मिलिंद केरकर प्रथमच पेडणे शेतकरी संस्थेच्या निवडणुकीपासून दूर

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी
पेडणे : पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच सहकार क्षेत्रातील अग्रणी मिलिंद केरकर (Milind Kerkar) रिंगणात उतरणार नाहीत. त्याचबरोबर संस्थेचे ज्येष्ठ संचालक किशोर शेट मांद्रेकर यांनीही निवडणूक न लढवण्याचे ठरवले आहे. आणखी एक ज्येष्ठ संचालक मोहन बुगडे निवडणूक लढवणार नाहीत.
पेडणे शेतकरी संस्थेची निवडणूक येत्या 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यावेळी प्रथमच दोन महिला संचालकांना संस्थेत संधी मिळणार आहे. तसेच एससी आणि एसटी समाजातील एखाद्याला संचालक बनण्याची संधी प्राप्त झाली आहे. संस्थेच्या भाग एक मधून 9 संचालक तर भाग दोन मधून तीन संचालक निवडून येणार आहेत.
गेली सुमारे 40 वर्षे संस्थेचे अध्यक्ष असलेले मिलिंद केरकर यांनी वैयक्तिक अडचणीमुळे निवडणुकीपासून दूर राहण्याचे ठरविले आहे. केरकर यांच्या कारकिर्दीत संस्थेची प्रचंड भरभराट झाली. गोव्यात एखाद्या संस्थेचे एवढे वर्ष बिनविरोध अध्यक्षपद भूषवलेली अशी एकमेव व्यक्ती असावी. शेतकरी संस्थेसाठी केरकर यांनी आपले सर्व आयुष्य खर्ची घातले. नि:स्वार्थी आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे कसब यामुळे केरकर यांना शेतकरी संस्था ही राज्यातील आदर्श अशी संस्था बनवता आली.
पेडणे शेतकरी संस्था आणि केरकर : एक समीकरण
पेडणे शेतकरी संस्था आणि मिलिंद केरकर असे जणू एक समीकरणच बनले होते. तालुक्यात धान्य वाटप आणि स्वयंसेवा भांडारे सुरू करून त्यांनी शेतकरी तसेच भागधारकांना चांगली सेवा उपलब्ध करून दिली. याशिवाय शेतकऱ्यांसाठी कृषी सेवा केंद्र तसेच नांगरणी यंत्र, भात कापणी आणि मळणी यंत्र उपलब्ध केले. तालुक्यातील शेतकऱ्यांकडून भारतासह अनेक नगदी पिके आणि अन्य पिकांची खरेदी करून शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळवून दिला आणि लोकांनाही किफायतशीर दरात माल उपलब्ध करून दिला. संस्थेला नफ्यात आणून भागधारकांना लाभांश वाटप आणि प्रोत्साहन लाभ मिळवून दिला. आजमितीस संस्थेवर कोणतेही कर्ज नाही. तसेच सरकारचेही काही देणे नाही.
ज्येष्ठ संचालक किशोर शेट मांद्रेकर यांनीही ही निवडणूक न लढविण्याचे ठरविले आहे. नव्या सभासदांना संधी मिळावी म्हणून आपण हा निर्णय घेतला आहे, असे शेट मांद्रेकर यांनी सांगितले. गेली सुमारे 22 वर्षे शेतकरी संस्थेसाठी काहीतरी योगदान देता आले, याचे आपल्याला समाधान आहे. यापुढेही शेतकरी संस्थेबरोबर आपले नाते कायम असेल. शिवाय आमचे आतापर्यंतचे सर्व सहकारी पुन्हा संस्थेत येतील आणि चांगले कार्य करतील, असा विश्वास शेट मांद्रेकर यांनी व्यक्त केला आहे.
मोहन बुगडे यांनी आपण वैयक्तिक कारणास्तव निवडणुकीत भाग घेत नाही, असे सांगितले.
दरम्यान, यंदाची निवडणूक ही चुरशीची होईल, असे एकूण चित्र आहे.
मिलिंद केरकर म्हणाले…
संस्थेबाबत आपल्याला अतिशय आदर आहे. सर्व भागधारक, संचालक, सेवकवर्ग आणि हितचिंतक तसेच सर्वांनी आत्तापर्यंत आपल्यावर ठेवलेला विश्वास आपण जपला आणि संस्थेचे कार्य सुरू ठेवले. संस्था सर्वांच्या सहकार्याने भरभराटीला आली. संस्थेला राज्य तसेच देशपातळीवरील अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले हे संस्थेसाठी भूषणावह आहे. आपण आता सहकार क्षेत्रातून थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. नव्या संचालक मंडळाला, नव्या पिढीला वाव मिळायला हवा. संस्थेच्या कार्याला आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत, असे केरकर यांनी सांगितले.