क्रांतिकारी बदल! राज्यात झेंडूच्या उत्पादनावर भर

Goan Varta Live | प्रतिनिधी
वाळपई : गोव्याच्या कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल होताना दिसत आहेत. गोवा सरकारने कृषी क्षेत्रातील शेतकरी बांधवांसाठी जोड पीक घेण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू केलेत. यामुळे आता येणाऱ्या काळात शेतकरी बांधवांना पारंपरिक शेती व्यवसायाबरोबरच जोडव्यवसाय म्हणून नवीन पद्धतीच्या लागवडीवर भर देण्यात येणार आहेत. आत्मा या योजनेअंतर्गत गोव्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विशिष्ट स्वरूपाच्या लागवडी हळूहळू विकसित होताना दिसत आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून गोवा सरकारचे कृषी खाते प्रयत्न करणार आहेत.
याचाच एक भाग म्हणून राज्यात यंदापासून आत्मा योजनेअंतर्गत झेंडू फुलांच्या लागवडीला एक वेगळ्या प्रकारचा स्तर निर्माण झालेल्या आहे. गोव्याच्या वेगवेगळ्या तालुक्यात जवळपास 11 हेक्टर क्षेत्रांमध्ये झेंडू फुलांच्या लागवडीला प्रारंभ करण्यात आल्यानंतर आता सदर फुलांची लागवड होण्यास प्रारंभ झालामुळे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये पिवळ्या रंगाची झेंडू फुलांची चादर क्षेत्रावर पांघरलेली दिसत आहे. गोव्यातील ग्राहकांना आता चांगल्या प्रकारच्या झेंडू फुलांची व्यवस्था गोव्यातच होणार आहे.
यापूर्वी झेंडू फुले महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कर्नाटक भागातील बेंगलोर आणि इतर भागातून येत होती. यामुळे जादा पैसे मोजावे लागत होते. आता याठिकाणी दर्जेदार फुलांची व्यवस्था होणार असल्यामुळे कमी किमतीमध्ये याफुलांचा वापर पारंपारिक धार्मिक सजावटीसाठी होणार आहे.
दक्षिण, उत्तर गोव्यात लागवड.
आत्मा योजनेचे प्रकल्प अधिकारी अनिल परांजपे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याच्या जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये यंदा झेंडू फुलांच्या लागवडीला भर दिलेला आहे. उत्तर गोव्यातील सत्तरी डिचोली पेडणे बार्देश तिसवाडी तर दक्षिण गोव्यातील फोंडा काणकोण सांगे केपे आदी तालुक्यांमध्ये यंदापासून लागवड करण्यात आलेली आहे. सध्या ही लागवड बहरू लागली असून अनेक ठिकाणी पिवळ्या रंगाची सोनेरी झेंडू फुले तोडण्यासाठी सज्ज झालेली आहेत. यामुळे पहिल्यांदाच गोव्यातील फुल उत्पादनाच्या बाबतीत शेतकरी बांधवांना जोड भाव प्राप्त होणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
हायब्रीड गोल्ड पिवळी फुलं
यासंदर्भात बोलताना दिलीप परांजपे यांनी सांगितलं की रोपे शोधण्यासाठी आपण सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आदी भागांमध्ये प्रत्यक्षपणे भेट दिली. एकाच रंगाची रोपटी आणून ती गोव्यामध्ये लागवड करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर कोल्हापूरमध्ये प्रति रोप 4 प्रमाणे विकत घेऊन ती गोव्यातील शेतकऱ्यांना पुरविण्यात आली. याविशिष्ट जाती संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की या फुलांचा आकार इतर फुलापेक्षा मोठा आहे. फुलांचा रंग सोनेरी पिवळ्या स्वरूपात असल्यामुळे अत्यंत आकर्षक असतात. यामुळेच या जातीची निवड करण्यात आल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.
तीन महिन्यांनी उत्पादनाला सुरुवात
एकूण लागवडीसंदर्भात यांनी सांगितलं की एक महिन्यांच्या रोपट्यांची आयात कोल्हापूर भागातून करण्यात आली होती .गोव्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दोन महिन्यांपूर्वी सदर लागवड करण्यात आली व आत्ता सदर झाडे फुलांनी बहरून लागलेली आहेत. बऱ्याच ठिकाणी फुले तयार झालीत. काही ठिकाणी फुले तोडून ती बाजारपेठेमध्ये उपलब्ध करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नवरात्रौत्सव, दसरा आणि दिवाळी या तीन महिन्यांचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून ही लागवड करण्यात आली होती. त्यामुळे नवरात्रोत्सवात या फुलांच्या बाजारपेठेला प्रारंभ होणार असून यामुळे शेतकरी बांधवांना त्यातून चांगल्या प्रकारे पैसा काढता येणार आहे. त्याला प्रारंभ झाल्याचे दिलीप परांजपे यांनी यावेळी स्पष्ट केले. गोव्यात अशा प्रकारची लागवड करण्यात आल्यामुळे ग्राहकांना कमी किमतीमध्ये ही फुलं उपलब्ध होणार आहेत.
इतरांना प्रोस्ताहन
तसे पहावयास गेलो तर गोव्यातील फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. गोव्यातील नवरात्र दसरा व दिवाळी या तीन सणांसाठी मोठ्या प्रमाणात फुलांची आवश्यकता असते. यामुळे गोव्यामध्ये अशा मुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्यातरी 11 हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली असली तरी ही फुले गोव्यासाठी पुरक ठरणार नाहीत. ती कमीच पडणार आहेत. यंदाच्या यशस्वी लागवडीपासून इतरांना प्रोत्साहन मिळणार असून पुढील वर्षांत लागवडीचे उद्दिष्ट दुप्पट किंवा तिप्पट करण्याचा कृषी खात्याचा प्रयत्न राहणार असल्याचे प्रकल्प अधिकारी दिलीप परांजपे यांनी स्पष्ट केले आहे. अवघ्या दोन महिन्यात चांगल्या प्रकारे अर्थप्राप्ती करून देणारी ही लागवड असल्यामुळे व त्याला गोव्यातही चांगल्या प्रकारची मागणी असल्याने इतर शेतकरी बांधवांनी यासाठी तयारी ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
सत्तरी तालुक्यात मळे फुलले
वाळपई विभागीय कृषि अधिकारी विश्वनाथ गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तरी तालुक्यात जवळपास 12000 चौरस मीटर क्षेत्रांमध्ये झेंडू फुलांची लागवड करण्यात आलेली आहे .एकूण सोळा शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतल्यामुळे सत्तरी तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये लागवड करण्यात आलेली आहे .सध्या फुलांचे मळे फुलू लागले असून यातून एक विशिष्ट प्रकारचे आकर्षण निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कुठे किती लागवड?
उत्तर गोवा
सत्तरी- 12,000.चौ.मी.
डिचोली- 12,000 चौ.मी
पेडणे- 10,000 चौ.मी.
बार्देश- 10,000 चौ.मी.
तिसवाडी- 1000 चौ.मी.
दक्षिण गोवा
फोंडा- 2500 चौ.मी.
काणकोण- 10,000 चौ.मी.
सांगे–2500 चौ.मी
केपे- 1600 चौ.मी