गोव्यात ‘घाटी’ हा शब्द शिवी असल्यासारखा वापरला जातो, त्यानिमित्त…

घाटी शब्द खरंच टोमणा मारण्यासाठी योग्य आहे का?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

मी भायला. तसा गोव्याच्या शेजारचाच. म्हणजे सिंधुदुर्गातल्या देवगडचा. कोकणी फारशी बोलता येत नाही. पण आता पूर्णपणे कळू लागली आहे. मालवणी भाषा लहानपणापासूनच कळत असल्यामुळे आणि आवडीची असल्यानं कोकणी समजायला फारसा वेळ लागला नाही. खासकरुन कामानिमित्त गोव्यातल्या सोशल नेटवर्कशी जोडला गेलो. या सोशल नेटवर्कमध्ये एक विचित्रच गोष्ट सारखी समोर आली. अनेकजण टीका करताना घाटी शब्द टोमणा मारल्यासारखा किंवा शिवी दिल्यासारखा वापरताना दिसले. अनेक कमेन्ट्समध्ये ‘घाटी’ हा शब्द तिरस्कार करण्याच्या हेतूनंच वापरला गेल्याचं दिसलं. याची फारच गंमत वाटली आणि कुतूहलदेखील.

घाटी म्हणजे काय?

घाटी…. वळणावळणाचा रस्ता असतो, तो घाट. वळणावळणाचा रस्ता चडून वर गेलात की जो प्रदेश लागतो, त्या ठिकाणी राहणारी लोकं म्हणजे घाटी. इतका साधा सोप्पा अर्थ घाटी या शब्दाचा आहे. पण गोव्यात घाटी शब्दाचा अर्थ तसा लावला जात नाही. तो अपमान करण्याच्या हेतूनं किंवा परप्रांतीय, बाहेरचा किंवा ‘भायला’ अशा अर्थानं सर्रास वापरला जातो. मी कोकणातला जरी असलो, तरीही प्रॉपर मुंबईकरच. मुंबईतही घाटी म्हणून एखाद्याकडे पाहिलं-बोललं जातंच. पण त्यामागे अपमान करण्याचा, हिणावण्याचा किंवा तिरस्कार करण्याचा हेतू आतापर्यंत तरी कधीच दिसून आलेला नाही. पण गोव्यात तसं नाही!

कोण आपला? कोण परका?

परप्रांतीय, परराज्यातील किंवा घाटावरची म्हटली जातील, अशी एकूणच जी लोकं गोव्यात वास्तव्यास आहेत, त्यांना गोव्यात एका वेगळ्याच नजरेतून पाहिलं जातं. खासकरुन गोव्यातल्या लोकांकडूनच! सर्वच राज्यात तसं ते पाहिलं जातंच. गोवाही त्याला अपवाद नाही. महाराष्ट्रात, प्रामुख्यानं सुरुवातीला जसा विरोध दक्षिणेतून आलेल्या लोकांना झाला होता, तसा तो पुढे-पुढे उत्तर भारतीयांपर्यंत येऊन पोहोचलेलाय. म्हणजे आधी अण्णा-अण्णा म्हणून हिणवल्यानंतर भैय्या लोकांच्या नावानं बोंबा मारणं महाराष्ट्रात सुरु होऊन आता बराच काळ लोटलाय. मधल्या काळात गुजराती बांधवांवरुनही महाराष्ट्रात राजकारण तापल्याचं दिसून आलेलंय. पण म्हणून अण्णा आणि भैय्या या महाराष्ट्रात शिव्या म्हणून वापरल्या गेल्याचं कधीच पाहण्यात आलं नाही. उलट परप्रांतीय असो किंवा मूळचा मुंबईकर असो, मायानगरी मुंबई सगळ्यांनाच आपलसं करुन घेत आली आहे. ती आपला, परका असा भेद करताना दिसली नाही. कधीच!

मात्र गोव्यात असा भेद आपल्याला दिसतच नाही, असं म्हणता येईलंच असंही नाही. छोटं असण्याच्या मर्यादा असतात, हे लहान मुलांच्या बाबतीत आपण लगेच स्वीकारुन घेतो. पण हाच फॉर्म्युला गोव्यासारख्या छोट्या राज्यालाही लागू पडतोच. छोटं असण्याच्या किती मर्यादा असू शकतात, हे गोव्यात घाटी शब्दाचा टोमणा म्हणून वापर होत असल्याचं पाहून ठसठशीतपणे अधोरेखित होतं. पावलोपावली त्याचे प्रत्यय येत राहतात.

चूक कुणाची?

गोव्यात घाटी शब्द जो टोमणा किंवा शिवी म्हणून वापरला जातो, त्यामागे कारणंही बरीच असू शकतात. नव्हे आहेतच! गोव्यात पश्चिम महाराष्ट्रातून कामासाठी आलेला आणि गोव्यात वास्तव्यास असलेला एक मोठा वर्ग आहे. या वर्गानं नोकरीसाठी म्हणा, किंवा पोटापाण्यासाठी म्हणा किंवा मग व्यवसायासाठी म्हणा गोव्यात येऊन आपला हळूहळू जम बसवलाय. यातील अनेकजण यशस्वीही झालेत, चांगल्याअर्थानं. पण अनेकजण मर्यादित असलेल्या गोव्याला अमर्याद करण्याच्या प्रयत्नात आपण घाटावरचे आहोत, याचं वेगळेपण दाखवून देण्यातच थोरपण मानू लागले. बहुतेक प्रॉब्लेम इथूनच सुरु झालाय.

