कोळसा कर : जिंदाल, अदानीसह 19 कंपन्यांना डिमांड नोटिशी जारी

२१४ पैकी केवळ ६ कोटीच फेडले!

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पणजी : राज्यात कोळसा हाताळणी करणाऱ्या जिंदाल, अदानीसारख्या 19 कंपन्यांनी 2014 ते 2018 या चार वर्षांत गोवा ग्रामीण सुधारणा आणि कल्याण कराबाबत राज्य सरकारची मोठी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या चार वर्षांत 214.74 कोटींपैकी केवळ 6 कोटी 93 हजार रुपयेच भरत दरवर्षी अब्जावधींची उलाढाल करणाऱ्या कंपन्यांनी कोळसा कर कायद्याला बगल देण्याचा प्रयत्न केला आहे.

जेएसइडब्लू स्टील लिमिटेड, जेएसइडब्लू एनर्जी, सेसा, बीएमएम इस्पात, अदानी, वेदांता, वेस्ट कोस्ट पेपर मिल्स, श्रद्धा इस्पात, गुजरात एनआरई, अल्ट्रा टेक, संदूर मँगनीज अँड आयर्न ओर, ग्रासीम इंडस्ट्रीज, ट्राफिगुरा इंडिया प्रा. लि., शिव शक्ती, अगरवाल कोल कंपनी, एमएस मेटल, सातवाहन इस्पात लिमिटेड, प्रतिक अॅलो लिमिटेड आणि क्रिशिजा इस्पात या 19 कंपन्या गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात कोळसा हाताळणी आणि वाहतूक करतात. 2014 ते 2018 या चार वर्षांत या कंपन्यांनी सुमारे 4.29 कोटी मेट्रिक टन कोळशाची हाताळणी केली आहे. गोवा ग्रामीण सुधारणा आणि कल्याण करापोटी प्रति टन 50 रुपयांप्रमाणे 214.74 कोटी या कंपन्यांनी सरकारला देणे बंधनकारक होते. पण या चार वर्षांत सरकारला केवळ 6 कोटी 93 लाख 450 रुपयेच मिळाले आहेत. उर्वरित 208.73 कोटी रुपये देण्यास मात्र या कंपन्यांनी टाळाटाळच केली आहे.

करोना काळात राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थितीतून जात असतानाही या कंपन्यांनी थकित कर भरला नाही. शिवाय राज्य सरकारच्या वाहतूक खात्यानेही ही बाब गांभीर्याने घेतलेली नव्हती. ‘गोवन वार्ता’ने करोना काळातील चार-पाच महिन्यांत हा विषय लावून धरल्यानंतर अखेर वाहतूक खात्याने कर वसुलीची प्रक्रिया सुरू केली. ‘गोवन वार्ता’च्या यासंदर्भातील वृत्तांची दखल घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यानंतर वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनीही कोणत्याही परिस्थितीत या कंपन्यांकडून थकित कर वसूल करण्याचे आदेश वाहतूक खात्याला ​दिले होते. त्यानुसार वाहतूक खात्याने कर थकविलेल्या सर्वच कंपन्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिशी जारी करून सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते.

गेल्या महिन्याभरात वाहतूक खात्याने कर थकवलेल्या कंपन्यांच्या सुनावण्या घेतल्या. त्यावेळीही या कंपन्यांनी कर भरण्यास स्पष्टपणे नकार दिला. रेल्वेतून कोळसा वाहतूक करताना प्रदूषण होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतो. कोळशावर आवरण पांघरून त्याची रेल्वेतून वाहतूक केली जात असल्याने प्रदूषण होत नाही. त्यामुळे आम्ही गोवा ग्रामीण सुधारणा आणि कल्याण कर भरणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे आक्रमक झालेल्या वाहतूक खात्याने सर्वच कंपन्यांना डिमांड नोटिसा जारी केल्या आणि 15 दिवसांत थकित कर भरण्याचे निर्देश जारी केले आहेत.
गोवा ग्रामीण सुधारणा आणि कल्याण कर 2006 या कायद्यातील तरतुदीनुसार मुरगाव बंदर ट्रस्टवर (एमपीटी) कोळसा उतरला की दंड लागू होतो. याच तरतुदीनुसार राज्य सरकार कर थकविलेल्यांकडून वसुली करेल. कर न भरल्यास तुरुंगवास किंवा 2.50 लाखांचा दंडही होऊ शकतो, असा इशाराही वाहतूक खात्याच्या दक्षिण गोवा सहाय्यक उपसंचालकांनी या कंपन्यांना जारी केलेल्या डिमांड नोटिशीतून देण्यात आला आहे.

असा थकवला कर (2014 ते जुलै 2018)

जेएसइडब्लू स्टील लिमिटेड : 156.35 कोटी
जेएसइडब्लू एनर्जी : 12.66 कोटी
सेसा : 11.68 कोटी
बीएमएम इस्पात : 10.49 कोटी
अदानी : 7.15 कोटी
वेदांता : 3.2 कोटी
वेस्ट कोस्ट पेपर मिल्स : 2.62 कोटी
श्रद्धा इस्पात : 1.72 कोटी
गुजरात एनआरई : 74.16 लाख
अल्ट्रा टेक : 1.8 कोटी
संदूर मँगनीज : 34.59 लाख
ग्रासीम इंडस्ट्रीज : 23.50 लाख
ट्राफिगुरा इंडिया : 17.57 लाख
शिव शक्ती : 17.50 लाख
अगरवाल कोल कंपनी : 12.77 लाख
एमएस मेटल : 2.50 लाख
सातवाहन इस्पात लिमिटेड : 4.30 लाख
प्रतिक अॅलो लिमिटेड : 6.23 लाख
क्रिशिजा इस्पात : 50 हजार

काय आहे ‘गोवा ग्रामीण सुधारणा आणि कल्याण कर’?

  1. कोळसा, कोक आणि खनिजाच्या वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाची भरपाई करण्यासाठी 2000 मध्ये कर लादण्यात आला.

2. करातून ग्रामीण भागांतील पायाभूत आणि वैद्यकीय सुविधा निर्माण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले.

3. 16 ऑक्टोबर 2000 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी नियम तयार झाले.

4. जानेवारी 2006 मध्ये नियम अधिसूचित केल्यानंतर 2006 मध्ये हा कर लागू करण्यात आला.

5. 2016 मध्ये राज्य सरकारने या करातून खनिजाची मुक्तता केली. खनिजासाठी जिल्हा खनिज निधी, कायम निधी लागू झाल्याने हा कर त्यांना रद्द करण्यात आला.

6. यांत्रिक पद्धतीने अर्थात ट्रक, बार्ज, रेल्वे आदींतून वाहतूक करण्यात येत असलेल्या कोळसा, कोकवर हा कर लागू आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!