कांदा रडवणार! कांदा शंभरीच्या पार जाण्याची दाट शक्यता

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी
पणजी : महाराष्ट्र, कर्नाटकातील मुसळधार पावसामुळे गोव्याला कांद्यासह इतर पालेभाज्यांसाठी मध्य प्रदेशवर अवलंबून रहावे लागणार आहे. पुढील काळात कांद्याची आणखी टंचाई जाणवणार असल्याने फलोत्पादन महामंडळासह खुल्या बाजारातील कांद्याचे दर प्रतिकिलो 100 ते 150 रुपयांवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजीपाल्यासाठी गोवा प्रामुख्याने शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकवर अवलंबून आहे. पण गेल्या काही दिवसांत या दोन्ही राज्यांत मुसळधार पाऊस पडलाय. त्यामुळे कांद्यासह इतर भाज्यांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. बेळगावातील बाजारपेठेत मध्य प्रदेशातून येणाऱ्या कांद्याची गोवाही आयात करीत आहे. पण पूर्वी मध्य प्रदेशातून बेळगावात दररोज ७० ते ८० कांद्याचे ट्रक येत होतते. सध्या ही संख्या 20 येऊन ठेपली आहे. त्यामुळे गोव्याला पुरेशा प्रमाणात कांदा मिळणे कठीण झाले आहे. याच कारणामुळे आगामी काळात गोव्यात कांद्याची प्रचंड टंचाई जाणवणार असून, त्यामुळे कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
मंगळवारी फलोत्पादन महामंडळात कांदा ७२ रुपये तर खुल्या बाजारात 85 ते 90 रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला. पण पुढील दोन-तीन दिवसांत तो शंभर रुपयांच्या आसपास जाऊ शकतो, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले.
टंचाईमुळे महाराष्ट्र, कर्नाटकातून येणाऱ्या भाजीपाल्याची आयात काही प्रमाणात कमी झाली आहे. पण फलोत्पादन महामंडळाची भाजी राज्यभरातील सर्वच स्टॉल्सना पुरेल, याची काळजी महामंडळ घेत आहे, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, फलोत्पादन महामंडळाचे स्टॉल्स तसेच खुल्या बाजारात कांद्याप्रमाणेच इतर भाज्यांचे दरही गगनाला भिडत चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गोमंतकीय जनतेच्या खिशाला कात्री लागत आहे.
ग्राहकांचा सवाल
अगोदरच करोनाकाळातील लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य गोमंतकीयांचे आर्थिक उत्पन्न मंदावले आहे. त्यात आता जीवनावश्यक वस्तू, भाज्यांचे दरही वाढत चालले आहेत. भविष्यात या दरांत आणखी वाढ झाल्यास सर्वसामान्य जनतेने खायचे काय?
पाहा सविस्तर रिपोर्ट
हेही वाचा
देशात प्लाझ्मा थिरपी लवकरच बंद होणार, आयसीएमआरचे संकेत
मोठी अटक! विलास मेथर हत्याप्रकरणी शैलेश शेट्टीला बेड्या
ही टॅक्सी घेईल करोनापासून सुरक्षेची काळजी