5Gबाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा, जुलै 2021ला 5Gसुरु होणार?

तंत्रज्ञान क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी देशात ५ जी सेवा सुरू करण्याबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. सध्या देशात फोरजी सेवा सुरु आहे. मात्र लवकरच
5G सुरु होण्याच संकेत मुकेश अंबानी यांनी दिले आहेत. येत्या वर्षभरात 5Gसेवा सुरु होण्याबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमाला मंगळवारी संबोधित केलं. भारताच्या विकासात टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील कंपन्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं मोदींनी म्हटलंय. पण अजूनही आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा असल्याचं त्यांनी नमूद केलं. कोरोना काळातही तंत्रज्ञानाची मोलाची मदत झाल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमादरम्यान दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद, रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी देशात 5G सेवा सुरू करण्याबाबत महत्त्वाचे संकेत दिले.

2021 या वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीत रिलायन्स जिओ 5G सेवा सुरू करण्याची तयारी करत असल्याचं मुकेश अंबानी यांनी म्हटलंय. दरम्यान, यासाठी धोरणात्मक बदल आणि प्रक्रिया वेगवान करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत धोरणात्मकरित्या यात सुलभता आणली जात नाही आणि स्वस्त सेवा दिली जाणार नाही, तोवर सर्वांपर्यंत याचा लाभ पोहोचण्याची शक्यता नसल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

काय म्हणाले अंबानी?

2021 या वर्षात रिलायन्स जिओ देशात 5Gची क्रांती घेऊन येणार आहे. संपूर्ण नेटवर्क हे स्वदेशीच असणार आहे. याव्यतिरिक्त हार्डवेअर आणि टेक्नॉलाजीही स्वदेशी असेल. जिओद्वारे आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत. देशात सध्या 30 कोटींपेक्षा अधिक 2G सेवा वापरणारे कस्टमर आहेत. या लोकांपर्यंत स्मार्टफोन्स पोहोचणं आवश्यक आहे. त्यासाठी काही धोरणात्मक बदल अपेक्षित आहेत. डिजिटली आपण उत्तमरित्या जोडले गेलो आहोत. असं असलं तरीही आज 30 कोटी ग्राहक 2G फोनचाच वापर करत आहेत.

मोदी काय म्हणाले?

देशात आणि जगावर मोबाईनं मोठा प्रभाव टाकला आहे. दहा वर्षांपूर्वी त्याचा अंदाज वर्तवणंही कठीण होतं. शेती, आरोग्य विभाग, शिक्षण आणि अन्य क्षेत्रांमध्ये याद्वारे सामान्य लोकांच्या जीवनात कसा बदल घडवता येऊ शकतो यावर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे.कोट्यवधी लोकांकडे मोबाईल आहेत. प्रत्येकाची आपली डिजिटल ओळख आहे. यामुळे सरकारला सामान्यांपर्यंत मदत पोहोचवणं सहजरित्या शक्य झालं आहे. आज ग्रामीण भागांमध्येही डिजिटली ऍक्टिव्ह लोकाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज अब्जाबधींमध्ये कॅशलेश ट्रान्झॅक्शन्स केली जात आहे. आपल्याला आपल्या देशआतील दूरसंचार क्षेत्राला ग्लोबल हब बनवायला हवं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!