असहाय्य, निराश, हताश…

करोना विरोधी लढ्यातील योद्ध्यांची प्रचंड परवड

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : करोना महामारी म्हणजे जणू युद्धच. युद्धाच्या वेळी सैनिकाने रणभूमीवर लढायचे असते. डॉक्टर, नर्सेस, निमवैद्यकीय कर्मचारी तसेच आरोग्य, प्रशासकीय (मोजकेच), नगरपालिका स्वच्छता कर्मचारी आणि करोनाच्या या लढ्यातील सर्वच लढवय्ये गेले पाच महिने अविश्रांतपणे काम करीत आहेत. या योद्ध्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. ते असहाय्य, निराश, हताश बनले आहेत. या योद्ध्यांना पर्यायी कुमक तयार करून त्यांना विश्रांती देण्यासाठी सरकारकडे योजना नाही. या योध्यांची प्रचंड परवडच सुरू आहे.

गेल्या मार्चपासून रजा बंद. पगारवाढीचा अद्याप पत्ताच नाही किंबहुना अनेक कंत्राटी कर्मचारी विनापगार काम करीत आहेत. करोना योद्ध्यांचा ५० लाखांचा विमा उतरवला म्हणतात, पण त्याबाबत कुणी साधी कागदावर सही घेतलेली नाही. करोना लढ्यातील सरकारी करोना योद्ध्यांच्या या अनुभव कथनांतून भीषण वास्तवाचे भयावह रूप बाहेर येऊ लागले आहे.

सेवा काळातील अडचणी, प्रश्न, समस्या यांना कुणीही वाली नाही. नोकरी हवी तर काम करा ही प्रवृत्ती. करोना योद्ध्यांच्या घरीही वयोवृद्ध माणसे आणि लहान मुले आहेत त्याचाही प्रशासनाला विसर पडला आहे. वैद्यकीय कर्मचारी, पोलिस, प्रशासकीय अधिकारी इत्यादी कित्येक करोना पॉझिटीव्ह बनले. पण त्यावेळी ह्याच समाजाकडून त्यांना मिळालेली अपमानास्पद वागणूक आणि वरिष्ठांची बेदखल याचे शल्य घेऊन हे योद्धे रणागणांत लढत आहेत. परंतु प्रत्येक गोष्टीला ठरावीक मर्यादा असतेच. या मर्यादांचा बांध फुटायची वेळी आली आहे. तसे घडले तर राज्यात वैद्यकीय आणीबाणी ओढवण्याचा धोका आहे.

लाज वाटते डॉक्टर असल्याची…
डॉक्टर हे केवळ पैशांसाठी काम करतात असा सर्रास आरोप होतो परंतु हे पूर्ण सत्य नाही. एक आदर्श व्यवसाय म्हणून याकडे पाहणारे खूप आहेत. डॉक्टर असूनही तुम्ही एखाद्या रूग्णासाठी काहीच करू शकत नाही. त्यांच्या मदतीला धावू शकत नाही. त्यांना तपासू शकत नाही. इस्पितळात बेड मिळवून देण्यासाठी असहाय्य बनता. एवढेच नव्हे तर कोविडग्रस्त असलेल्या स्वत:च्या कुटुंबातीलच व्यक्तीला डॉक्टर असूनही काहीच सहाय्य करू शकत नसल्याच्या भावनेने डॉक्टरवर्ग निराश बनला आहे. स्वत:ची लाज वाटते,अशी भावना ते व्यक्त करतात. एक डॉक्टर म्हणाले की, आपण तर आपल्या सगळ्या नातेवाईक, मित्र आणि हितचिंतकांना संदेश पाठवून या काळात मी आपल्यासाठी काहीच करू शकणार नाही, तुम्हालाच तुमची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी लागेल, असे स्पष्ट केले आहे.

