WORLD YOGA DAY | इतिहास गोवा-योगभूमीचा

विश्वस्तरावर 21 जून हा दिवस 'जागतिक योग दिन' म्हणून साजरा केला जातो

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः तपोभूमी संस्थापक, पूर्व पीठाधीश्वर राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी तथा विद्यमान पीठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य मार्गदर्शनाने श्री दत्त पद्मनाभ पीठ तथा सद्गुरु योग गुरुकुल, श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठाच्या माध्यमातून अखंडितपणे सुरु असलेल्या योग कार्याचा इतिहास जागतिक योग दिनानिमित्ताने अनुभवूया… यंदा ७ वा जागतिक योग दिन २०२१ निमित्त २१ जून रोजी, धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य मार्गदर्शनाखाली स. ७ वा. श्री क्षेत्र तपोभूमीवरुन ऑनलाइन माध्यमातून साजरा होणार आहे. चला आपण सर्वजण ऑनलाइन माध्यमातून सहभागी होऊन घरोघरी योग दिन साजरा करूया.

हेही वाचाः सरकारी नोकरीः विक्रमाच्या पाठीवरचा वेताळ

विश्वस्तरावर 21 जून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. योगशास्त्र म्हणजे भारतीय ऋषिमुनींनी विश्वाला बहाल केलेली एक महान देणगी आहे. योगशास्त्राविषयी गोव्याचा जर आपण इतिहास पाहिला, तर गोवाराज्यात योगशास्त्राचे ज्ञान समस्त जनता जनार्दनाला प्राप्त व्हावं या हेतूने राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींनी श्री ब्रह्मानंद योग अनुसंधान केंद्र ही पहिली योगक्षेत्रातील संस्था १९९८ साली श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर प्रारंभ केली. हजारोंच्या संख्येने योगशिक्षक तयार झाले, पुढे पुढे ग्रामपातळीवर याच शिक्षकांच्या माध्यमातून योग प्रशिक्षण वर्ग सुरू करुन समाजाला योग विद्या प्रदान करण्याचं महान कार्य पूज्य सद्गुरु ब्रह्मानंद स्वामीजींनी करून गोव्यात योगक्रांती घडविली. योग विषयातून अनुशासनाचे ध्येय साध्य करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी, सामुदायिक पातळीवर, साप्ताहिक योग वर्ग आदि. माध्यमातून योगासन प्रशिक्षण देण्यात आलं. आज हेच ऐतिहासिक कार्य पूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरु योग गुरुकुलच्या माध्यमातून सुरू आहे.

सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींची संकल्पना आज विश्वपटलावर पोहोचली आहे. योग क्षेत्रातील विविध राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय कॉफरन्सच्या माध्यमातून पूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी गोवा तसंच भारत देशाचेही नेतृत्व करत आहे. पोर्तुगाल, स्विझर्लंड, रोम-इटली, जर्मनी, दुबई, लंडन, चीन अशा देशांमध्ये योग शास्त्रावर आधारित कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग, प्रणवयोग आदि. विषयांवर केलेलं संबोधन प्रेरणादायी ठरत आहेत. हाच वारसा पुढे जात असताना अखिल गोवा योगासन स्पर्धा, राष्ट्रीय योग चँम्पियनशीप, गोवा योग महोत्सव, वर्ल्ड योगा फेस्टिव्हल आदि. विशाल स्वरुपातील कार्यक्रम पूज्य स्वामीजींच्या यशस्वी दिव्य मार्गदर्शनाखाली गोमंतकात संपन्न झाले आहेत.

गोव्याचे समुद्र किनारे हे मौजमजा करण्यासाठी नसून योग प्रशिक्षणासाठी याचं खरंखुरं ज्वलंत उदाहरण २०१८ साली वर्ल्ड योगा फेस्टिव्हलच्या माध्यमातून पूज्य स्वामीजींनी समस्त विश्वाला दाखवून दिलं आणि हीच तर गोव्याची ओळख असून गोवा म्हणजे भोगभूमी नसून योगभूमी आहे असा उपदेशच केला. विश्वस्तरावर भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेली २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करावा ही उद्घोषणा आपल्या भारत देशासाठी अभिमानाची बाब आहेच. पण तपोभूमी संस्थापक राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींची ही स्वप्नपूर्ती आहे. श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर योगशास्त्राचं डिप्लोमा इन योगशास्त्र, योगा टिचर ट्रेनिंग कोर्स यांसारखे विश्वविद्यालय मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय पातळीवर आयोजित होणार्‍या योग स्पर्धांमध्ये योग गुरुकुलातील विद्यार्थ्यांना कित्येक पारितोषिके व सुवर्ण पदके ही प्राप्त झाली आहेत. असे हे योगविद्येचा प्रचार-प्रसार करून ज्ञानदानाचं कार्य अविरतपणे सुरू आहे.

