पगाराबाबत आली मोठी बातमी! आता पगाराच्या दिवशी सुट्टी आली तरी नो टेन्शन

आरबीआयने घेतला महत्त्वाचा निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

दिल्ली : नोकरी करणारा प्रत्येक माणून नोकरी करतो, ते पगार वेळेत मिळण्यासाठी. पण अनेकदा पगाराच्या दिवशी येणारे रविवार किंवा सरकारी सुट्ट्या यामुळे पगार एकतर उशिराने होते. त्यामुळे पगाराच्या दिवशीही पगार न झाल्यानं नोकरदार वर्गाच्या हिरमोड होतो. मात्र आता यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात आला आहे. आरबीआयनं घेतलेल्या नव्या निर्णयामुळे आता पगार पगाराच्याच दिवशी होणारे. रविवार येवो किंवा मग सरकारी सुट्टी, पगाराच्याच दिवशी पगार नोकरदार वर्गाला मिळेल, अशी सोय करण्यात आली आहे.

मुळात काय होत होतं?

महिना संपत आला की नोकरदार वर्गाला पगाराचे वेध लागतात. काही कंपन्या अगदी वेळेत पगार बँक खात्यात जमा करतात. मात्र, काही कंपन्या तर अशाही आहेत, की बऱ्याचदा पगार वेळेवर करत नाहीत. त्यातही सुट्टीचा दिवस असेल तर मग पगाराला आणखी उशीर ठरलेला. अशात पगार यायला उशीर झाला की कर्मचाऱ्यांचे बजेट कोलमडलेच म्हणून समजा..

money

सुट्टीची सबब कायमची बंद!

आता मात्र, कर्मचाऱ्यांचे पगाराचे टेन्शन कमी करणारी चांगली बातमी आली आहे. आता सुट्टी आहे म्हणून पगार उशीरा होणार अशी सबब कायमची बंद होणार आहे. कारण, ‘नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस सिस्टिम’ सर्वच दिवस सुरू राहणार आहे, अशी घोषणा आरबीआयने केली आहे. म्हणजेच, आता पगाराच्या दिवशी सुट्टी असली तरी पगार बँक खात्यात जमा होतील. आणि कर्जाचे हप्ते देखील देता येतील.

पतधोरण समितीच्या बैठकीत निर्णय

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर या निर्णयाची माहिती दिली. येत्या १ ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. याआधी खातेदार किंवा नोकरदारांनी ऑटो डेबिट सुरू केल्यानंतर सुद्धा सरकारी सुट्ट्या, बँक हॉलिडे या दिवशी बँका बंद राहत असल्याने ऑटो डेबिट सुद्धा बंदच असायचे. यामुळे पगार खात्यात जमा होत नव्हते. तसेच कर्जाचे हप्ते (bank loan emi) सुद्धा भरता येत नसायचे. ग्राहकांची चूक नसताना, खात्यात पैसे असताना सुद्धा फक्त सुटीचा दिवस होता, म्हणून हप्ता कपात झाला नाही. आणि त्यासाठी अतिरिक्त चार्जेस द्यावे लागले, हा अनुभव अनेकांनी घेतला आहेच. आता मात्र बँकेने ही अडचण दूर केली आहे. कारण, एनएसीएच सुविधा आता सातही दिवस सुरू राहणार आहे.

या निर्णयानंतर आता लोकांचीही जबाबदारी वाढणार आहे. सुटीच्या दिवशी पगार जमा होणार, ठीकच आहे. पण, आता आणखी एक खबरदारी घ्यावी लागणार आहे. सुटीच्या दिवशीच जर गृहकर्जाच हप्ता असेल, पर्सनल लोन किंवा वाहनाच्या कर्जाचा हप्ता असेल, वीज बिल भरायचे असेल तर खात्यात पैसे जमा ठेवावे लागणार आहेत. आज सुटीचा दिवस आहे, हप्ता कट होणार नाही, उद्या बघू या समजात आता राहता येणार नाही. कारण, या निर्णयानुसार सुटीचा दिवस असला तरी या दिवशी कर्जाचे हप्ते असतील तर ते कपात होणार आहेत. या नव्या निर्णयाची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!