या अॅपमधून मिळेल वायुदलातील नोकऱ्यांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः अनेकदा लष्करातील माहिती मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे तेथील संधीची माहितीदेखील सर्वांपर्यंत पोहोचतेच असे नाही. कदाचित या अडचणी लक्षात घेऊन सध्याच्या लॉकडाऊनमुळे म्हणा किंवा सर्वांपर्यंत माहिती पोचावी म्हणून इंडियन एअर फोर्सने अधिकारी आणि एअरमेन या पदासाठी निवडप्रक्रिया अभ्यासक्रम, वेतन, भरती आदींची माहिती या अॅपमधून द्यायचा चांगला प्रयत्न केला आहे. इच्छुक उमेदवारांनी या अॅपचा जरूर लाभ घ्यावा. वायुदलाने तयार केलेले MY IAF नावाचे हे अॅप आपल्याकडे स्मार्टफोन असेल तर गुगल प्ले स्टोअरमधून विनामूल्य डाउनलोड करता येईल. यामध्ये वायुसेनेचा इतिहास आणि बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या गाथाही वाचायला मिळेल. आता बहुतांश युवा मंडळी संकेतस्थळापेक्षा अशा अॅपना जास्त पसंती देतात. नव्या पिढीची नेमकी गरज ओळखून वायुदलाने एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
भारतीय नौदल जगात सातव्या क्रमांकावर
लष्करातील दुसऱ्या प्रमुख अंगाचा आपण विचार करणार आहोत. भारतीय नौदल हे तिन्ही सैन्यांमध्ये वरिष्ठतेत दुसऱ्या क्रमांकाचे तर जगामधील सातव्या क्रमांकाचे मानली जाते. आपल्या देशाला साडेसात हजार किलोमीटर व्यापाचा समुद्र आहे. जमिनीचे संरक्षण करायचे असेल तर समुद्रावर आपले प्रभुत्व हवे अशा आशयाचे बोल पंतप्रधान पं. नेहरूंनी त्यांच्या कारकिर्दीत काढले होते. नौदल केवळ समुद्रावरचे संरक्षण करते असे नाही तर पूर, दुष्काळ, वादळ, भूकंप आदी संकटांतही जनतेच्या मदतीला आलेली आहे. अरबी समुद्राने वेढलेले असल्याने नौदलाचे महत्व अनन्य असे मानले जाते. नौदलात नोकरी तुम्ही तुमचा वेळ फक्त समुद्रातच घालविणार असे नाही, तर ज्या बंदरावर जहाज नांगरलेले असते, तेथील नजीकच्या बंदरावर नौदलाच्या वसाहतीत तुम्ही राहत असता. शिवाय ज्यावेळी तुम्ही जहाजावर असता तेव्हा घरातच वास्तव केल्याचा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. तुमच्या कुटुंबीयांची काळजी तुमच्या गैरहजेरी नौदल जबाबदारीने घेते. नौदल ही उच्चस्तरीय अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सशक्त सेना आहे.
कधी झाली स्थापना?
सतराव्या शतकातील मराठा सम्राट आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. 1934 मध्ये ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या रॉयल इंडियन नेव्ही (Indian Navy) यापासून या दलाची सुरुवात झाली. कारगिलमध्ये वायुदलाने नेत्रदीपक कामगिरी केली होती. 1971 च्या भारत- पाकिस्तान युद्धात नौदलानेही तशीच कामगिरी केल्याने (क्षेपणास्त्र हल्ला) विजयश्री मिळवणे अधिक सोपे झाले. त्यामुळे 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. गोव्यातही वास्कोच्या नौदल तळावर तो उत्साहाने साजरा केला जातो.
नौदलामध्ये दीडशेहून जास्त युद्धनौका आहेत. त्यात अत्याधुनिक युद्धनौकांचाही समावेश आहे. या शाखेच्या हवाई विभागात ध्रुव, चेतक, सीकिंग आदी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. दोनशे मरीन कमांडो आहेत. शिवाय आय. एन. एस. विराट डेली क्लास त्रिशूल, आय एनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत. 1953 मध्ये हवेत मारा करणारी शस्त्रे आणि 1967 मध्ये नौदलाच्या ताफयात पाणबुड्या समाविष्ट झाल्या. विशेष म्हणजे युद्धनौका बांधणीचा प्रकल्प देशातच व्हावा, असे प्रयत्न फार वर्षांपासून केले आहेत. त्यात टेहळणी जहाजापासून विनाशिकेपर्यंत आणि लढाऊ जहाजे, पाणबुडी यासह युद्धनौकांचाही समावेश आहे.