आनंदाची बातमी! महागाई भत्त्यामध्ये नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात वाढ

नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात खूशखबर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात येणार आहे. नेमकी ही वाढ किती करण्यात आली येईल? जाणून घ्या संदर्भातलं सविस्तर वृत्त.

4 टक्के वाढ निश्चित

राज्यासोबत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनी नव्या वर्षापासून म्हणजेच जानेवारी 2021 पासून महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ निश्चित आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा एकूण महागाई भत्ता आता 28 टक्के होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात यापूर्वी जुलै 2020 मध्ये 3 टक्के वाढ करण्यात आलेली. त्याआधी जानेवारी 2020 मध्ये 4 टक्के वाढ करण्यात आली होती. आता जानेवारी 2021 मध्ये देय असलेली 4 टक्के वाढ झाल्यानंतर एकूण वाढ 11 टक्के होणार आहे. दरम्यान, सरकारने सध्या महागाई भत्त्यातील वाढ गोठवलेली आहे. त्यामुळे वाढीव महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही.

एकूण 28 टक्के वाढ

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळतो. आता एकत्रित 11 टक्के वाढीसह तो दिला जाणार असल्यानं नव्या वाढीसह महागाई भत्ता तब्बल 28 टक्के इतका होणार आहे.

सरकारने महागाई भत्त्यात केलेल्या वाढीचा फायदा केंद्र सरकारच्या 50 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्याचबरोबर 60 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांनाही वाढीव महागाई भत्त्याचा फायदा मिळेल. विविध राज्यांच्या कर्मचाऱ्यांनाही सरकारच्या या निर्णयाचा लाभ होणार आहे.

महामारीचा फटका

कोरोना संकटात महागाई भत्त्यावरून यंदा केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पदरी निराशा पडली होती. कारण सरकार महागाई भत्ता हा जुन्या दरानेच देणार होतं. नवीन दराने लाभ होण्याची अपेक्षा होती. पण कोरोनाच्या संकटामुळे सरकारने आहे त्याच दरात महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला. महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. परंतु कोरोना संकटामुळे केंद्र सरकारच्या सरकारी तिजोरीवर मोठा परिणाम झाला. महागाई भत्त्यावर जून 2021 नंतरच कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना सरकार सवलत देऊ शकेल, अशी शक्यताही नोव्हेंबरमध्ये वर्तवण्यात आली होती. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीनं यासंदर्भातलं वृत्त दिलंय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!