योगशास्त्रावर संबोधित करताना पूज्य स्वामीजी उपदेश करता आहेत की ‘शरीरमाद्यं खलु धर्म साधनम्।’ देवाची जर भक्ती करायची असेल, साधना करायची असेल तर शरीर तंदुरुस्त असलं पाहिजे आणि माणसाला निरामय जीवन मिळावं यासाठी योग सर्वोेपकारी आहेच. पण सर्वोत्कृष्ट आहे. कित्येक जण या योगविद्येकडे व्यायामाचा एक प्रकार म्हणून पाहतात. पण योग हे शास्त्र आहे, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. माणसाला सर्व अडचणींपासून सांभाळणारं असं हे शास्त्र आहे आणि त्यामुळे योग हे शास्त्र म्हणून शिकण्याची आवश्यकता आहे. शरीराचा उत्तम अभ्यास करून कुठल्या अवयवांना कुठला आसनातला प्रकार उपयुक्त आहे हे या आसनांमुळे फायदेशीर ठरतं म्हणून ही आसनं करणं या योगशास्त्रामध्ये सांगितलेली आहेत.

शरीर एक साधन आहे. या शरीराला धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत. हे चारही पुरुषार्थ सिद्ध करावेत, त्यामध्ये मनुष्य तरबेज व्हावा यासाठी या शरीराची आवश्यकता मानलेली आहे. फक्त आसन करणं म्हणजे योग नसून त्यामध्ये अनुशासन असणं अत्यंत आवश्यक आहे. या देशामध्ये जेवढे लोक आहेत त्यांनी अनुशासन राहणं गरजेचं आहे. योग आपल्याला अनुशासन शिकवतो.

अथ योगानुशासनम्। योग म्हणजे अनुशासन. आपल्या जीवनामध्ये शिस्तबद्धता ठेवल्यानं योग प्राप्ती होते. आम्ही अनुशासन प्रिय असलं पाहिजे. आजच्या घडीला मनाच्या शांतीसाठी योगाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. विदेशी लोक अनुशासनामध्ये राहणं पसंत करतात. अनुशासनामध्ये जो राहतो तो सन्मानित होतो, मोठा होतो. तर योग आपला सन्मान वाढवतो. ज्या गोष्टी आपल्या ॠषिमुनींनी आम्हाला दिलेल्या आहेत त्या आपण मोठ्या श्रद्धेने स्वीकारल्या पाहिजेत. योग सर्वांना आरोग्य, आनंद देतो.

निरामय जीवन योगाद्वारेच प्राप्त होतं. ज्या ॠषिमुनींनी हा योग आमच्यापर्यंत पोचवला त्यांच्याप्रती कृतज्ञ राहणं आमचं कर्तव्य आहे. ॠषिमुनींनी आम्हाला हे योगशास्त्र दिलेेलं आहे. त्यांना सन्मान हे योगशास्त्र शिकून सन्मान द्यायचा आहे. साधु, संत, ॠषि, मुनी हे ज्ञान प्रदान करणारे आहेत म्हणून त्यांचा सन्मान तेवढाच महत्त्वाचा आहे. देश-विदेशातला असो, कुठल्याही धर्म, पंथ, जातीचा असो, बाल, तरुण, वृद्ध, स्त्री, पुरुष असो योग त्याला निरामय जीवन प्रदान करतो. योगाद्वारे त्याला शांती प्राप्त होते.

योगमयं विश्वं कुरु। विश्वामध्ये असलेल्या सगळ्या लोकांना योगमय करुया. त्यामुळे ते आनंदमय जीवन जगू शकतील. असा उपदेश श्री दत्त पद्मनाभ पीठाचे क्रांतिकारी पीठाधीश्वर तथा आध्यात्मिक धर्मगुरु, धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी करत आहेत. यंदा विश्वभर ७ वा जागतिक योग दिन साजरा केला जात आहे. श्री दत्त पद्मनाभ पीठ तथा सद्गुरु योग गुरुकुलच्या माध्यमातून २०१७ साली १३५ ठिकाणी, २०१८ साली ५०० ठिकाणी, २०१९ साली १००० ठिकाणी तसंच २०२० साली हर घर योग ही संकल्पना यशस्वी करून गोव्यात एक नवा इतिहासच रचला. नक्कीच या कार्याची दखल सर्व स्तरावर घेतली जाईल ही मनीषा आहे.

लेखकः व्रजेश गुरव, तपोभूमी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!