हा शेतकरी कमावतोय 10 लाख! या पद्धतीचा अवलंब…

Goan Varta Live | प्रतिनिधी
म्हैसूरः शेतकऱ्याचं जीवन हे पाण्यावर अवलंबून असतं, असं म्हटलं जातं. कृषिप्रधान भारतात काही ठिकाणी पूरस्थिती नित्याची असते तर अनेक भागांत दुष्काळाचं चित्र असतं. म्हैसूरसारख्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील हनसूर भागातील थमय्या पी. पी. या शेतकऱ्यानं मात्र केवळ एक एकर जमिनीत कमीक कमी पाण्याचा वापर करत वर्षाला तब्बल 10 लाखांची कमाई केली आहे. आश्चर्य वाटलं ना. हो. हे खरंच आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यानं रासायनिक खतांना पूर्णपणे फाटा देत हे साध्य केलंय.
थमय्यानं अपारंपरिक मानल्या जणाऱ्या स्वयंपूर्ण अशा शेती पद्धतीचा अवलंब करत हे उद्दिष्ट गाठलंय. बहुस्तरीय शेतीच्या साह्यानं 50 टक्के कमी पाणी वापरून त्यानं एक आदर्श घालून दिलाय. थमय्याच्या भूखंडावर आपल्याला 300 विविध प्रकारची उत्पादनं पाहायला मिळतात. यात नारळ, फणस, पालेभाज्या, आंबा, सुपारी, केळी तसेच काळी मिरी आदींचा समावेश आहे.
दबेटरइंडिया संकेतस्थळाला दिलेल्या माहितीत थमय्या सांगतो की तो आपल्या पिकांना रासायनिक खतं घालायचा. त्यांना सेंद्रिय खतांची सवय व्हायला वर्ष लागलं. सुरुवातीचा काही काळ पीक कमीच यायचं. नंतर मी विविध प्रकारची पिकं एकाच ठिकाणी घेण्याच्या बहुस्तरीय पद्धतीची प्रत्यक्ष पाहणी केली. हा पर्याय व्यावहारिक वाटल्यानं एक एकर जमिनीत त्याचा प्रयोग करून पाहिला. आणि आश्चर्य म्हणजे तो सफल झाला.
काय आहे ही पद्धत
थमय्यानं सुरुवातीला एक एकर जागेत पूर्व आणि पश्चिम दिशेला प्रत्येकी ३० फूट अंतरावर माड लावले. त्यानंतर त्यांच्या मधोमध चिकू लावले. चिकूंच्या मधोमध केळीची झाडं लावली. माडांच्या सावलीखाली सुपारीची रोपटी आणि त्यावर काळ्या मिऱ्यांची वेल चढवली. उत्तर आणि दक्षिणेला आंबा, जांभूळ, फणस आणि या झाडांच्या सावलीत मूग डाळ, लिंबू, शेवग्याची रोपटी लावली. हिरव्या पालेभाज्यांचं बियाण याच ठिकाणी पेरलं. जमिनीत हळद, सुरण, आलं, गाजर आणि बटाट्याचं पीक घेतलं. याशिवाय आवळा, कॉफी, सीताफळ, चंदन तसेच इतर 140 औषधी वनस्तपींची लागवड केली.
कसा झाला फायदा
हळदीमधील घटकांमुळं मातीतील जीवाणू नष्ट झाले. भाज्यांमुळं नड गेली. माडामुळं खालील झाडांना गरजेनुसार सावली व ऊन दोन्ही मिळालं. कापणीवेळी झाडं न कापता ती मुळापासून काढली. यामुळं मातीत पाणी, प्राणवायू तसंच सूर्यकिरणं खोलवर जाऊन मातीतील घटक वाढण्यास मदत झाली. भाज्या, झुडपांमुळं पाण्याचा स्तर रखला गेला. उंच झाडांमुळं मातीची धूप होण्यापासून रोखण्यात आली. पारंपरिक शेतीत एकावेळी 20 हजार लीटर पाणी आवश्यक असल्यास अशा पद्धतीच्या शेतीत केवळ 6 हजार लीटर पाण्यानं भागवलं जाऊ शकतं.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्याच्या बागायतीतील पिकं बारमाही असल्यानं ठरावीक मोसमातच त्याचा फायदा होतो, असं नाही. वर्षाचे बाराही महिने तो आपलं वेगवेगळं उत्पादन बाजारात विकू शकतो. माडापासून कायम ३०० नारळ मिळतात. केळ्यांचं पिक दर आठवड्याला मिळतं. तर औषधी वनस्पती दर दिवशी फायदा करून देतात.