अश्रुंना फुटले अंकुर….

श्रम - धाम क्रांतीची काणकोणात मुहुर्तमेढ

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः शनिवार दि. 25 फेब्रुवारी 2023 चा दिवस. चावडी- काणकोणातील स्वा.सै. पुंडलिक गायतोंडे मैदान. श्रम-धाम योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या घरांची पायाभरणी आणि एकूणच योजनेचा शुभारंभ यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन. कार्यक्रमाचे यजमान काणकोणचे आमदार आणि गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर. त्यांच्या संकल्पनेतूनच जन्मलेली श्रम-धाम योजना. व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी खासदार आणि अनिवासी भारतीय आयुक्त एड. नरेंद्र सावईकर, माजी आमदार आणि भाजपचे सरचिटणीस दामोदर नाईक, प्रदेश सचिव सर्वानंद भगत, पक्षाचे इतर पदाधिकारी, मतदारसंघातील नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, पंच आणि समोर शेकडोंच्या संख्येने उपस्थित भाजपचे कार्यकर्ते, रमेश तवडकरांचे हीतचिंतक आणि कशाचेही देणेघेणे नाही पण नेमका काय आहे हा कार्यक्रम या उत्सुकतेतून तिथे थांबा घेतलेले काही नागरीक. श्रम- धाम योजनेची माहिती करून देणारा माहितीपट सुरू झाला. काळोखात हुंदक्यांचा आवाज. महिलांनी अक्षरक्षः पदर काढून डोळे पुसायला सुरूवात केलीली. पुरूष चक्क हुंदके देत होते. लोकलज्जेस्तव अश्रुंचा बांध अडवून ठेवलेला पण त्याला कधी खावटे फुटले आणि नकळत अश्रु ओठांवरून खाली विरघळायला लागले ते देखील अनेकांना कळले नाही. काणकोणकरांच्या संवेदनशीलतेचा बांध फुटला होता. त्यातून घळाघळा अश्रु वाहत होते. या ओघळणाऱ्या अश्रुंना हळुवार माणूसकीचा नवा अंकुर फुटला होता. हा अंकुर आता महाकाय रूप घेणार. त्याचा विस्तार राज्यभरात होणार हे आता स्पष्ट जाणवत होतं.

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे…

समर्थ रामदासांनी दिलेल्या या मंत्रातून बोध घेऊन सभापती रमेश तवडकर यांनी श्रम-धाम योजनेचा विडा उचलला. आपल्याला सगळंच काही देशानं, राज्यानं द्यावं काय. आपण समाज म्हणून काहीच देणं लागत नाही. पूर्वी जसं गांवपण जीवंत होतं , एकमेकांना सांभाळलं जात होतं, एकमेकांच्या मदतीला धाव घेतली जात होती. हे सगळं नेमकं का दूरावलं. आजही समाज म्हणून आपण एकमेकांचे अश्रु पुसू शकत नाही का. खरोखरच इतके असंवेदनशील आणि आत्मकेंद्रीत आपण बनलो आहोत आहोत का, असे असंख्य प्रश्न यानिमित्ताने उपस्थित राहीले. एकीकडे आपण विकास, प्रगती, महाशक्तीच्या गोष्टी करतो आहोत पण आपल्या अगदी शेजारी, सभोवताली अजूनही गरीबीत पिंजून, दोन वेळच्या अन्नासाठीही ताटकळणारी आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे डोक्यावर हक्काचं पक्क छप्पर नसलेली कुटुंब राहतात हे जणू आपण विसरलोच. ह्या कुटुंबांची आपल्या विकासात, प्रगतीत आणि प्राथमिक गरजांच्या निकषांतही गणती झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते दिल्लीपर्यंतच्या सरकारी संरचनेत या घटकांची कुठे नेमकी चुकामुक झाली,असा प्रश्न पडावा. सरकारी गणतीत नसल्यामुळे सरकारी योजनांपासून वंचित आणि समाजाची संवेदना भरकटल्यामुळे तिथेही वंचित अशी ही कुटुंबे आदिवासी समाजातून अशाच परिस्थितीचा सामना करत इथपर्यंत आलेल्या रमेश तवडकरांच्या नजरेतून चुकणं तसं कठिणच होतं. ते घायळ झाले. त्यांनी ठरवलं. काहीतरी करायचं. सरकारी मदत घ्यायचीच पण ती न मिळाल्यास अडणार नाही. समाज म्हणून एकत्र येऊन त्यांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर उभं करायचं. पुढील दोन महिन्यात 14 घरांचं उद्दीष्ठ. प्रत्येकाने दानधर्म करायचा. शक्य नसेल तर फक्त एक रूपया दान द्यायचं पण एक दिवस श्रम- दान करायचं. पुढच्या पावसात या कुटुंबांच्या डोक्यावर कायमस्वरूपी हक्काचं, पक्क छप्पर तयार करून देणारचं. बस्स, सभापती तवडकरांनी संकल्पना मांडली आणि कोणकोणकरांनी एकजुटीने त्याला होकार दिला. सहजिकच सभापती तवडकरांचा उत्साह वाढला आणि त्यांनी शेवटी आपल्या बलराम चेरीटेबल ट्र्स्टच्यावतीने ही संकल्पना पुढे नेण्याचा निश्चय केला. अगदी सुक्ष्म निरीक्षण, अभ्यास करून या 14 गरजू कुटुंबांची निवड केलेली. या निवडीवर कुणीही संशयाचे बोट दाखवू शकणार नाही. एवढी अचूनकता आणि त्यातूनच शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते या घरांची पायाभरणी करून या क्रांतीची तुतारी फुंकण्यात आली.

