स्विचओव्हर! सारेगमप… ते सुरमई, पापलेट

शेखर नाईक | प्रतिनिधी
फोंडा : करोनाने जगभरात हाहाकार माजला असतानाच या विषाणूमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडल्याचीही काही उदाहरणे आहेत. देशासह राज्यात करोनामुळे विविध सरकारी आणि खासगी क्षेत्रातील नोकरदार, छोटे-मोठे उद्योग संकटात सापडले आहेत. अशावेळी सुशिक्षित युवावर्गाकडून दुर्लक्षित अन उपेक्षित राहिलेले काही पारंपरिक व्यवसाय नव्याने उभारी घेत असल्याचे सुखद चित्र दिसत आहे. प्रशासकीय पातळीवर विविध योजना राबवूनही जे पारंपरिक व्यवसाय तग धरू शकले नव्हते ते करोनामुळे पुनरुज्जीवित झाल्याचे चित्र खेड्या-पाड्यात पहावयास मिळत आहे.
मोठ्या प्रमाणात अर्थप्राप्ती असूनही अशाच दुर्लक्षित व्यवसायात गणला जाणारा एक व्यवसाय म्हणजे मासेविक्री. गोमंतकीय जनता मत्स्यप्रेमी आहे, हे सर्वश्रुत आहे. कधीतरी क्वचित हौसेखातर नदीकिनारी जाऊन मासेमारी करण्यात आनंद शोधणारा गोमंतकीय युवावर्ग मासेविक्रीचा व्यवसाय दुय्यम मानीत आला आहे. मात्र, सध्या करोनामुळे हे चित्र बदलत असून राज्यातील विविध भागातील युवावर्ग आज खुलेआम मासेविक्री करताना दिसत आहेत.
कुर्टी-फोंडा येथील असाच एक गायक कलाकार कृष्णा नाईक. गेली अनेक वर्षे संपूर्ण राज्यात तसेच गोव्याबाहेर आपल्या गायनाने रसिकांना तल्लीन करणारा कृष्णा आज गावातच मासेविक्री करीत असून याच व्यवसायावर पत्नी आणि दोन मुलांचे पोट भरीत आहे. कृष्णाने अवघ्या पाच-सहा महिन्यांत यात जम बसविला असून कुटुंब चालवण्यापुरते उत्पन्न नक्कीच हाती येत असल्याचे त्याने सांगितले.
यंदा करोनाच्या संकटामुळे ऑर्केस्ट्रा, वाढदिवस व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे कृष्णाने मासेविक्री करण्याचा निर्णय घेऊन अमलातही आणला आणि आज या व्यवसायात त्याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. कृष्णाची या व्यवसायात कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. मात्र, लहानपणी सकाळच्या सत्रात शाळा व सायंकाळी फोंडा बाजारात मासेविक्री करण्याचा अनुभव कामी आल्याचे त्याने सांगितले. सुरुवातीला जरा अवघड वाटले. मात्र, पोटाची भूक व पोटच्या लहान मुलांचा चेहरा आठवताच कोणतीही भीड राहिली नसल्याचे तो म्हणाला.
सध्या या व्यवसायात स्पर्धा वाढली असून गावागावांत अनेक युवक मासेविक्री करून आपले पोट भरीत असल्याचे तो म्हणाला. मात्र, आपण या बाबतीत सुदैवी असून आपला स्वतःचा ग्राहक तयार करण्यात आपणास यश आले आहे आणि तीच या व्यवसायाची गोम असल्याचे त्याने सांगितले. शिवाय गायक कलाकार म्हणून जी ओळख निर्माण झाली होती, तीही कामी आल्याचे त्याने सांगितले.
कृष्णा हा उत्तम गायक असून आजवर गोव्यातील अनेक ऑर्केस्ट्रा व विविध सांगीतिक कार्यक्रमात त्याने आपली कला सादर केली आहे. ऑर्केस्ट्राबरोबरच वाढदिवस, अन्य कौटुंबिक कार्यक्रम यासह हास्य कलाकार मनोहर भिंगी यांच्यासोबत त्याने गेल्या काही वर्षांत संपूर्ण गोव्यात आपली गायन कला सादर करून रसिकांची दाद मिळवली आहे.
कोणतेही काम लहान वा मोठे असत नाही. तुम्ही ते किती प्रामाणिकपणे करता याला महत्त्व आहे. आजच्या युवावर्गाने कोणत्याही कामासाठी मागे न हटता जिद्द बाळगल्यास सर्व क्षेत्रात भरारी घेणे शक्य आहे.
-कृष्णा नाईक, कुर्टी-फोंडा