गोवुमनियाचं महिला उद्योजिकांसाठी खास ऍप, 11,500 महिलांना होणार फायदा

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : दीपावली अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. अशात जोरदार शॉपिंग करण्याचा मुड असेल तर गोवुमनीया या महिलांनी गोव्यातील छोट्या मोठ्या उद्योजक महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी खास तयार केलेल्या गोंयकार्ट ऍपचा पर्याय उपलब्ध असणार आहे.
महिला उद्योजिका सिया शेख यांनी ग्रामीण भागातील हजारो महिला उद्योजकांना गोवुमनियाच्या संघटनेच्या छताखाली आणून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ आणि वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. गेली 3 वर्षे गोवुमनिया मार्फत ग्रामीण आणि शहरी महिला उद्योजिकांना स्वयंपूर्ण करण्यासाठी सिया शेख आणि त्यांचे सहकारी विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत.
गरज शोधाची जननी
काळाची गरज ओळखून आणि कोविड महामारीमुळे विस्तारलेले ऑनलाइन शॉपिंगचे क्षेत्र काबिज करण्यासाठी सिया शेख यांना डॉ. स्नेहा भागवत मोक्षा कोत्ययान, मधुमिता बचपन आणि कुषा नायक यांनी मार्ग दाखवत गोंयकार्ट ऍपची निर्मिती हाती घेतली. महिला उद्योजिका, व्यावसायिक, कारागीर, कलाकार आदींच्या विविध उत्पादनांना गोव्या बरोबरच देशाची बाजारपेठ खुली करून देण्यात गोंयकार्ट ऍप महत्वाची भूमिका बजावणार आहे.
व्होकल फॉर लोकल
दीपावलीसाठी पणत्या, रोषणाईच्या साहित्या पासून कपडे, खाद्य पदार्थ,सजावटीच्या आकर्षक वस्तू गोंयकार्टवरुन अगदी एका दिवसात घरपोच मिळणार आहेत. त्यासाठी 3 कुरियर सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांशी करार करण्यात आला आहे.
यावेळी दीपावली निमित्तची जोरदार खरेदी गोंयकार्टवरुन करून व्होकल फॉर लोकलची संकल्पना बळकट करण्याची संधी गोमंतकीय साधतील असा विश्वास सिया शेख आणि डॉ. भागवत यांनी व्यक्त केला आहे.