इथे वर्षातून दोन वेळा होते खलाशांची भरती…

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः आपल्या लष्कराच्या ताफ्यात असलेली सामुग्री विदेशी बनावटीची असल्याने आपल्याला परकी देशाशी करार करावे लागत. पण, ही स्थिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने बदलायची ठरविली. स्वदेशी तंत्रज्ञानाला त्यांनी प्रोत्साहन दिले. त्याचा एक भाग म्हणजे ओडिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर मागच्या सप्ताहात स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी. असे करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. ज्याचा आपल्याला पुढच्या काळात क्षेपणास्र विकसित करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा नक्कीच उपयोग होईल. डीआरडीओ हि संस्था प्रामुख्याने संरक्षण क्षेत्राशी स्वविकसित उत्पादने निर्माण करते. गोव्यात या संस्थेने आपल्या कार्याची ओळख करणारा कार्यक्रमही मागे आयोजित केला होता. आता आपण नौदलातील करियरविषयी अधिक माहिती घेणार आहोत.
पाणबुड्या, युद्धनौकांची माहिती आवश्यक
4 डिसेंबरला आपण नौदल दिन दरवर्षीप्रमाणे साजरा करत आहोत. इच्छुक उमेदवाराला या प्राथमिक गोष्टी माहीत असायला हव्यात. याशिवाय विमानवाहक विक्रमादित्य, विराट, अणु इंधनावरच्या अरिहंत सारख्या पाणबुड्या, उभयचर युद्धनौका, गस्ती नौका आदींचीही माहिती असायला हवी. कुठलेही दिवस साजरे होतात त्यामागे इतिहास असतोच. त्याप्रमाणे नौदल दिन 4 डिसेंबरच का? यालाही ठोस कारण आहे. 1971 साली बांगलादेश मुक्तीसाठी लढा झाला. त्या युद्धात भारताच्या नौदलाने पाकिस्तानविरुद्ध कराची बंदरावर हल्ला केला, विशाखापट्टणमवरचा हल्ला परतविण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचे उच्चाटन करण्यात या शाखेने महत्वाची भूमिका बजाविली होती. या ऑपरेशनचे नाव होते ट्रायडेंट. दिवस होता 4 डिसेंबर.
विशेष म्हणजे दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये एमईआरएस, एनएमई आरआरटी फिसर अप्रेन्टिस (एए) आणि डायरेक्टर डिप्लोमा होल्डर्स या पदासाठी वरील महिन्यात देशातील प्रमुख वृत्तपत्रात तसेच रोजगार समाचारमध्ये (employment news) जाहिरात झळकते. खरेतर अशी राष्ट्रीय वृत्तपत्रे तसेच रोजगार समाचार वाचण्याची सवयच लावून ठेवावी. केवळ जाहिरातीसाठीच नव्हे तर सामान्य ज्ञानासाठी, राष्ट्रीय स्तरावरील माहितीसाठी यातील लेख फायदेशीर ठरतात.
नॉनमेट्रिकपासून उच्च शिक्षितांपर्यंत करू शकतात अर्ज
नवी दिल्ली येथील मुख्यालयस्थित असलेल्या नौदल भरती संघटनेतर्फे खलाशांची भरती वर्षातून दोन वेळा होते. ही भरती मनुष्यबळ नियोजन आणि भरती संचालनालय अंतर्गत केली जाते. स्वयंपाक्यापासून अधिकाऱ्यापर्यंत इथे उमेदवारांना संधी आहे. नॉनमेट्रिकपासून उच्च शिक्षितांपर्यंत या पदासाठी उमेदवार अर्ज करू शकतात. नौदल मुख्यालय जनशक्ती योजना आणि भरती निर्देशालाय सर्व भरती केंद्राचे नियंत्रण करते. त्यांची देशभर अंदाजे वीस भरती केंद्रे आहेत. जाहिरातीमध्ये भरती केंद्राचे स्थान, वेळ, तारीख याची माहिती दिलेली असते. खेळाडू, स्टुअर्ड, संगीत वाद्यकला जाणणारे, पदविका अभियांत्रिकी आदी उमेदवारांना या शाखेत संधी मिळते.
ठरावीक पदासाठी जाहिरात आल्यानंतर उमेदवार अर्ज करतो. त्या अर्जाची छाननी करून उमेदवारांना कॉललेटर येते. त्यानंतर त्यांची लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता परीक्षा होते. त्यापुढे जाऊन वैद्यकीय तपासणी झाल्यांनतर अखिल भारतीय पातळीवर गुणवत्ता यादी तयार केली जाते. अंतिम गुणवत्ता यादी तयार करून त्यांची मग प्रशिक्षणासाठी निवड केली जाते. यासाठी इंटरनेटवर www. nausena-bharati. mi.in या संकेतस्थळाला जरूर भेट द्यावी. शारीरिक क्षमता, वैद्यकीय तपासणी लष्करात अनिवार्य असल्याने आरोग्य व्यवस्थित ठेवणे महत्वाचे.