#Good News : होम लोन झालं स्वस्त!

सणासुदीसाठी व्याजदर कपात

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : बँक ऑफ बडोदाने रेपो दरावर आधारित कर्जावरील व्याजदरात (बीआरएलएलआर) 0.15 टक्क्यांची कपात केल्याचं शनिवारी जाहीर केलं. त्यामुळे आता गृहकर्जांसाठी (Home Loan) 6.85 टक्के दरानं व्याज आकारण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक नोव्हेंबरपासून करण्यात येईल.

या निर्णयामुळे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि वैयक्तिक कर्जे घेणाऱ्या ग्राहकांचा फायदा होणार आहे, असे मत बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक हर्षदकुमार सोळंकी यांनी व्यक्त केलं. तत्पूर्वी बँकेनं दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर गृह आणि वाहन कर्जांवर सवलत देण्याचं सूतोवाच केलं होतं. रेपो दरावर आधारित व्याजदरात कपात केल्यामुळ गृहकर्जांवर 6.85 टक्के, वाहन कर्जांवर 7.10 टक्के आणि शैक्षणिक कर्जांवर 6.85 टक्के दराने व्याज आकारण्यात येणार असल्याचं बँकेनं निवेदनात नमूद केलंय.

शुल्क आकारणीबाबत दिलासा

सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाने 30 लाखांवरील गृह कर्जासाठी व्याजदर 10 बीपीएसने कमी केले आहेत. महिला कर्जदारांना आणखी सवलत मिळणार असून, अशा प्रकारच्या कर्जांसाठी वरील कर्जांपेक्षा आणखी 5 बीपीएस सवलत मिळेल. 31 डिसेंबर 2020 पर्यंत गृहकर्जासाठी शून्य प्रक्रिया शुल्क आकारले जाईल. यासोबतच युनियन बँक ऑफ इंडियाद्वारे कर्जाचा ताबा घेतला गेल्यास 10 हजार रुपयांपर्यंतचे कायदेशीर तसेच मूल्यांकन शुल्क माफ केले जातील. व्याजदरातील या सवलती 1 नोव्हेंबर 2020 पासून लागू झाल्या आहेत. कार आणि शैक्षणिक कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.

बँक ऑफ बडोदाच्या शुल्कात वाढ

एक नोव्हेंबरपासून बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना बचत खात्यामध्ये दरमहा केवळ तीनवेळा रक्कम भरता येणार आहे. चौथ्यांदा रक्कम जमा केल्यास त्यांना 40 रुपये द्यावे लागणार आहेत. जनधन खातेधारकांना थोडा दिलासा मिळाला आहे. त्यांना कितीही वेळा रक्कम जमा करता येणार आहे. मात्र, रक्कम काढल्यास त्यांना 100 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!