मिरची झाली गोड! तीन महिन्यात शेतकऱ्यानं असे कमावले 7 लाख

शेतीतल्या प्रेरणादायी प्रयोगाची यशोगाथा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात स्ट्रॉबेरी आणि झेंडूच्या शेतीचे प्रयोग यशस्वी झाल्याच्या यशोगाथा पाहायला मिळालेल्या आहेत. अशातच एक अनोखी यशोगाथा आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. एका शेतकऱ्यासाठी मिरची गोड ठरली आहे. तीन महिन्याच एका शेतकऱ्याला मिरचीच्या पिकानं तब्बल सात लाख रुपयांचं उत्पन्न मिळवून दिलं आहे. विशेष म्हणजे दुष्काळी समजल्या जाणाऱ्या भागात मिरचीची लागवड करुन यश मिळवणाऱ्या या शेतकऱ्यांची यशोगाथा अनेकांना शेतीकडे वळण्यास प्रेरणादायी ठरेल, असं बोललं जातंय.

कशी केली किमया?

हा शेतकरी आहे गोव्या शेजारील महाराष्ट्र राज्यातला. महाराष्ट्रात दुष्काळी जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. त्यामुळे, बीडमध्ये शेतीसाठी पाण्याची कमतरता आहेच. म्हणून उत्पन्न अधिक मिळत नाही आणि शेतीतून मिळणाऱ्या नफ्यातही घट होते, असा सूर ऐकायला मिळतो. मात्र, जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही. सर्वकाही साध्य केलं जाऊ शकतं हे बीडच्या आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्यानं सिद्ध केलंय. पारंपारिक शेतीपेक्षा थोडा वेगळा प्रयोग करून या शेतकऱ्यानं 3 महिन्यातच तब्बल 7 लाखांचं भरघोस उत्पन्न मिळवलं आहे. आष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे गावातील शेतकरी संजय विधाते यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे.

काय होता प्रयोग?

विधाते यांनी पॉलिहाऊसमध्ये रंगीत ढोबळी मिरचीची शेती करण्यास सुरूवात केली आहे आणि पहिल्याच वर्षी भरगोस उत्पन्न मिळवलं. त्यांच्या या प्रयोगानं इतर शेतकऱ्यांसमोरही आदर्श निर्माण केलाय. नांदूर या गावात कायमस्वरुपी असा पाण्याचा स्त्रोत नाही. पावसाच्या पाण्यावर आष्टीत कमी कालावधीत येणारीच शक्यतो पिकं घेतली जातात. मात्र, विधाते यांनी माळरानावर रंगीत ढोबळी फुलवली आणि जबरदस्त उत्पन्नही मिळवलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला पाणीही कमी लागतं आणि ठिबक सिंचनानं पाणी दिल्यानं पाण्याची बचतही होते.

राष्ट्रीय फलोत्पादन योजनेंतर्गत आष्टी कृषी विभागामार्फत पॉलिहाऊस उभारण्यासाठी 9 लाखाचं अनुदान मिळालं. याचा फायदा करून घेत रंगीत ढोबळीची लागवड करण्याचा निर्णय विधाते यांनी घेतला. जून महिन्यात 20 गुंठे क्षेत्रामध्ये त्यांनी 5 हजार 600 लाल आणि पिवळ्या ढोबळी मिरचीची झाडं लावली. आता यातून उत्पन्न मिळण्यास सुरूवात झाली आहे. यातून केवळ तीन महिन्यात त्यांनी 7 लाख रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळवलं आहे. तर, आणखी चार महिने याला मिरची येईल यातून आणखी 8 ते 10 लाखाचं उत्पन्न मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा –

मस्तच! धारबांदोड्यातील या महिलांनी झेंडू फुलवून केली भरीव कमाई

हा शेतकरी कमावतोय 10 लाख! या पद्धतीचा अवलंब…

प्रेरणादायी! शिवणकामातून नाव कमावणाऱ्या मांद्रेतील संजय सातोस्करांची यशोगाथा

Success | पोस्टमन ते आत्मनिर्भर शेती करणाऱ्या एका अवलियाचा Special Report

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.