‘स्मार्ट व्हिलेज’मुळे कृषी क्षेत्रात येऊ शकते नवचैतन्य

भविष्यात सेंद्रीय शेतीकडे वळणे अपरिहार्य ठरेल. कृषी पर्यटनाला देखील मोठा वाव असून क्लस्टर पध्दतीने शेती केल्यास ते देखील साध्य होऊ शकते आणि मनरेगासारख्या सरकारी योजना शेतीशी जोडल्यास आणि त्याची व्याप्ती वाढवल्यास मोठा फायदा होऊ शकतो.

Goan Varta Live | प्रतिनिधी

राजीव कुलकर्णी
एक काळ असा होता की, भारतातील सुमारे 70 टक्के मनुष्यबळ हे शेतीच्या कामात गुंतले होते. कालांतराने राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा कमी होत गेला आणि अनेक लोकं शहराकडे वळली. मात्र राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा जितका कमी झाला, तितक्या प्रमाणात या क्षेत्रातील मनुष्यबळ मात्र कमी झाले नसून ते 55 टक्के इतके आहे. स्वत:ची जमीन नसलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. विविध सरकारांनी अनेक उपाययोजना व सुधारित धोरणे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र यातील वास्तव हे आहे की, शेती हे शेतकर्‍यांसाठी पुरेसे उत्पन्न देणारे क्षेत्र राहिले नाही.

शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविणे महत्त्वाचे
वरील स्थितीमुळे सरकारने शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ठरविलेले महत्त्वाकांक्षी ध्येय महत्त्वाचे आहे. अनेकांनी याच्या बाजूने आपली मते व्यक्त केली, तर काहींनी 5 वर्षांत हे शक्य नसल्याचे मत मांडले. हे काही असले तरी शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्याचे ध्येय हे महत्त्वाचे आहे. कारण या क्षेत्रात पुरेसे पैसे मिळाले, तरच पुढची पिढी शेतीकडे आकर्षित होईल. काही वर्षांपूर्वी या सरकारने स्मार्ट सिटीज ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. प्रत्येक शहरातील विविध भागांतील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्या त्या सोयी सुविधा या अंर्तगत विकसित केल्या जात आहेत. पुण्यासारख्या शहरात अनेक ठिकाणी पादचार्‍यांना शहरातील रस्त्यांवर सहजपणे वावरता यावे, यासाठी स्मार्ट फुटपाथ, बसायला बाक, ओपन जिम्स, सायकल ट्रॅकची व्यवस्था अशा अनेक गोष्टी केल्या आहेत. याच धर्तीवर थोड्या व्यापक स्वरूपात स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना राबवल्यास शेतकर्‍यांना मोठा फायदा होऊ शकतो. भारतात लाखो गावे आहेत आणि प्रत्येक गाव हे स्मार्ट व्हिलेज होणे शक्य नसले, तरी प्रत्येक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील प्रमुख गाव यासाठी पात्र ठरू शकते. स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना खरं म्हणजे गावांच्या आणि शेतकर्‍यांच्या शाश्‍वत व सुरक्षित भविष्यासाठी गुरूकिल्ली ठरू शकते.

ग्रामीण भागाला मिळू शकते नवसंजीवनी
रस्त्यांची दुरवस्था, घरांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव, उपोषण, कर्ज अशा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या ग्रामीण भागाला एक नवसंजीवनी देण्याचा हा प्रयत्न ठरू शकेल. स्थानिक लोकांच्या गरजा लक्षात घेऊन अशा ठिकाणी शीतगृह प्रस्थापित करणे, शेतकर्‍यांच्या पुढच्या पिढीला जोडधंद्यासाठी प्रशिक्षित करणे, स्थानिक लोककलांना प्राधान्य देत व्यवसायांमध्ये त्याचे रूपांतर करणे, शेतकर्‍यांसाठी असलेल्या पीक विमा योजना, सॉईल हेल्थ कार्ड असे अनेक लाभदायी उपक्रम जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत पोहचविणे हे स्मार्ट व्हिलेजमध्ये डिजिटल इंडिया आणि स्कील इंडियाला समाविष्ट करून शक्य होईल.

