दसऱ्याआधीच दिवाळी! केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, राज्यसरकारी कर्मचाऱ्यांचं काय?

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी: करोना आणि लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचं चक्र संथ झालं आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, त्याचाच एक भाग म्हणून आज ३० लाख विना-राजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, तात्काळ बोनस वितरित करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दसऱ्यापासूनच दिवाळी सुरू होणार आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे.
जावडेकर म्हणाले की,
दसऱ्याच्या अगोदर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) द्वारे कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट बोनसची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कॅबिनेटमध्ये आज 2019-20 साठी प्रोडक्टिव्ह लिंक्ड बोनस (पीएलबी) आणि नॉन प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण 3 हजार 737 कोटी रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. 30 लाख विना-राजपत्रित कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
सीतारामन यांची उत्सवात घोषणा
या अगोदर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्सवांसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये अॅडव्हान्स देण्याची घोषणा केली होती. यंदा सरकारी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 10 हजार रूपयांची योजना लागू केली जाणार आहे. यामध्ये 10 हजार रुपयांची अॅडव्हान्स रक्कम सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. कर्मचारी ही रक्कम 10 हफ्त्यामध्ये जमा करू शकणार आहेत. मार्च २०२१ पर्यंतच ही योजना लागू असणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.