बँक, वित्तीय संस्था यांच्याकडून तगादे

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
वास्को : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर आधीच व्यवसाय कमी होत असताना, पिवळी काळी टॅक्सीवाल्यांच्या मागे बँका आणि वित्तीय संस्था वसुलीसाठी हात धुवून मागे लागल्या आहेत. डिसेंबरपर्यंत मुदत देऊनही वाहतूक खाते मुदतीत कर न भरल्याबद्दल दंड वसूल करत आहे. याबाबत संबंधितांनी त्वरित लक्ष घालून थोडी सवलत द्यावी, अशी मागणी या टॅक्सीवाल्यांनी केली आहे.
दाबोळी विमानतळावरील पिवळी काळी टॅक्सीवाल्यांचा व्यवसाय बर्याच प्रमाणात ठप्प झाला आहे. टॅक्सीसाठी ज्यांनी कर्जे घेतली होती त्यांची काही बँका व वित्त पुरवठा कंपन्यांकडून कर्जाचे हप्ते भरण्यासाठी सतावणूक करण्यात येत आहे. वित्त पुरवठा कंपन्यांच्या काही वसुली प्रतिनिधींकडून तर घरी येऊन गाडी नेण्याची धमकी देण्यात येत असल्याचे समजते.
केंद्र सरकारने परवान्यांचे नूतनीकरण, टॅक्स भरण्यासंबंधी डिसेंबरपर्यंत मुदत दिली असतानाही वाहतूक खाते टॅक्स विलंबाने भरल्याबद्दल दंड आकारीत असल्याचा दावा टॅक्सीवाल्यांपैकी काहीजणांनी केला आहे. याप्रकरणी सरकारने लक्ष घालून टॅक्सीवाल्यांना कर्जफेड व टॅक्स दंड प्रकरणातून दिलासा द्यावा, अशी विनंती टॅक्सीवाल्यांनी केली आहे.
कोविड महामारीमुळे दाबोळी विमानतळावरील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमान वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने पिवळी काळी टॅक्सीवाल्यांचा व्यवसाय मार्चपासून ठप्प झाला आहे. व्यवसाय नसल्याने उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. केंद्र सरकार एकीकडे कोविड महामारीच्या संकटामध्ये सापडलेल्यांना साहाय्य करण्यासाठी निरनिराळ्या योजना आखीत आहेत. ज्यांनी कर्ज घेतले होते. त्यांचे ऑगस्टपर्यंत हप्ते घेऊ नयेत, असे भारतीय रिझर्व बँकेने घोषित केले होते. परंतु, बँका, वित्त पुरवठा करणार्या कंपन्यांकडून मात्र कर्जाचे मासिक हप्ते वसूल करण्यासाठी सतावणूक सुरू झाली आहे. त्याचा अनुभव पिवळी काळी टॅक्सीवाल्यांना येत आहे. काही वित्तीय कंपन्यांचे वसुली प्रतिनिधी कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी घरी येण्याचे, गाडी नेण्याची धमकी देतात. त्या हप्त्यांवर व्याज देण्याचा तगादा लावला आहे. यापूर्वी आम्ही कर्जाचे हप्ते चुकविले नाही. परंतु आता कोविड महामारीमुळे आमच्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे तेथे कर्जाचे हप्ते कसे भरणार याचा विचार संबंधितांनी करण्याची गरज आहे, असे या टॅक्सीमालकांचे म्हणणे आहे.
दाबोळी विमानतळावर हळूहळू विमानांची ये-जा सुरू झाली. त्यामुळे काहीजणांनी तेथे प्रवासी वाहतूक करण्यासाठी टॅक्सी उभ्या करण्यास आरंभ केला आहे. पण, प्रवासी न मिळाल्यास त्यांना घरी ते विमानतळ असे ये-जा करण्यासाठी पेट्रोलचा खर्च उचलावा लागत आहे. सध्या २५ टक्के टॅक्सी तेथे येतात. त्यांना चार पाच दिवसांतून एखादे भाडे मिळते. त्यातून त्यांचा पेट्रोल खर्चही सुटत नाही. बर्याच टॅक्सीवाल्यांकडे वाहनांचा वार्षिक विमा भरण्यासाठी पैसेच नाहीत. त्यामुळे वाहनाचा विमा भरला नसल्याने टॅक्सी रस्त्यावर आणता येत नाही. मार्चपासून टॅक्सी बंद आहेत. यासाठी सरकारने विमा हप्त्यामध्ये काही प्रमाणात सूट देण्याची मागणीही टॅक्सीमालकांनी केली आहे.