शाळेत एनसीसीचा पर्याय घेतला होता? इथे आहेत संधी

नौदलात विविध क्षेत्रांत बजावू शकता सेवा, संगीतापासून कायद्यापर्यंत कामकाज, जबाबदारी घेण्याची हवी तयारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सध्या भारत (India)- चीन (China) दरम्यानच्या सीमेवर तणाव वाढत आहे. एरव्ही काश्मीरमध्ये अतिरेकी कारवायाच्या बातम्या यायच्या आणि यावेळी जवानासंबंधीच्या बातम्याही प्रसारित व्हायच्या. भारताचा भाग असलेला परिसरात चीनने घुसखोरी केल्याने हा तणाव वाढला आहे. पण, आपले जवान समुद्रसपाटीपासून सोळा- सतरा हजार मीटर उंचीवर असलेल्या या भागात डोळ्यांत तेल घालून रक्षण करीत आहे. 1965 चे पाकिस्तानविरुद्धचे युद्ध आपण पायदळ व हवाई दलाच्या समन्वयामुळे जिंकलो होतो तर 1971 च्या बांगलादेश (Bangladesh) निर्मितीत नौदलाचा सिंहाचा वाटा होता. एकूण तुमच्या लक्षात आले असेल, की शारीरिक तसेच मानसिक शक्तीची या क्षेत्रात कसोटी लागते. भारताने यंदा दाखविलेल्या पवित्र्यामुळे चीनला आता घुसखोरी करतेवेळी दहावेळा विचार करावा लागेल. हे सामर्थ्य आपल्या पराक्रमी जवानांचे आहे. अशा क्षेत्रात तुम्ही जाणार असाल तर शारीरिक आणि मानसिक शक्ती विकसित, तंदुरुस्त कशी राहील, याचा आतापासूनच विचार करावा लागेल.

तांत्रिक शाखेसाठी
नौदलात तांत्रिक शाखेत तुम्ही इच्छुक असाल तर इथे पुरुषांना संधी मिळते. इथे प्रामुख्याने अभियांत्रिकी कामकाज आणि अधिकारीपदाची जबाबदारी तुम्हाला सांभाळावी लागेल. टेली कम्युनिकेशन, एरोनॉटीकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल, प्रॉडक्शन, इंस्ट्र्युमेंटेशन, एव्हियॉनिक्स सारख्या विभागात तुम्हाला संधी मिळू शकते. अविवाहित, वीस ते पंचवीस वयोगटातील युवकांनी या क्षेत्राचा विचार करताना शारीरिक/ वैद्यकीय दर्जा तपासून पहावा. तुमची उंची सें.मी.मध्ये 157 असली पाहिजे. छाती 5 सेंमी फुगविता यावी, दृष्टी निकोप व सुदृढ असली पाहिजे, या प्राथमिक गोष्टींचा प्रथम विचार करावा.
एनएआयसी अधिकारी प्रवेश यामध्ये शस्त्रास्त्रे तपासणीसाठी विशेष अधिकारी नियुक्त जातात. (naval armaament inspection cadre). बीई किंवा एमेस्सी झालेले उमेदवार घेतले जातात. शिक्षण शाखा अधिकारी या उमेदवारांना प्रशिक्षण संस्थांमध्ये अध्यापन करावे लागते. या जागा आवश्यकतेनुसार भरल्या जातात. कायदे शाखा अधिकारी यामध्ये नौसेनेतील तसेच संबंधित कायदेविषयक कामकाज पहाणे, सल्ला देणे आदी कामे करावी लागतात. शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये सात वर्षे हा सेवकाल दहा वर्षांपर्यंत वाढविला जातो. थेट कायमसेवा प्रवेश घेतल्यास नियमानुसार निवृत्तीच्या वयापर्यंत सेवा करायला मिळते. उमेदवाराला कायदा पदवी परीक्षेत 55% गुण मिळाले पाहिजेत.

वाद्यवृंदातही जबाबदारीचे काम
संगीत अधिकारी म्हणूनही इथे तुम्हाला संधी मिळू शकते. नौसेनेच्या वाद्यवृंदाची देखभाल तसेच लष्करी समारंभात नियंत्रण व संचलन यात बँडचे कौशल्य कायम सर्वोच्च पातळीवर ठेवण्याचे जबाबदारीचे काम पहावे लागते. यासाठी तुम्हाला लष्करी वाद्यवृंदातील वाद्य, शिवाय पियानो पाश्चिमात्य संगीत संकेतानुसार वाजविता आले पाहिजे. याशिवाय एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) आणि लॉजिस्टिक्स अधिकारी या पदाच्या उमेदवारांना नियंत्रण उपविभागाचे जबाबदारी व प्रशासकीय शाखेची जबाबदारी या अधिकाऱ्यांना पार पाडावी लागते. एनसीसी (NCC) स्पेशल एंट्री अंतर्गत सामान्य सेवा, नाविक विमान उड्डाण यात संधी मिळते. यासाठी नेव्हल विंगचे सी प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवे.
शालेय कारकिर्दीत एनसीसी घेतली तर ही संधी तुम्हाला मिळू शकते. जागा आवश्यकतेनुसार भरल्या जातात. जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर दिलेल्या सूचनेनुसार अर्ज करावा. अर्थात ही थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर नौदलातील एखाद्या निवृत्त उमेदवाराकडून तसेच उपलब्ध साहित्यातून किंवा संकेतस्थळाला भेट देऊन घेऊ शकता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!