क्लस्टर पध्दतीने शेती करणे आवश्यक
आणखी एक महत्त्वाची संकल्पना जी काळाची गरज आहे आणि राबविली जाऊ शकते ती म्हणजे क्लस्टर फार्मिंग. जेव्हा छोट्या-मोठ्या जमिनी असलेले शेतमालक आणि शेतकरी एकत्र येतील, तेव्हा विविध साधनांचा वापर आणि परिणाम अधिक प्रभावी ठरू शकेल. आपल्या क्षेत्रातील जमिनीकरिता काय योग्य आहे, खतांचा वापर किती प्रमाणात करावा, अतिवृष्टी किंवा पावसाचा अभाव या दोन्ही परिस्थितीत एका पिकाचे नुकसान झाले, तर आपली परिस्थिती शाश्‍वत ठेवण्याकरिता अजून कोणती पिके, कशी आणि कुठे लावायला पाहिजेत, या सर्व गोष्टी थेट बाजारपेठेपर्यंत कशा पोहोचवायच्या, एकत्रितपणे उपकरणे खरेदी करून वापरल्यास त्याचा फायदा होऊ शकतो का ? या सर्व बाबी शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भविष्यात सेंद्रीय शेतीकडे वळणे अपरिहार्य ठरेल. जगभरात आरोग्याबाबत वाढती जागरूकता लक्षात घेता भविष्यात सेंद्रीय उत्पादनांकडे त्यांचा कल वाढेल यांत शंका नाही. कृषी पर्यटनाला देखील मोठा वाव असून क्लस्टर पध्दतीने शेती केल्यास ते देखील साध्य होऊ शकते आणि मनरेगासारख्या सरकारी योजना शेतीशी जोडल्यास आणि त्याची व्याप्ती वाढवल्यास मोठा फायदा होऊ शकतो. या सर्व गोष्टींची अमंलबजावणी करण्यासाठी स्पर्धात्मक परिक्षेच्या धर्तीवर कृषी क्षेत्रासाठी देखील अशा परीक्षा घेतल्या पाहिजेत आणि उत्तीर्ण झालेल्या कर्तबगार अधिकार्‍यांच्या खांद्यावर प्रत्येक स्मार्ट व्हिलेजची जबाबदारी सोपविली पाहिजे.

गावागावातील समस्यांवर उपाय काढणे महत्त्वाचे
हे सगळं करत असताना गावागावातील नेमके प्रश्‍न व समस्या शोधून त्याच्यावर उपाय काढणे महत्त्वाचे आहे. उदा. स्वच्छ पिण्याचे पाणी सर्वांपर्यंत पोहचविता आल्यास आरोग्यामध्ये सुधारणा दिसू शकते आणि तोच वाचलेला खर्च विकासकामात वापरला जाऊ शकतो. स्मार्ट व्हिलेजेसमध्ये सोलर यंत्रणांना चालना दिल्यास वीज दराची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटू शकेल आणि उत्पादनखर्च काही प्रमाणात का होईना कमी होऊ शकेल. या सर्व समस्यांवर स्मार्ट व्हिलेज हेच उत्तर असू शकते.

एकंदर, अडचणीत असलेल्या या कृषी उद्योगाला फक्त चालनाच नाही, तर नव्याने व्यापक दृष्टीने बघण्याची गरज आहे. कुठलेही धोरण ही थोडी थोडकी लोकं किंवा कंपन्यांसाठी फायदेशीर ठरू नयेत आणि छोट्या शेतकर्‍यापासून छोट्या दुकानदारापर्यंत या साखळीतील सर्वांसाठी लाभदायक आणि कल्याणकारी ठरणे हे भारताच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. म्हणूनच स्मार्ट व्हिलेजची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!