CA ते IAS प्रवास करणाऱ्या दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रूचिका कत्याल

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : गोव्याच्या उत्तर गोवा जिल्हाधिकारीपदी निला मोहनन आणि आर.मेनका तर दक्षिण गोवा जिल्हाधिकारीपदी अंजली शेरावत या महिला (आयएएस) अधिकाऱ्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम केलंय. आता रूचिका कत्याल (आएएएस) या नव्या दमाच्या महिला अधिकाऱ्याने नुकताच दक्षिण गोवा जिल्हाधिकारीपदाचा ताबा घेतलाय. सीए ते आयएएस असा अनोखा प्रवास केलेल्या रूचिका कत्याल हीची स्टोरी प्रशासकीय सेवेत उतरण्याची इच्छा बाळगणाऱ्या नव्या पिढीसाठी स्फुर्तीदायक ठरू शकणारी अशीच आहे.
२०१२ मध्ये यूपीएससीने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेत संपूर्ण भारतातून रुचिकाने ५ वा क्रमांक पटकावला होता. रोहतकची रुचिका कत्याल… तिने जे क्षेत्र निवडलं, त्या क्षेत्रात यशोशिखर गाठलं. अभ्यासात तर ती नेहमीच हुशार… शालेय परिक्षेत वर्गातून नेहमी पहिला नंबर… आता नोकरी मिळाली तर गरजवंतांच्या मदतीचं ती माध्यम बनली. त्यांच्या विषयी जेव्हा माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची ओळख अधिक स्पष्ट होत जाते.
नागरी स्थानिक स्वराज्य संस्था सुधारणा पूर्ण करणारे गोवा सहावे राज्य
कौटुंबिक पार्श्वभूमी
रुचिका कत्याल मूळ हरियाणातील रोहतकची आहे. तिचे आईवडील मंजू आणि आर. के. कत्याल सांगतात, दोन मुलींचे आईवडील झाल्यानंतरही त्यांना कधीही मुलाची इच्छा नव्हती. मुलगा हवा असा अट्टाहास असलेला हरयाणवी समाजासाठी मंजूचे आईवडील एक आदर्शच म्हणायला हवेत.
गोव्यातील तीन नद्या पोहून पार करण्याचा Jayant Dubaleचा पराक्रम
शैक्षणिक पार्श्वभूमी
रुचिकाने रोहतकच्या मॉडेल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून (एसआरसीसी) बी.कॉम (पदवी) मिळवली. त्यानंतर तिने सीए पूर्ण केलं आणि देशातील चार्टर्ड अकाउंटन्सी फायनलमध्ये संपूर्ण भारतातून तिने तिसरा क्रमांक पटकावला. त्यानंतर तिने एस.आर.बाटलीबोई अँड कंपनीत तीन वर्षं आर्टिकलशिप केली आणि सीए फायनलदरम्यान तिला सर्वोत्कृष्ट पेपर ऑन मॅनेजमेंट अकाऊंटिंग ऍड फायनान्शियल ऍनालिसिससाठी ‘लेफ्टनंट कर्नल अंबुज नाथ स्मृती पुरस्कार’ही प्रदान करण्यात आला.
ऑपशनल पेपर
रुचिकाने ‘पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऍड कॉमर्स’ हा ऑपशनल पेपर म्हणून निवडला. कॉमर्स हा तिच्या अगोदरच्या अभ्यासाचा विषय असल्यामुळे तिच्यासाठी हा पेपर स्कोअरिंग पेपर ठरला.
रुचिका कात्यालचे प्रयत्न
पहिल्याच प्रयत्नात दिल्लीच्या या युवतीने यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2010 मध्ये 176 वा क्रमांक पटकावला आणि ती आयपीएस अधिकारी झाली. अखेर २०१२ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात संपूर्ण भारतातून ५ वा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न ती पूर्ण करू शकली.
रुचिकाच्या यशाची रणनीती
रुचिकाने बारावीनंतरच सीए अभ्यासक्रम सुरू केला होता. नागरी सेवेच्या तयारीत उडी घेण्यापूर्वी सीए तिला पूर्ण करायचं होतं. शिवाय तिच्या कॉमर्स या ऑपशनल विषयामुळे तिला मदतच झाली. कामाच्या अनुभवामुळे विचारांची परिपक्वता आणि स्पष्टता विकसित होण्यास मदत झाली असल्याचं रुचिका सांगते.
