कोरोना कोमात, रामदेव बाबांच्या पतंजलीचं कोरोनिल जोमात

कोरोनिलची तब्बल 241 कोटीची विक्री

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : योगगुरु रामदेव बाबांना कोण नाही ओळखत? सगळ्यांच ते माहीत आहेत. पण आता ते फक्त योगगुरु राहिलेले नाहीत. ते आता बिझनसमॅनही झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर रामदेव बाबांच्या पतंजलीनं एक औषध बाजारात आणलं होतं. या औषधावरुन वादंगही झाला होता. पण या औषधाची जबरदस्त विक्री झाली असल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. त्यामुळे कोरोना कोमात आणि रामदेव बाबांनी कोरोनावर काढलेलं औषध कोरोनिल जोमात असल्याची चर्चा रंगली आहे.

नेमकी किती विक्री झाली?

द प्रिंन्टने दिलेल्या बातमीनुसार असं कळतं की, कोरोनिलच्या विक्रीतून 241 कोटी रुपये रामदेव बाबांच्या पतंजलीनं कमावले आहे. अवघ्या 4 महिन्यामध्ये 85 लाखापेक्षा जास्त कोरोनिल औषधाचं किट विकलं गेल्याचीही माहिती मिळतेय.

विशेष म्हणजे रोज 50 ते 70 हजार कोरोनिल किट तयार केले जात असल्याचंही कळतंय. या आकडेवारीतून कोरोनिल यशस्वी ठरतंय, असं पतंजली आर्युवेदचे चीफ एक्झिकेटीव्ह ऑफिसर आचार्य बालकृष्ण यांनी म्हटलंय. कोरोनिल औषधाच्या एका किटची किंमत 545 रुपये आहे.

हेही वाचा – कांदा भजीत कोबीचं वर्चस्व! कांदाभजीत होतोय घोटाळा

कोरोनिलला वादाची ‘सर्दी’

23 जूनला कोरोनिलचं औषध लॉन्च करण्यात आलं होतं. त्यानंतर कोरोनावर पहिलं औषध आल्याची चर्चा रंगली होती. पतंजलीनं कोरोनाचं थैमान रोखण्यात हे औषध मदत करेल, असा विश्वासही व्यक्त केला होता. सात दिवसात कोरोनिलच्या गोळ्यांनी कोरोना बरा होईल, असा विश्वास रामदेव बाबांनी व्यक्त केला होता. दरम्यान, यावरुन आयुष मंत्रालयानं पतंजलीला फटकारलं होतं. याची गंभीर दखल ङेत कोरोनिल हे कोरोनावरचं औषध आहे, अशी जाहिरात करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते.

त्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे औषध उपयोगी असल्याची जाहिरात पुढे करण्यात आली आहे. काही दिवसांनंतर आचार्य बाळकृष्ण यांनीही एक वक्तव्य केलं होतं. कोरोनिलमुळे कोरोना बरा होतो, असा दावा आपण कधीच केला नव्हता असं त्यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा – बोल बिनधास्त | आगामी निवडणुकीसाठी भाजपचा जय भंडारी मंत्र?

औषध विकून मालामाल

कोरोनावरची लस कधी येणार, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. अशात पतंजलीनं काढलेल्या औषधाला चांगला प्रतिसाद मिळतोय. पतंजलीवर कोरोनाआधी आर्थिक संकट ओढवलं होतं. आता गेल्या चार एक महिन्यात झालेल्या बिझनेसमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला असेल हे नक्की. कोरोनिलने कोरोना बरा होतो की नाही, हे माहीत नाही. पण पतंजलीचा बिझनेस बरा होतोय, हे ऐकून रामदेव बाबा खूश झाले असणार, हे नक्की.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!