्या धार्मिक आणि राजकीय विचारसणीशी फारकत घेणारे वाटले, त्याचा याच मानसिकतेने गोव्याच्या पुढील ४५० वर्षां च्या भविष्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

आता गोव्यासाठी विशेष महत्त्वाच्या असलेल्या दोन घटना म्हणजे मुस्लिम बहमनी राज्याची निर्मिती आणि विजयनगरचे हिंदू साम्राज्य. विजयनगर साम्राज्याची स्थापना 1336 मध्ये झाली असली तरी त्याचा लगेच कदंब राज्याशी संबंध आला नाही. होनावरने गोवा काबीज केला तेव्हा मध्यवर्ती शहरातून एका उपनगरात स्थायिक झालेल्या दहा हजार हिंदू रहिवाशांना सहज हलवण्यात आले.

आधीच नमूद केल्याप्रमाणे 1343 मध्ये होनावरच्या सुलतानाने विजयनगरच्या राजाला मानवंदना वाहणे हे राजकीय आणि धार्मिक सिद्धांताच्या विपरीत मानले होते, त्यामुळे या टप्प्यावर एक प्रकारचा अधिराज्य मान्य केले गेले होते , परंतु 1358 पर्यंत कोकणातील मोठ्या भागाने निश्चितपणे बहमनी सुलतानाचे अधिपत्य हे मान्य केले गेले . माधवराय हे एक महान वैदिक विद्वान देखील होते आणि बहमनी राज्यामुळे खंडित झालेल्या हिंदू परंपरांची पुनर्स्थापना करण्याची त्यांची महत्वकांक्षा होती आणि त्यांनी धर्मरक्षक ही उपाधी घेऊन अनेक धार्मिक कार्ये मार्गी लावली.

आताचे डीचोली (पूर्वीचे दिपकविशाया किंवा भतग्राम) मधील नार्वे येथील कदंब राजांनी बांधलेल्या सप्तकोटेश्वराच्या मंदिराची पुनर्बांधणी आणि बहमनी काळात लपवलेल्या शिवलिंगाची पुनर्स्थापना ही त्यांच्या प्रमुख कृतींपैकी एक होती. त्यानीच आपल्या पुढील मोहिमेत नारव्यात येऊन कदंब साम्राज्याबरोबरच गोव्यातून लोप पावलेल्या जैन संस्कृतीच्या खुणा जपण्याचे प्रयत्न करीत २३ वे जैन तीर्थंकर सुपार्श्वनाथाची तुटलेली शिल्पे जी गोव्यातील कदंब शासक शिवचित्त पेरमडी देव यांच्या काळातील होती त्यांची पुनः पुनर्स्थापना केली.

या वेळी विजयनगर साम्राज्याच्या अंतर्गत असलेल्या “पाहजनि खळ्ळी”तल्या (आताचे पणजी शहर ) मांडवी नदीचे महत्व हे ” रायबंदर” या गावावरून दिसून येते जे नदीवरील नैसर्गिक बंदराच्या तुलनेत डोंगरावरील एक छोटेसे शहर आहे. खरेतर या नावाचा अर्थ रायांचे बंदर असा आहे आणि हा विजयनगरच्या राजांचा संदर्भ आहे.

या संपूर्ण कालावधीत विजयनगर आणि बहमनी राज्यांमध्ये युद्धे चालू राहिली आणि दोन्ही बाजू समान रीतीने संतुलित होत्या. यामध्ये स्वाभाविकपणे गोव्याने विजयनगर साम्राज्यासाठी, विशेषतः आखातातून घोड्यांच्या आयातीसाठी मुख्य बंदरांपैकी एक म्हणून काम केले. यातील काही घोडे बहमनींना विकले जात होते. १४६९ मध्ये विजयनगरचा तत्कालीन राजा विरूपाक्षराय दुसरा याने “संपूर्ण हिंदू राष्ट्र” या संकल्पनेने भारले जाऊन कोकणातील मुस्लिमांच्या विरोधात एकच अविचारी पद्धतीने युद्ध पुकारले.