मुख्यमंत्री, तानावडे, सावईकर, दामूंचे कौतुकोद्गार

अंत्योदय तत्वावर काम करणाऱ्या भाजपला श्रम- धाम योजनेचे महत्व अधिक स्पष्टपणे कळले. बिगर सरकारी पातळीवर लोक चळवळीतून अशा प्रकारे ही योजना राबवता येणे शक्य आहे हे सभापती रमेश तवडकर यांनी दाखवून दिले आहे. सहजिकच या लोकचळवळीचे लोण संपूर्ण राज्यभरात पसरणार आहे आणि त्यातून गोंयकारांच्या एका नव्या संवेदनशील अंगाचे आणि पारंपारिक गांवपणाच्या पुर्नप्रतिष्ठापनेचे दर्शन घडणार आहे. काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांचे कौतुक करतानाच त्यांना समर्थ आणि भक्कम साथ दिलेल्या काणकोणकरांचेही यावेळी सर्वांनीच कौतुक करून एक नवा आदर्श काणकोण तालुक्याने गोव्यासमोर ठेवला आहे, असेही गौरवोद्रार काढले.

पंच, नगरसेवक, नागरिक आणि स्वयंपूर्ण मित्र

श्रम-धाम योजनेला काणकोणात उत्स्फुर्त प्रतिसाद | Goan Varta Live | गोवन  वार्ता लाईव्ह | Goa News in Marathi | Latest Goa News Headlines

पंच, नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील अशा कुटुंबांची ओळख पटवून देणे गरजेचे आहे. त्यांची ओळख पटवून दिल्यानंतर त्यांचा प्रश्न समजून घेणे, कागदोपत्री फाईल तयार करणे, स्वयंपूर्ण मित्रांपर्यंत अशा कुटुंबांचे प्रश्न पोहचवणे, आपल्या आमदारांमार्फत हा विषय सरका दरबारी पोहचवणे आणि त्याला न्याय मिळवून देणे अशी साखळीच तयार करावी लागेल. ह्यात संवेदनशील नागरिक म्हणून प्रत्येकाला वाटा घेता येईल. केवळ सरकार, पंच, नगरसेवक आदींकडे बोट दाखवून चालणार नाही. विशेष म्हणजे हे पिडित खुद्द गोंयकार आहेत. आपलेच बंधु- भगिनी आहेत आणि त्यामुळे त्यांचे हे असे जगणे म्हणजे आपल्या प्रगतशील गोव्यासाठी अशोभनीय असेच आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!