गोवा सरकारला लॉटरीचा आधार

23 पासून साप्ताहिक लॉटरी, दररोज तीन लॉटर्‍यांचे निकाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्य सरकारने राज्यात दहा रुपये किमतीच्या 28 नवीन साप्ताहिक लॉटरी सुरू केल्या आहेत. यासाठी दरदिवशी चार वेळा निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. 23 नोव्हेंबरपासून साप्ताहिक लॉटरी सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतची अधिसूचना अर्थ खात्याचे अव्वल सचिव प्रणब भट यांनी जारी केली आहे.

राज्यात अनेक वर्षे बंद असलेली लॉटरी सुरू केली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक लहान लॉटरी व्यावसायिकांना काही प्रमाणात धंदा उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने डिअर शुभलक्ष्मी साप्ताहिक लॉटरी या वेगवेगळ्या नावाने 28 लॉटरी सुरू केल्या आहेत. यासाठी फ्यूचर गेमिंग अ‍ॅन्ड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांची वितरक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रत्येक लॉटरीचे वेगवेगळे नाव ठेवण्यात आले असून प्रत्येक दिवशी चार लॉटरीचे निकाल मशिनद्वारे काढण्यात येणार आहेत. यासाठी सकाळी 11.20 वाजता, सायंकाळी 4 वाजता, सायंकाळी 6 वाजता आणि रात्री 8.40 वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निकाल आल्तिनो-पणजी येथील आकाशवाणी केंद्राजवळ सेर्रा इमारतीत असलेल्या लघूबचत आणि लॉटरी संचालनालयच्या कार्यालयात काढण्यात येणार आहेत.

यासाठी प्रत्येक लॉटरीची किंमत दहा रुपये ठरविण्यात आली असून प्रत्येक साप्ताहिक लॉटरी 0000 ते 9999 क्रमांकापर्यंत अशा 10 हजार तिकिटे काढली जाणार आहेत. प्रथम एक बक्षीस 10 हजार रुपयांचे, द्वितीय पाच बक्षिसे 5000 रुपयांची, तृतीय 10 बक्षिसे 500 रुपयांची, चौथे 10 बक्षिसे 300 रुपयांची, पाचवे 10 बक्षिसे 200 रुपयांची, तर सहावे 100 बक्षिसे 100 रुपयांची, अशी एकूण 55 हजार रुपयांची बक्षिसे प्रत्येक लॉटरीसाठी असणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!