EXCLUSIVE STORY | धारगळ बनणार पंचतारांकित डेस्टीनेशन

डेल्टा कंपनीकडून विविध प्रकल्पांचे नियोजन

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने अलिकडेच मंजूर केलेल्या 7 प्रस्तावांत पेडणे तालुक्यातील धारगळ पंचायत क्षेत्रात मोठ्या पंचतारांकित प्रस्तावांचा समावेश आहे. डेल्टा प्लेजर कॉर्प कंपनी, जी राज्यात कॅसिनो व्यवसाय चालवते त्या कंपनीचे हे प्रकल्प आहेत. स्थानिक पातळीवर या प्रकल्पासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पंचायत मंडळही अनभिज्ज्ञ आहे. पेडणेचे आमदार तथा उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगांवकर हे पर्यटनमंत्री या नात्याने मंडळावर असताना त्यांनीही या प्रकल्पांची माहिती स्थानिकांपासून का लपवली,असा सवाल उपस्थित होतो आहे.

पेडणे तालुक्यातील धारगळ पंचायत क्षेत्रात सुमारे 4 लाख 27,050 चौ. मीटर जागेत हे प्रकल्प उभारण्याची योजना आहे. या विविध प्रकल्पांतून अंदाजे 4 हजार रोजगारसंधी उपलब्ध होतील, असा दावा कंपनीने केला आहे. प्रस्तावित मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने हे प्रकल्प उभे राहणार आहेत. हे प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास संपूर्ण पेडणेचा चेहरामोहराच बदलणार असून यात स्थानिकांवर मात्र अस्तित्वाचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

काय आहेत प्रकल्प ?

सदर कंपनीकडून सादर केलेल्या प्रस्तावात या प्रकल्पांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पंचतारांकित पाच हॉटेल्स, कन्वेन्शन सेंटर, मल्टीप्लेक्स सिनेमा, रिटेल एरिया, इलेक्ट्रॉनिक कॅसिनो, वॉटर पार्क, बॅन्कवेट सुविधा, चिल्ड्रन्स इंण्टरटेर्नमेंट एरिया यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे धारगळ पंचायत क्षेत्रातील 19 वेगवेगळ्या सर्वे क्रमांकात हे प्रकल्प येणार आहेत.

खोटी मालकी आणि सरकारी जमिनींचा सौदा

डेल्टा प्लेजर कॉर्प कंपनीला विकण्यात आलेली काही जमिन ही खोटे वारसदार दाखवून आपल्या नावे करून परस्पर विकलेली जमिन असल्याचे पुरावे हाती आले आहेत. यापैकी काही जमिन ही खुद्द सरकारचीच आहे. ही सरकारी जमिन गैरमार्गाने आपल्या नावे करून परस्पर विकण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे. हे प्रकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंत पोहचले आहे. त्यांनी यासंबंधी चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. आता ते नेमकी खरोखरच चौकशी करतात की जमिन दलालांच्या दहशतीला बळी पडतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल, अशी प्रतिक्रिया पेडणेत उमटली आहे.

शेतजमिन आणि ओलीत क्षेत्राचा गैरवापर

हे प्रकल्प होऊ घातलेल्या जमिनी हा शेतजमिनी आहेत. तिळारी पाटबंधारे प्रकल्पाव्दारे शेतीसाठी पाण्याची सोय केलेल्या या जमिनी ओलीताखाली आणण्याचे सोडून या जमिनी आता अशा गैरशेती प्रकल्पांसाठी उपयोगात आणल्या जाणार आहेत. आयपीबीअंतर्गत परवान्यांसाठी एक खिडकी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत या जमिनींचे रूपांतर करून या प्रकल्पांचा मार्ग मोकळा करण्याचा घाट सरकारी पातळीवर होणार असल्याचीही खबर आहे.

जयदेव मोदींसमोर कुणाचे चालणार

डेल्टा प्लेजर कॉर्प लिमिडेट ही जयदेव मोदी यांची कंपनी आहे. कॅसिनो उद्योगातील शहेनशाह अशी त्यांची ख्याती आहे. त्यांचा मोठा राजकीय दबदबा असल्यामुळे कोणतेही अशक्य काम ते शक्य करून दाखवतात,अशी चर्चा आहे. त्यांच्यासाठी राज्य सरकार लाल गलीचा घालून देणार असल्याने भूरूपांतर हे सहज शक्य आहे,अशी प्रतिक्रिया जाणकारांनी दिली.

खरंच अल्वारा जमीन सरकारच्या मालकीची?

जमिनींसाठी राजकीय दलाली

धारगळ पंचायत क्षेत्रातील या जमिनी डेल्टा कंपनीला विक्री करण्याच्या व्यवहारात विद्यमान सरकारातील काही मंत्री आणि त्यांचे जवळीक सहभागी आहेत,अशी जोरदार चर्चा सुरू आहे. प्रादेशिक आराखडा – 2021 च्या अनुषंगाने या जमिनींचे व्यवहार झाले होते. परंतु आराखड्यात अपेक्षित सेटलमेंटची इच्छापूर्ती न झाल्यामुळे या जमिनी परस्पर विकण्यात आल्या. यातील अनेक जमिनींची विक्रीखतं 8 ते 15 वेळेली झालेली आहेत. मुळातच या जमिनींच्या मालकी हक्कांबाबत संशय आहे. हे ओळखूनच या जमिनी डेल्टा कॉर्प कंपनीला विकण्यात आल्या असून त्यांचा राजकीय दबदबा असल्याने हे सगळे गैरव्यवहार लपतील,अशी योजना आहे.

हेही वाचा –

रेल्वेदुपदरीकरणाविरोधात संघर्ष! मध्यरात्री जनसागर उसळला!

मुंबईत जायचा विचार करत असाल तर ही आकडेवारी तुमच्यासाठीच!

भाजपच्या चुकीला माफी नाही!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!