नागरी सेवेत येऊ पाहणाऱ्या तरुण इच्छुकांसाठी रुचिका सांगते….
• मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे.
• आयएएस टॉपर्सच्या मुलाखती ऐका, वाचा आणि त्यापासून प्रेरणा घ्या. मुख्य म्हणजे त्यांच्या सल्ल्यांचं पालन करा.
• अंतिम ध्येय कधीही विसरता कामा नये. कारण तोच प्रेरणेचा स्रोत असतो.
नागरी सेवा हे एक असं व्यासपीठ आहे, जे व्यवस्थेत काम करण्याची आणि त्याचा भाग होण्याची तसंच समाजाच्या जवळ जाण्याची संधी देते. रुचिकाला अशा गोष्टीचा भाग व्हायचं होतं, ज्यामुळे ती समाजात थेट योगदान देऊ शकले. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या समाजाला एक चांगलं ठिकाण बनवण्याची रुचिकाची इच्छा आहे.

रूचिकाने यापूर्वी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीचा हा मराठी अनुवाद याठिकाणी देत आहोत जेणेकरून तिला अधिक समजून घेण्यात मदत होऊ शकेल.
१. आयुष्यातील तुझं लक्ष्य काय आहे.. म्हणजे आधी तू सीए केलंस आणि आता सिव्हिल सर्व्हिस परीक्षा. अजून तुला काय करायचंय??
मला अशा गोष्टीचा भाग व्हायचं होतं, ज्यामुळे मला समाजात थेट योगदान देता येईल. सिव्हिल सर्व्हिस अर्थात नागरी सेवा हे एक असं व्यासपीठ आहे, जे सिस्टमचा भाग होण्याची आणि सिस्टममध्ये राहून काम करण्याची संधी देतं. ही एक नवी सुरुवात आहे, ही सुरुवात मला कुठे घेऊन जाते ते पाहायचंय.
२. नागरी सेवा परीक्षा तू कशी काय जमवलीस? या परीक्षेची तयारी करताना तू नोकरी करत होतीस की फक्त परीक्षेवर लक्ष्य केंद्रित केलंस?? कारण सीए केल्यानंतर कुणी घरी बसणं पसंत करत नाही
सुरुवातीपासूनच मला खूप कमी वेळ मिळाला. त्यामुळे मी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. काम आणि वेळ दोन्ही सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परीक्षेची तयारी करताना मी पूर्णवेळ काम करू शकले नाही.
३. आम्हाला जाणून घ्यायचंय की अभ्यासासाठी तू कोणतं धोरण अवलंबलस?? कारण अशा प्रकारच्या परीक्षांचं नियोजन करणाऱ्या अनेकांना याची नक्कीच मदत होईल.
मी एक एक करून गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. त्यानुसार लक्ष्य निश्चित केलं. केंद्रित दृष्टिकोनामुळे मला लक्ष केंद्रित करण्यास मदत झाली. वेळेचं व्यवस्थापन केल्यानं खूप फायदा झाला.
४. कोणत्याही यशोगाथेमागे वेळेचा योग्य वापर नेहमीच महत्त्वाचा राहिलाय. प्रत्येकाला समान चोवीस तास मिळालेत. तुम्ही त्याचा किती कार्यक्षमतेने उपयोग करता यावर तुमचं यश अवलंबून असतं… हे यश मिळवण्यासाठी तुझा वेळ तू कसा सांभाळलास?
आपला ठाम विश्वास असला पाहिजे की आयुष्यात यश मिळवायचं असेल तर त्याला शॉर्टकट नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण ऊर्जा आणि मेहनत एकाच दिशेने असली पाहिजे. माझ्याकडे मर्यादित वेळ असल्यामुळे नियोजन आणि प्राधान्यक्रम माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता.
५. या संपूर्ण प्रवासात तुझी प्रेरणा कोण आहे? तुझ्या यशाचं श्रेय तू कुणाला देऊ इच्छितेस? माझ्यामते तुझा प्रेरणास्त्रोत केवळ एकच नसावा???
मी आजवर घेतलेल्या कोणत्याही निर्णयात माझे कुटुंबीय आणि मित्रपरिवार नेहमीच माझ्या मागे राहिलेत. आणि यावेळीही तेच होतं. आजचं माझं यश हे केवळ त्यांच्या पाठिंब्याचं फलित आहे.