आणि 1469 मध्ये विरूपाक्षने संतप्त होऊन, होनावरमधील आपल्या जालदाराला जास्तीत जास्त मुस्लिमांना मारण्याचा आदेश दिला आणि बाकीच्यांना हाकलून लावले, त्यानंतर झालेल्या कत्तलीमध्ये सुमारे दहा हजार लोक होते असे म्हणतात. काहीनी प्राण गमावले. बाकीचे वाचलेले पळून गोव्यात स्थायिक झाले. यामुळे बहमनी , पालटवार करण्यासाठी जे निमित्त शोधत होते ते त्यांना मिळाले. पुढे अनेक घनघोर युद्धे झाली व यात दोहोंची न भूतो न भविष्यती अशी हानी झाली. राजा विरूपाक्षराय दुसरा याने १४६५-१४८५ पर्यंत राज्य केले. १४८५ मध्ये प्रॉढ राय गादीवर बसतो न बसतो तोच विजयनगरच्याच शाल्व राजवंशाने सिंहासनावर दावा ठोकला, या यादवीत आणि बाकीच्या सगळ्या धामधुमीत विजयनगरचा “संगम राजवंश” लोप पावला.

1425 मध्ये अहमद शाह बहमनीने आपली राजधानी गुलबर्गा येथून बिदर येथे हलवली होती आणि याच दरबारात 1453 मध्ये या काळातील एक अभूतपूर्व व्यक्ती प्रकट झाली, त्याचे नाव महमूद गवान ! हा मूळचा पर्शियाचा व्यापारी होता जो प्रथम रत्नागिरच्या धायबोळ किंवा धाबूल (आताचे रत्नागिरीतील धाबोळ ) मध्ये व्यापार करीत होता आणि नंतर बिदरला गेला जेथे त्याने बहमनीच्या सेवेत प्रवेश केला आणि तेथे त्याच्या अभूतपूर्व प्रतिभेची लवकरच पारख पूर्ण साम्राज्याला झाली. त्याचा उदय झपाट्याने झाला आणि 1461 पर्यंत गवान हा बहमनी सुलतानाच्या च्या तीन सदस्यीय रीजन्सी कौन्सिलचा सदस्य होता आणि 1466 पर्यंत “वकील-उल-सुलतनत” (राज्याचा नायब) ही पदवी असलेला मुख्यमंत्री होता. 1481 मध्ये त्याचा मृत्यू होईपर्यंत तो सर्वोच्च अधिकारी होता. या काळात त्याने संपूर्ण मुंबई-कर्नाटक बहमनी सत्तेखाली आणले, आणि कोकण देखील आपल्या अधीन केले व गोवा बंदर ताब्यात घेतले ज्याचे वर्णन स्वतः गवान याने केले.

१४८५ मध्ये राजा विरूपाक्षराय दुसरा यांच्या सोबत जसा “संगम-वंश” लोप पावला त्याच पध्दतीने कुशल नेतृत्वाचा अभाव आणि माजलेली यादवी यामुळेच १४९० पर्यंत बहमनी राज्याचे अस्तित्व संपुष्टात आले होते आणि त्याची जागा पाच सुलतानांनी घेतली होती, गोवळकोंडयाची कुतुबशाही, अहमदनगरची निजाम शाही, बिदरची बरीद शाही, बेरारची इमाद शाही आणि विजापूरची ‘आदिल शाही गोवा आणि मुंबापुरी-कोकणचा प्रदेश काबिज करून विजापूरचा शासक युसूफ उल आदिल शाहच्या सत्तेत आला आणि खरं तर गोवा हे त्याच्या राज्याचे दुसरी राजधानी आणि त्याच्या मुकुटातील सर्वात तेजस्वी रत्न मानले जात असे.

एव्हाना पोर्तुगीज किनारपट्टीवर पोहोचले होते. आणि पुढील २-३ दशकात ते स्वतःचे वेगळे अस्तित्व स्थापित करणार होते. पोर्तुगीजांच्या महत्वकांक्षेची बीजे रुजून त्यास पालवी फुटलेली होती.

संदर्भ : The Vijayanagar Empire: Chronicles of Paes