ग्रीनको ग्रुप करतेय १००० मोठ्या वैद्यकीय श्रेणीच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची पहिली हवाई मालवाहतूक

पाच विशेष कार्गो विमानांपैकी पहिले हैदराबाद येथे २०० मोठ्या मेडिकल ग्रेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्ससह दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

हैदराबादः भारतातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी, हैदराबाद-स्थित ग्रीनको ग्रुपने देशात सध्या अत्यंत निकडीच्या असलेल्या ऑक्सिजन सहायता प्रणाली आणण्यासाठी आपले जागतिक पुरवठा शृंखला नेटवर्क उपयोगात आणले आहे.  देशाला ऑक्सिजन पुरवठा तातडीने होण्याची नितांत गरज आहे आणि त्यासाठी ग्रीनको ग्रुप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.  त्यांच्या पाच विशेष कार्गो विमानांपैकी पहिले हैदराबाद येथे २०० मोठ्या मेडिकल ग्रेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्ससह दाखल झाले. या कॉन्सन्ट्रेटर्सची क्षमता प्रति मिनिट १० लिटर असून संसर्गाच्या महाभयानक दुसऱ्या लाटेविरोधात भारताच्या लढ्यात हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स अतिशय मोलाचं ठरणार आहेत.

राज्याच्या वतीने विमानाचं स्वागत

तेलंगणाचे नगरपालिका प्रशासन आणि शहरी विकास, उद्योग व आयटी ईअँडसी विभागांचे माननीय मंत्री के. टी. रामा राव यांनी प्रधान सचिव सोमेश कुमार यांच्या समवेत राज्याच्या वतीने विमानाचं स्वागत केलं. ग्रीनकोचे सह-संस्थापक अनिल चलमालाशेट्टी आणि महेश कोल्लि हे देखील कार्गो विमानाची पहिली खेप विमानतळावर उतरत असताना त्याठिकाणी उपस्थित होते.

ग्रीनको ग्रुपचे एमडी व सीईओ अनिल चलमालाशेट्टी म्हणाले,

गेल्या दोन आठवड्यात आम्ही निर्माण केलेल्या सक्षम जागतिक पुरवठा शृंखलांमार्फत आम्ही आणत असलेल्या पाच विशेष कार्गो विमानांपैकी हे पहिले विमान आहे.  पुढील ५ दिवसात आणखी चार विशेष विमाने हैदराबाद, बेंगळुरू आणि नवी दिल्ली येथे अशाच १००० मोठ्या मेडिकल ग्रेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्ससह दाखल होतील.  यामुळे द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरांमधील आपल्या वैद्यकीय चमूंना रुग्णांना प्री-आयसीयू सहायता व आयसीयूतून बाहेर आल्यानंतर त्यांची तब्येत स्थिर राखण्यात मदत मिळेल व आपल्या आरोग्यसेवा पायाभूत सेवासुविधा आणि मदत यंत्रणांवर प्रचंड मोठा ताण ज्यामुळे आला आहे त्या कोविडच्या दुसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी अधिक जास्त बळ मिळेल.  देशसेवेचे, महामारीविरोधात लढण्याचे आणि देशाला पुन्हा मोकळा श्वास घेता यावा यासाठी मदत करण्याचे आमचे कार्य आम्ही असेच सुरु ठेवू.

माननीय मंत्री के. टी. रामा राव म्हणाले

सरकार, उद्योजक आणि जबाबदार नागरिक म्हणून आपले पहिले कर्तव्य रुग्णांची मदत करणे आणि जितक्या तातडीने व सक्षमतेने शक्य होईल तशी या ऑक्सिजन समस्येवर मात करणे हे आहे.  ग्रीनको ग्रुपचे हे प्रयत्न अतिशय वाखाणण्याजोगे आहेत आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

स्टेशनरी युनिट्स स्वरूपात तैनात करणार

याशिवाय प्रत्येकी ५० लिटर क्षमतेचे १००० मोठे ऑक्सिजन सिलिंडर्स मध्य पूर्वेतून भारतामध्ये येत्या आठवड्यात पोचते केले जाणार आहेत. सध्याची रुग्णालये, आरोग्यसेवा युनिट्स आणि मोबाईल युनिट्स याठिकाणी ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांसाठी अतिरिक्त केस लोड म्हणून स्टेशनरी युनिट्स स्वरूपात तैनात केले जातील.

विश्वसनीय आणि मध्यम कालावधीच्या पुरवठा शृंखला

ग्रीनको ग्रुप हा भारतातील सर्वात मोठ्या शुद्ध ऊर्जा कंपन्यांपैकी एक आहे. भारतातील विविध राज्यांना अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजन सिलिंडर्स यांचा पुरवठा सातत्याने होत राहावा यासाठी मुत्सद्दी, भौगोलिक-राजकीय आणि लॉजिस्टिकल चॅनेल्समार्फत विश्वसनीय आणि मध्यम कालावधीच्या पुरवठा शृंखला निर्माण करण्यावर या कंपनीने आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

देशाला मदत होणार

देशाला पैशांची व पैशांव्यतिरिक्त इतर मदत मोठ्या प्रमाणावर मिळाली ही खूपच चांगली बाब आहे पण अत्यावश्यक उपकरणे व वस्तू स्थानिक पातळीवरून आणि जगभरातून उपलब्ध करवून देण्यासाठी प्रचंड क्षमतेच्या पुरवठा शृंखला उभारण्यावर आपण लक्ष केंद्रीत केले पाहिजे.  आम्ही ग्रीनको ग्रुपमध्ये ज्या पुरवठा शृंखला उभारल्या आहेत त्यामध्ये ५००० पेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेटर्स व सिलिंडर्स सातत्याने पोहोचवण्याची क्षमता असून त्यामुळे महामारीविरोधात लढण्यात व देशाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी खूप मोठी मदत होईल अशी आशा आहे, असं अनिल चलमालाशेट्टी म्हणाले.  

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!