६. आमच्या वाचकांना जाणून घ्यायला आवडेल की नागरी सेवा परिक्षेच्या तयारीसाठी तू कुठलं कोचिंग घेतलंस??? आणि कोणत्या साहित्याचा संदर्भ घेतलास???
अभ्यासक्रमातील एका भागासाठी मी कोचिंग घेतलं. ज्यामुळे माझ्यात योग्य दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली. तसंच वर्तमानपत्रं, पुस्तकं, सॅम्पल पेपर्स, नियतकालिके, टीव्ही, इंटरनेट इत्यादींचीही खूप मदत झाली.
७. आज असे अनेक लोक आहेत, ज्यांच्यासाठी तू त्यांचा आदर्श बनली आहेस. विशेषतः सर्व चार्टर्ड अकाउंटंट्सना तु्झ्याकडून प्रेरणा मिळालीये. त्यांना तुला काय सांगायला आवडेल?
मी एवढंच सांगने की कठोर परिश्रम ही एकमेव यशाची गुरुकिल्ली आहे. अंतिम ध्येय कधीही विसरता कामा नये. कारण तोच प्रेरणास्त्रोत असतो.
८. तू ठरवलेलं अंतिम ध्येय गाठण्यापासून तुझं लक्ष कधीतरी विचलित झालं का? आधी तू सीए केलंय आणि मग नागरी सेवा.. यावरून हे दिसून येतं की तुझ्या ध्येयाप्रती तू किती दृढनिश्चयी होतीस. या मागचं गुपित काय? कुठल्या गोष्टीमुळे तुझी शिस्त कायम टिकून ठेवणं तुला शक्य झालं??
सीए असल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडल्या नसत्या, तर माझ्या हातात काहीतरी होतं, ज्यातून मी पुढे जाऊ शकले असते. बऱ्याचदा असं झालं की मी परिस्थितीचा विचार करायचे, कारण मी ज्यात उडी घेतली होती तिथे बरीच अनिश्चितता होती. असं होऊ लागलं की मी थोडा ब्रेक घ्यायचे. स्वतःला एखाद्या वेगळ्या गोष्टी गुंतवायचे. ज्यामुळे पुन्हा एकदा मला लक्ष्य केंद्रित करण्यास मदत व्हायची.
९. तुला काय करायला आवडतं… अभ्यास वगळता तुझा आवडता टाइम पास काय आहे?
फावल्या वेळात मला वाचायला आवडतं. तसंच मला मैदानी खेळांची आणि संगीताची खूप आवड आहे.
१०. सीए झाल्यानंतर तू कधी निवांत बसलीस का?? मोठ्या कंपनीत जॉईन होऊन गलेलठ्ठ पगार घेण्याची इच्छा तुला नाही झाली? आयएएस परीक्षेसाठी तयारी करण्याची प्रेरणा तुला कशामुळे मिळाली???
कितीही कठीण असला तरी हा प्रवास खरोखरच आनंददायी होता. सीए इंटर्नशिप असो, कठीण परीक्षा असोत किंवा आणि नागरी सेवा तयारीदरम्यान घेतलेले कठोर परिश्रम असोत. सीए पूर्ण झाल्यानंतर नागरी सेवांच्या तयारीच्या दिशेने उचलेलं पाऊल म्हणजे एक जाणीव होती, समाजाप्रति असलेली जाणीव. कारण मला फार पूर्वीपासून हे करायचे होतं. म्हणून माझं मन जे सांगतं ते करण्याचा निर्णय मी घेतला.
११. तू थेट आयएएस का नाही केलंस, म्हणजे तू आधी सीए आणि नंतर आयएएस का केलंस???
बारावीनंतरच मी सीए सुरू केलं होतं. सिव्हिल्सच्या तयारीत उडी घेण्यापूर्वी मला सीए पूर्ण करायचं होतं. शिवाय कॉमर्स हा माझा ऑपशनल विषय होता. माझ्या कामामुळे मला सिव्हिल्सच्या तयारीत मदतच झाली. कामाच्या अनुभवामुळे विचारांची परिपक्वता आणि स्पष्टता विकसित होण्यास मदत झाली
हेही वाचा –
तुम्ही आहात का पोस्टपार्टम डिप्रेशनचे शिकार?
पाय नसणारी अंजना जेव्हा कुटुंब चालवते