यंदा तरी रेती उपशाची परवानगी द्या!

शेखर नाईक | प्रतिनिधी
फोंडा : राज्यात रेती व्यवसायाची प्राचीन परंपरा असून अनेक वर्षांपासून रेती व्यावसायिक याच व्यवसायावर उदरनिर्वाह करत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायात पारंपरिक व्यावसायिक सोडून अन्य लोकांनी अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे. या नवागतांमुळे पारंपरिक व्यावसायिक संकटात सापडले आहेत. नवागतांनी केलेल्या अरेरावीमुळे पारंपरिक व्यावसायिकांचे जगणे कठीण बनले आहे. निदान परवानाधारक पारंपरिक व्यावसायिकांना रेती उपशाची परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी वळवई येथील रेती व्यवसायिकांनी केली आहे.
वळवई गावात गेल्या अनेक वर्षांपासून रेती व्यवसाय सुरू आहे. अनेक कुटुंबे याच व्यवसायावर आपले उदरभरण करत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत या व्यवसायात काही अन्य भागातील युवकांनी घुसखोरी करून अनागोंदी सुरू केल्यामुळे पारंपरिक रेती व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. सरकारने पारंपरिक व्यावसायिकांच्या परवान्यांचे नूतनीकरण करून त्यांना रेती उपशास परवानगी देण्याची मागणी होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून फोंडा तालुक्यातील वळवई आणि सावई भागात मोठ्या प्रमाणात रेती उपसा व्यवसाय चालत आहे. सुरुवातीला केवळ स्थानिकांचा वावर असलेल्या या व्यवसायात मागील काही वर्षांपासून अन्य लोकांनी शिरकाव करून स्थानिकानाच संकटात टाकले आहे. आज परिस्थिती अशी आहे की, या व्यवसायात स्थानिकांपेक्षा बेकायदेशीर रेती उपसा करणारे अन्य भागातील लोक अधिक आहेत. स्थानिक व्यावसायिक पारंपरिक पद्धतीने रेती उपसा करण्याला प्राधान्य देतात, तर इतर भागातील लोकांनी या व्यवसायात आधुनिक पद्धतींचा अवलंब केल्याचे दिसत आहे. त्या बाहेर या व्यवसायात स्पर्धा वाढल्यामुळे पारंपरिक रेती व्यावसायिक हतबल बनल्याचे चित्र आहे.
दरम्यान, वळवई आणि घाणो सावई येथील रेती व्यावसायिकांनी रेती उपशाची तयारी सुरू केली असून होड्यांची दुरुस्ती करण्याबरोबरच सद्यस्थितीत रेती व्यवसायाचा आधारस्तंभ बनलेल्या परप्रांतीय कामगारांना आणण्याची तयारी जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. सरकारकडून रेती उपशाची परवानगी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी बाळगली आहे. परवाने मिळाले नाहीत तर चोरीछुप्या मार्गाने हा व्यवसाय करण्याची तयारीही काही व्यावसायिकांनी केली आहे. सरकारने यासंबंधी ठोस निर्णय घेण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
अद्याप परवाने न मिळाल्याने व्यावसायिकांत चिंता
गेल्या वर्षी खाण खात्याने रेती व्यावसायिकांना रेती उपसा करण्यासाठी परवाने दिले नव्हते. बेकायदेशीर रेती उपसा व्यवसायाविरुद्ध कठोर भूमिका घेतल्यामुळे रेती व्यवसायात मंदी आली. खाण व भूगर्भ खात्याने कारवाया करून रेती उपसा व्यवसाय बंद पाडला होता. याचा फटका पारंपरिक रेती व्यावसायिकांना बसला असून सदर व्यवसाय बंद झाल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर साधारण ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला रेतीउपसा व्यवसाय सुरू होतो. मात्र यंदाही खाण खात्याने परवाने न दिल्याने रेती व्यवसाय सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पारंपरिक रेती व्यावसायिकांत चिंतेचे वातावरण आहे.