शेअर बाजार पडत असतानाही अशी करा चांगली कमाई…

अर्जुन धस्के | प्रतिनिधी
मुंबई : करोनामुळे शेअर बाजारातील उतार चढावांनी गुंतवणूकदार धास्तावले आहेत. अशात कुठे पैसे लावावेत, गुंतवणूक कशी करावी, मार्केट रिस्क काय आहे, याबाबत अनेकजण साशंक आहेत. कोरोना काळात गुंतवणूकदारांना तब्बल कोट्यवधींचं नुकसान सहन करावं लागलं आहे. मात्र अशातही काही चतुर आणि हुशार गुंतवणूकदार आहेत, ज्यांनी या कठीण काळातही आपला अनुभव पणाला लावत चांगली कमाई केली. हुशार गुंतवणूकदार पडत्या काळातही योग्य गुंतवणूक करुन चांगली कमाई करतात. शेअर बाजारात उतार चढाव चालूच राहतात. मात्र करोनासारख्या महामारीतमध्ये नेमकी कशी गुंतवणूक केली की फायदा होईल, याच्याही काही युक्त्या आहेत. अशीच एक युक्ती आहे, ज्याला म्हणतात शॉर्ट सेलिंग.
शॉर्ट सेलिंग म्हणजे काय?
जसं शेअर बाजारात लेकं कमी किंमतीत शेअर खरेदी करतात आणि महाग किंमतीत विकून फायदा करुन घेतात. तसंच जास्त किंमतीत शेअर विकून आणि पुन्हा स्वस्त किंमतीत शेअर विकूनही फायदा कमावता येऊ शकतो. शेअर बाजारात ट्रेडिंगचा असाही एका प्रकार असतो. यामध्ये जेव्हा शेअरचा भाव जास्त असता तेव्हा शेअर विकला जातो आणि तोच शेअर स्वस्त झाल्यावर खरेदी केला जातो.
उदाहणातून समजून घेऊ…
समजा आज शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरची किंमत 2200 रुपयांच्या आसपास आहे. शेअरचा भाव वाढून 2230 रुपये इतका झाला. पण तुम्हाला जर असं वाटलं की आज रिलायन्सच्या शेअर भाव पडणार आहे, तर तुम्ही शेअर 2230 रुपयांना विकू शकता. संध्याकाळपर्यंत हाच भाव 2200 रुपयांपर्यंत पुन्हा आला, तर तोच शेअर 2200 रुपयांना तुम्ही खरेदी करु शकता. अशाप्रकारे तुम्ही प्रति शेअर 30 रुपयांची कमाई करु शकता.
खरेदी न करता शेअर विकणार कसा?
शॉर्ट सेलिंग माहीत नसणाऱ्या अनेकांना हा प्रश्न पडतोच. शेअर खरेदी केलेलाच नसेल, तर तो विकणार कसा, असा प्रश्न अनेकांना पडतो. जर एखादी गोष्ट आपण खरेदी केली असेल, तरच आपल्याला ती विकता येऊ शकेल. पण शेअर बाजार ट्रेडिंगमध्ये अशीच एक खास सुविधा आहे. खरेदी न करताही तुम्हाला शेअर विकता येतो आणि नंतर तोच शेअर खरेदीही करता येतो. मात्र, शेअर विकत असताना तुमच्या ट्रेडिंग अकाऊंटमधून शेअरच्या किंमतीचे पैसे कापले जाणार, हे नक्की. म्हणजेच तुम्ही शेअर खरेदी करा किंवा विका, दोन्ही प्रक्रियेत पैसे तर द्यावे लागणार आहेतच. मात्र विक्री आणि खरेदीच्या मार्जिनमध्ये तुमचा फायदा किंवा नुकसान किती होतं, यावर सगळी कमाई अवलंबून आहे.