सोन्याचे भाव भिडतायत गगनाला ! तरीही गोल्ड लोन घेणाऱ्यांना नुकसान का ? जाणून घ्या कारणें

ऋषभ | प्रतिनिधी
देशात सोन्याचा भाव 60 हजारांच्या पुढे गेला आहे. मात्र, याचा फायदा सुवर्ण कर्ज घेणाऱ्यांना होत नाही. उलट तोटा तुम्हालाच सहन करावा लागतो. तुम्ही विचार करत असाल की जेव्हा सोन्याची किंमत विक्रमी उच्चांकावर असेल, तेव्हा सोने कर्ज घेणाऱ्यांना फायदा होईल की त्यांना त्यांच्या सोन्याच्या किमतीच्या आधारे अधिक कर्ज मिळेल, पण तसे का होत नाही? सोन्याच्या किमतीत मोठी उडी घेतल्यानंतर NBFC आणि बँकांनी लोन टू व्हॅल्यू रेशो (LTV) कमी केल्यामुळे हे घडत नाही. त्यामुळे दरवाढ होऊनही कर्जदारांना कमी कर्ज मिळत आहे.

लोन टु वॅल्यू रेशो म्हणजे काय?
लोन टू वैल्यू रेश्यो (LTV) च्या गुणोत्तरावर आधारित गोल्ड लोन दिले जाते. यामध्ये सोन्याच्या मूल्याच्या आधारे कर्जाची रक्कम ठरवली जाते. बँका आणि एनबीएफसी गोल्ड लोनमधील या प्रमाणाच्या आधारे एखाद्या व्यक्तीला कर्ज देतात. कोरोना महामारीनंतर, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सोने कर्जाचे LTV प्रमाण 75 टक्क्यांवरून 90 टक्क्यांपर्यंत वाढवले. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. या वाढीनंतर लोकांना सोन्याच्या किमतीच्या 90 टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळू लागली.

LTVचे प्रमाण आता का कमी झाले?
सोन्याच्या भावाने विक्रमी उच्चांक गाठल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेकजण सुवर्ण कर्ज घेत आहेत. वैयक्तिक कर्जापेक्षा गोल्ड लोन स्वस्त आणि मिळणे सोपे आहे. खेड्यापाड्यातील आणि लहान शहरांतील लोक सोने गहाण ठेऊन कर्ज घेण्यास प्राधान्य देतात. आता सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावर असल्याने आगामी काळात तो खाली येण्याची भीती बँकांना आहे. दुसरीकडे, 90 टक्के एलटीव्हीच्या आधारे कर्ज दिल्यास, कर्ज बुडण्याचा धोका कायम राहील. यामुळे एलटीव्हीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे सोन्यावर अधिक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना निराश व्हावे लागले आहे.