कोरोनाचा परिणाम की आणखी काही? शेअर बाजार गडगडला

निर्देशांकात 550 अंकांची घसरण : दिग्गज कंपन्यांच्या समभागांची घसरगुंडी

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

मुंबई : गुरुवारी सकाळी मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सुरूवातीच्या सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकात 386.24 अंकांची घसरण होऊन बाजार 37,282,18 वर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही 120 अंकांची घसरण होऊन तो 11,011 वर उघडला. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काहीच वेळात निर्देशांकात 550 अंकांपर्यंतची घसरण झाली.
शेअर बाजारातील सर्व प्रमुख कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं. इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा. बजाज फिनसर्व, मारुती, अॅक्सिस बँकेच्या समभागांमध्ये 1.50 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक, बांधकाम व्यवसाय, मीडिया आणि धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये 2 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण पाहायला मिळाली.
बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण पाहायला मिळाली होती. औषध कंपन्या आणि बँकांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. अखेरच्या सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकात 66 अकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 22 अकांची घसरण होऊन बाजार अनुक्रमे 37, 668, 42 आणि 11,132 वर बंद झाला होता.
जागतिक बाजाराचा शेअर बाजारावर परिणाम झाल्याचं म्हटलं जात आहे. बुधवारी अमेरिकेतील शेअर बाजारातही मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी डाओ 500 अंकांनी तर नॅस्डॅक 300 अकांनी घसरला होता. ऍपल, ऍमेझॉन एनविडीयासारख्या दिग्गज कंपन्यांचे समभागही चार टक्क्यांपर्यंत घसरले होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!