शेतकर्यांना व्यापार्यांच्या घशात घालण्याचं कारस्थान!

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : पिकांसाठी मिळणारी सरकारी आधारभूत किंमत बंद करून शेतकर्यांना उद्योगपती व व्यापारी यांच्या घशात घालण्याचं कारस्थान भाजप सरकारनं आखलं आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी केली.
रिवण-सांगे येथे किसान काँग्रेसतर्फे आयोजित किसान मेळाव्यात ते बोलत होते. नवीन कायद्यात कांदा, बटाटा, कडधान्ये, डाळी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळली आहेत. यापुढे जनतेला या वस्तूंचे भाव व्यापार्यांच्या मर्जीनुसार द्यावे लागतील. पंजाबच्या अकाली दलाने भाजपची साथ सोडली आहे. यातून भाजप नेत्यांनी बोध घ्यावा व आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला कामत यांनी दिला. भाजपला शेतकर्यांचा पुळका असता, तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी गोमंतकीय शेतकर्यांच्या समस्या ऐकून घेतल्या असत्या, असं ते म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) म्हणाले, भाजप सरकार देशात सावकारी राजवट आणण्यात व्यस्त आहे. त्यामुळेच त्यांना शेतकर्यांच्या व्यथा कळत नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांना राजभवनावरील काँग्रेसच्या भव्य मोर्चात सामील शेकडो शेतकरी दिसले नव्हते.
काँग्रेसचे प्रदेश सचिव रजनीकांत नाईक यांनी स्वागत केले. सांगे युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश भगत यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अमरनाथ पणजीकर यांनी केले. या मेळाव्याला काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप नाईक, सचिव दामोदर शिरोडकर, नगरसेवक अविनाश शिरोडकर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लॉकडाऊन काळात अनेक मजुरांचे प्राण गेले त्याची माहिती केंद्र सरकारकडे नसल्याचे उत्तर लोकसभेत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांप्रति असलेली सरकारची असंवेदनशीलता उघड केली आहे. सामान्य जनतेचा आक्रोश भाजपच्या कानावर पडत नाही. आभासी दुनियेत भाजप सरकार वावरत आहे.
– फ्रान्सिस सार्दिन, खासदारभाजपच्या जुमला राजवटीला जनता कंटाळली आहे. काँग्रेसच्या किसान मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली असेल. हा मेळावा भाजपला सत्तेपासून दूर नेण्याची नांदी आहे.
– बोसत्यांव सिमोईस, स्थानिक शेतकरी
नव्या कृषी कायद्यांमुळे राज्य सरकारला ९ कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे स्पष्ट सांगणारे भाजपचेच ज्येष्ठ नेते प्रकाश वेळीप हे दलाल वाटतात का, हे भाजप नेत्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी काँग्रेस किसान मोर्चाचे निमंत्रक अभिजीत देसाई यांनी केली.