‘या’ कारणामुळे वाढली चारचाकी-दुचाकीची विक्री

स्वत:चे वाहन घेण्याकडे कल. दुचाकी आणि छोट्या चारचाकीच्या विक्रीमध्ये वाढ. सार्वजनिक वाहतुकीचा शहरी नागरिकांनी घेतला धसका.

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : करोनाच्या भीतीमुळे शहरी भागातील नागरिक सार्वजनिक वाहतुकीऐवजी खासगी वाहनाला प्राधान्य देताना दिसत आहे. स्वत:चे वाहन घेण्याकडे कल वाढला असून ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये दुचाकी आणि छोटय़ा चारचाकीच्या विक्रीमध्ये वाढ झाली. ऑगस्ट महिन्यात चारचाकी प्रवासी वाहनांच्या विक्रीत 14.16 टक्के वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सना गुंतवणूकदार पसंती देत आहेत.

ही वाढ करोनापूर्व काळाएवढी असून काही मोटारींची नोंदणी केल्यानंतर ती मिळण्यास महिनाभराची प्रतीक्षा करावी लागत आहे. ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील ही वाढ आशादायक असल्याचे उद्योजक सांगत आहेत. दरम्यान ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोटिव्ह डिलर असोसिएशन’च्या वतीने ऑगस्ट महिन्यात आठ लाख 98 हजार 775 दुचाकींची विक्री झाली आणि गेल्या वर्षीच्या ऑगस्टमधील तुलनेत ही विक्री 28 टक्केहून कमी आहे. पण छोटय़ा मोटारी घेण्याचे प्रमाणही वाढत आहे.

दुचाकी आणि मोटार विक्री क्षेत्रातील एक विक्रेते म्हणाले, ‘गेल्या सहा महिन्यातील पहिले तीन महिने वाहन विक्री शून्य होती. मात्र, आता करोनापूर्व काळातील विक्रीइतका वेग गाठला जात आहे. पाच लाख ते सात लाख रुपये किमतीच्या चारचाकी गाडय़ांची विक्री वाढली आहे.’

करोनामुळे सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्यास अनेक जण घाबरत आहेत. स्वत:चे वाहन असल्यास अधिक सुरक्षित राहू शकतो, अशी मानसिकता निर्माण झाली आहे. दुचाकी असल्यास किंवा छोटी मोटार असेल तर एकटय़ाला किंवा घरातील सदस्यांना घेऊन प्रवास करणे सुकर होऊ शकते. त्यामुळे मागणी वाढली आहे. दसरा, दिवाळीच्या तोंडावर ही स्थिती असते. मात्र, गेल्यावर्षी बीएस-4 इंजिन आणि प्रदूषणामुळे इंजिन बदलावे, असे केंद्र सरकारचे निर्णय असल्याने मंदीसदृश स्थिती निर्माण झाली होती. या वर्षी मार्चनंतर स्थिती अधिक बिघडत गेली, मात्र आता परिस्थिती सुधारत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मोटार वितरण क्षेत्रातील असोसिएशनच्या आकडेवारीनुसार ऑगस्ट हा मोटारविक्रीचा महिना होता. दसरा दिवाळीपर्यंत अशीच स्थिती असेल असेही सांगण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात 1 लाख 78 हजार 513 गाडय़ा विकल्या गेल्या. गेल्यावर्षी ऑगस्टच्या तुलनेत ही संख्या केवळ सात टक्क्यांनी कमी आहे. तीन चाकी विक्रीमध्ये मात्र ही घट 69.51 टक्के असल्याचे दिसून येत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!