रात्रंदिन बाधितांचे कॉल्स
घरी अलगीकरण स्विकारलेल्या करोनाबाधितांना तक्रार निवारणासाठी डॉक्टरांचे फोन क्रमांक दिले आहेत. साधारणत: एका डॉक्टरला १२० ते १३० रुग्ण सांभाळावे लागतात. १७ दिवस या रुग्णांना फोनच्या माध्यमातून चोविस तास उपलब्ध असावे लागते. रात्री अपरात्री कधीही रुग्णांचे फोन येतात. मग अचानक तब्येत बिघडली की बाधित १०८ क्रमांकावर फोन करतात. तिथून डॉक्टरांनी सांगायला हवे, असे सांगितले जाते. मग डॉक्टरांना फोन येतो. तोपर्यंत १०८ अन्य बाधितांना घेऊन इस्पितळात गेलेले असतात. हे म्हणता म्हणता बाधितांची भीती वाढते आणि त्यातून अनेकांवर संकट ओढवल्याची परिस्थिती उद्बवते. १०८ रूग्णवाहिकांची संख्या कमी आणि कॉल जास्त अशी परिस्थिती आहे. इस्पितळात खाटा उपलब्ध नाहीत मग रुग्णांना तिथे पाठवण्यात अर्थ काय. खासगी इस्पितळांना २० टक्के खाटा करोना रुग्णांसाठी आरक्षित करण्याची अट आहे. पण हे आरक्षण व्हीआयपींसाठी आधीच आरक्षित झालेले आहे. कितीही पैसा घ्या पण प्राणवायूची सोय असलेली खाट उपलब्ध करा, असे म्हणूनही कुणी दाद देत नाही, अशी परिस्थिती बनली आहे, असे सरकारी डॉक्टरांचे म्हणणे आहे.

पर्यायी कुमक नाही
गोमेकॉत प्री- क्लिनिकल, पॅरा- क्लिनिकल विभागात काम करणारे शेकडो डॉक्टर आहेत. सध्या करोनामुळे शैक्षणिक वर्ग बंद आहेत. अशावेळी या डॉक्टरांना प्रत्यक्ष रणांगणात उतरविण्याची गरज आहे. शेवटच्या वर्षातील डॉक्टरांना करोना लढ्यात उतरवून सरकार काय साध्य करणार, असा सवाल काही डॉक्टरांनी केला. किमान करोना रुग्णाला हाताळण्याचे अल्प प्रशिक्षण देऊन अधिक मनुष्यबळ रुग्णांच्या सेवेत उतरविण्याची गरज आहे. यासाठी खास नियोजन हवे पण त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. वैद्यकीय योद्धेच बाधित होऊ लागले आहेत. त्यांच्या कुटुंबियांनाही संसर्ग होऊ लागला आहे. मग बाधितांच्या सेवेसाठी मनुष्यबळाचा तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारकडे ठोस उपाययोजना आणि कार्यक्रमच नाही,अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

सब कुछ रामभरोसे
करोना लढाईबाबत रणनिती ठरविण्यासाठी सरकारी पातळीवर बैठका होतात. या बैठकांत प्रत्यक्ष करोना लढ्याच्या रणांगणावरील योद्ध्यांची मते जाणून घेतली जात नाहीत. त्यांच्या अडचणी, समस्यांना कुणीच विचारत नाही. सुधारणा घडवून आणण्याबाबत विचार होत नाही. प्रत्यक्ष वास्तवाचे भान न ठेवताच मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. वरिष्ठ अधिकारी मंत्री, मुख्यमंत्र्यांना खूश करण्यात गर्क आणि मंत्री, मुख्यमंत्री या अधिकाऱ्यांच्या जोरावर घोषणांच्या फैरी झाडतात. परंतु वास्तवाची जाणीव आणि वास्तवाशी दोन हात केलेल्यांचा अनुभव कुणीच ऐकून घेत नाही. मंत्री, मुख्यमंत्र्यांनी रणांगणावरील या योद्ध्यांना जरी विचारले आणि वास्तव जाणून घेतले तर कितीतरी प्रश्न आपोआप सुटू शकतील. सध्या करोनाबाधित, कोविड रुग्ण आणि करोना योद्धे सर्वच रामभरोसे आहेत आणि सरकार मात्र भलतीकडेच भरकटते आहे, अशी परिस्थिती बनल्याची खंत करोना योद्धे बोलून दाखवत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!