भारतातल्या कुबेराला ‘सेबी’चा दणका

ठोठावला 40 कोटींचा दंड

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : भांडवली बाजार नियामक अर्थात ‘सेबी’ने भारतातले कुबेर म्हटल्या जाणार्‍या उद्योगपतीला तसेच त्यांच्या कंपनीला दणका दिलाय. दोघांना मिळून 40 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय.

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडसह (आरआयएल) अन्य दोन कंपन्यांना एकूण 40 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबीने नोव्हेंबर 2007 मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडमध्ये (आरपीएल) आढळलेल्या शेअर घोटाळाप्रकरणी ही कारवाई केली.

सेबीने रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडला 25 कोटी, कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांना 15 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. या शिवाय नवी मुंबई एसईझेड प्रायव्हेट लिमिटेडला 20 कोटी आणि मुंबई एसईझेड लिमिटेडला 10 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

मार्च 2007 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजने आरपीएलचे 4.1 टक्के शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर आरपीएलचे आरआयएलमध्ये विलिनीकरण केले होते. या प्रकरणी सेबीचे अधिकारी बी. जे. दिलीप यांनी 95 पानांच्या आदेशपत्रात कोणाला किती दंड आणि त्याची कारणे या संदर्भात सविस्तर माहिती नमूद केली आहे. गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी तसेच भविष्यात अशी पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सर्वांनाच योग्य तो इशारा देण्याकरिता सेबीने दोषींना दंड भरण्याचा आदेश दिला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!