YouTube वर गाजली ‘आपली आजी’

Goan Varta Live | प्रतिनिधी
अहमदनगर : ती कधीही शाळेत गेली नव्हती, तिचं एकही सोशल मीडिया अकाउंट नव्हतं. परंतु ग्रामीण महाराष्ट्रातील ही 70 वर्षीय महिला युट्यूबवर लोकप्रय झालीय. यामागे आहे तिच्या रिसिपींची कमाल.
अहमदनगरपासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर असलेल्या सरोला कासार गावातील सुमन धामणे यांच्या पाककृती, त्यांच्या यूट्यूब चॅनल ‘आपली आजी’वर धुमाकूळ घालतायत. विशेष म्हणजे ‘आपली आजी’नं सहा लाखाहून अधिक सबस्क्रायबर्सचा टप्पा ओलांडलाय. आणि तोही फक्त सहा महिन्यांत.
सुमारे १२० रेसिपी व्हिडियो
या प्रवासाबाबत सुमन धामणे म्हणतात, मला युट्यूब काय आहे हे माहीत नव्हतं आणि मी सोशल मीडियावर रेसिपी प्रसिद्ध करण्याबद्दल कधीही विचार केला नव्हता. पण आता चॅनलवर कोणतीही रेसिपी शेअर न केल्यास मला अस्वस्थ वाटते. माझ्या ‘आपली आजी’ चॅनलवर सुमारे १२० रेसिपी व्हिडियो आहेत. मी घरगुती मसाल्यांनी सर्व पारंपरिक फ्लेवर्समध्ये महाराष्ट्रीयन पदार्थ बनवते. चॅनलला दररोज 4 हजारपेक्षा जास्त सब्स्क्रायबर्स आणि लाखो व्हीव्हज मिळत आहेत.
नातवानं हेरलं आजीचं टॅलेंट
‘आपली आजी’च्या यशामागील तंत्रज्ञानाचा आधार म्हणजे तिचा नातू, यश पाठक. हा 17 वर्षीय युवक सांगतो, जानेवारीच्या सुमारास मी माझ्या आजीला माझ्यासाठी पावभाजी करायला सांगितलं. त्यासाठी तिला काही पावभाजी रेसिपीचे व्हिडिओ दाखवले. ते पाहिल्यानंतर ती म्हणाली की ती यापेक्षा चांगली पावभाजी बनवू शकेल. नंतर तिने काय कमाल केली माहीत नाही. पण तिनं बनवलेली पावभाजी सर्वांनाच आवडली. तेव्हाच मला आजीला घेऊन यूट्यूब चॅनल काढावा असं वाटलं. नंतर आम्ही शेंगदाणा चटणी, हिरव्या भाज्या, महाराष्ट्रीयन गोड पदार्थ, वांगी आणि इतर पारंपारिक खाद्यपदार्थांच्या पाककृती अपलोड केल्या.
यूट्यूबर असल्याचा अभिमान
अकरावीत शिकणार्या या मुलाचं हे धाडस आणि त्यानंतर मिळालेलं यश सोपं नव्हतं. या विषयी सुमन सांगतात, जेव्हा यशने मला कल्पना सांगितली, तेव्हा मी या कल्पनेबद्दल खूप उत्साही होते. पण मी माझ्या आयुष्यात कधीही व्हिडिओ कॅमेर्याचा सामना केला नव्हतं. सुरुवातीला खूप अस्वस्थ वाटायचं. हळूहळू मला सवय झाली. आता मला यूट्यूबर असल्याचा अभिमान वाटतो.
जेव्हा चॅनल हॅक झालं…
यशनं सांगितलं की, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असताना आठवड्यातून दोन रेसिपी व्हिडिओ अपलोड करण्याचे काम केलं. 17 ऑक्टोबर रोजी चॅनल हॅक झाल्यावर आम्हाला मोठा धक्का बसला. अखेरीस हे चॅनल चार दिवसात पूर्ववत झालं आणि दोघांनाही हायसं वाटलं.
पारंपरिक मसाले विकण्यास सुरुवात
प्रेक्षकांच्या अधिक मागणीमुळे सुमन यांनी पारंपरिक मसाले विकण्यास सुरुवात केली आहे. पारंपरिक स्वयंपाकाच्या पद्धती आणि मसाले लोकप्रिय झाल्याचं त्या सांगतात. अनेक प्रेक्षक कॉल करतात आणि कृतीबद्दल चर्चा करण्याची विनंती करतात.