#GOOD NEWS : कर्जदारांना चक्रवाढ व्याज मिळणार परत

केंद्रानं दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिली दिलासादायक बातमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कर्जदारांना दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) काळातील व्याज रकमेवरील चक्रव्याढ व्याज रकमेत सूट देण्याचा आदेश दिला असून नियमावली जाहीर केली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या या निर्णयाचा फायदा दोन कोटींपर्यंतचं कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना मिळणार आहे. केंद्रानं दिवाळीच्या आधी कर्जदारांना ही दिलासादायक बातमी दिलीय.

दोन कोटींपर्यंतच्या कर्जदारांना दिलासा

या आदेशानुसार दोन कोटींचं कर्ज असणारे कर्जदार ज्यांनी मार्च ते ऑगस्ट असे सहा महिने मोरॅटोरियम सुविधा घेतली होती, त्यांची चक्रव्याढ व्याज रक्कम परत केली जाणार आहे. 14 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी सुनावणी करताना सरकारला लवकरात लवकर पावलं उचलण्याचा आदेश दिला होता. अर्थ मंत्रालयाच्या निर्णयाचा फायदा लघू, लघू व मध्यम, शैक्षणिक, गृह, क्रेडिट कार्ड, ऑटोमोबाइल, वैयक्तिक, व्यवसायिक कर्जदारांना होणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार 29 फेब्रुवारीपर्यंत कर्जदाराची थकबाकी दोन कोटींच्या पुढे असता कामा नये. माफ करण्यात आलेली चक्रव्याढ व्याज रक्कम संबंधित बँकांकडून खातेदारांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

बँकांना सरकारकडे परतफेडीचा दावा करण्याची मुभा

ही रक्कम 5 नोव्हेंबरला किंवा त्याच्या आधी कर्जदाराच्या खात्यात जमा करावी लागणार आहे. यानंतर बँका 12 डिसेंबपर्यंत सरकारकडे परतफेडीसाठी दावा करु शकतात. या निर्णयामुळे केंद्राला 6500 कोटींचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.

करोना संकटामुळे मिळाली होती सूट

करोना संकटामुळे रिझव्‍‌र्ह बँकेने 27 मार्चला कर्जदारांना आर्थिक ताणातून दिलासा म्हणून, मासिक हप्त्यांची परतफेड लांबणीवर टाकण्याची मुभा देणारा निर्णय घेतला. प्रारंभी तीन महिन्यांच्या मुदतीसाठी असलेला हा निर्णय आणखी तीन महिने म्हणजे 31 ऑगस्ट 2020 कालावधीपर्यंत वाढविण्यात आला होता. बँकांकडून मासिक हप्त्यांमधील मुद्दल अधिक व्याज यापैकी मुद्दल रकमेची वसुली लांबणीवर टाकली गेली असली तरी, न फेडलेल्या हप्त्यांमधील व्याजाची रक्कम थकीत मानून त्यावर थकलेल्या कालावधीत व्याज आकारले जाईल, अशा रितीने ही योजना कर्जदार ग्राहकांपुढे ठेवली होती.

या विषयावरचं फेसबुक लाईव्ह पहा…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!