हेही वाचा : अरे, हे तर आपल्यातलेच..!

पश्चिम महाराष्ट्राची भाषा आणि त्यांचा लहेजा हा एकदम रांगडा आहे. घाटी स्वॅगच मुळात तिखट आहे. त्यांचं बोलणं, वागणं थेट आहे. त्यात कुठेही लपवाछपवी नाहीये. सगळं काही बेधडक. दिलखुलास आहे. तारीफही भरभरुन करतात. आणि भांडणही कचाकचा करतात. जे आहे ते जोरदार आहे. घाटावरचा भाग, प्रामुख्यानं सातारा, कोल्हापूर, कराड, सांगली किंवा मुंबईहून निघाल्यानंतर अगदी खंडाळ्याचा घाट चढून वर पुण्यात आलात, तरिही तिकडे हाच घाटी स्वॅग दिसतो. बडबडी माणसं दिसतात. चांगला वाईटाचा थेट सोक्षमोक्ष आणि बेधडक मतं मांडणारी लोकं पश्चिम महाराष्ट्रात पावला-पावलावर सापडतात. हीच माणसं जेव्हा गोव्यात येतात तेव्हा त्यांची हीच रांगडी ओळख त्यांचा दुश्मन का बनून जाते, हे समजून घेणं प्रचंड कठीण आहे.

पश्चिम महाराष्ट्रातली लोकं गोव्यातल्या लोकांना शहाणपणा शिकवतात, म्हणून गोंयकरांना त्यांचा राग येतो का? की त्यांचा रांगडा, बेधडक, तिखट स्वभाव मऊ आणि मृदू गोंयकरांना दुखावून जातो? या दोन्ही प्रश्नांचा विचार केला की घाटी शब्द गोव्यात टोमणा म्हणून का वापरला जातो, याचं उत्तर कदाचित मिळू शकेलही. पण म्हणून थेट परप्रांतीय, ‘भायला’, मूळचा गोंयकार असलेलाही घाटी कसा काय ठरेल, याचा मात्र विचार लोकं घाटी शब्द वापरताना कितपत करतात, हाही प्रश्नच आहे.

टोमणा लागतच नाही!

बरं घाटी लोकांना खरंच घाटी म्हटलं, तर त्यांना राग अजिबात येत नाही. उलट आपण घाटावरचे आहोत, याचा त्यांना अभिमान आणि स्वाभिमान दोन्हीही आहेच. त्यामुळे घाटावरची माणसं जिथं जिथं म्हणून जातात, तिथं तिथं त्यांचं तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा, एकदम प्रेमानं सांगतात. त्यामुळे गोव्यातील लोकं घाटी म्हणून ज्यांना हिणावण्याचा प्रयत्न जेव्हा करतात, तेव्हा त्याचा काडीमात्र फरक घाटी लोकांवर होणार नाही, याची कणभरही कल्पना गोंयकारांना कशी काय नसेल, याचंही आश्चर्यच वाटतं.

भूमिपुत्र ते भूमी

पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जमीनमालकीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारं एक विधेयक मांडलं. या विधेयकावरुन जोरदार राडा झाला. भूमिपुत्र उल्लेखामुळे अनेकांच्या भावना दुखावल्यात. अखेर पुत्र शब्द टाळून भूमी अधिकारीणी विधेयक नामकरण करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केलं. पण दरम्यानच्या काळात घाटी म्हणून मुख्यमंत्र्यांवरही टीका होत असल्याची पाहायला मिळाली. तशी ती वारंवारच होताना पाहायला मिळते. आता सावंत आडनावामुळे काही जण प्रमोद सावंत सावंतवाडीचे आहेत, असाही टोला लगावतात. पण असं करत असताना प्रमोद सावंतांव्यतिरीक्त जे सगळे मूळचे गोव्यातील सावंत आहेत, ज्यांच्या कितीतरी पिढ्या गोव्यात होऊन गेलेल्यात, त्यांनाही आपण आपल्यापासून थेट वेगळं करतोय, याचंही भान काहींना राहिलेलं नाही.

फार लांब जायला नको. सोनिया गांधींवरही अशाच प्रकारची टीका अनेक वर्ष चालत आलेली आहे. पण यात आपण भारतीय किती सोयीस्करपणे आपली भूमिका बदलून मोकळे होतो, हे यानिमित्तानं नमूद केलं पाहिजे. म्हणजे भारतीय वंशाची कन्या किंवा भारतीय वंशाचा कुणीही व्यक्ती परदेशातील कुण्या एका देशात मोठ्या राजकीय पदावर गेला, की त्याचे गोडवे आणि त्याची कौतुकं आपणच करणार. आणि आपल्याच शेजारच्या, आपल्याच देशातल्या, आपल्यातल्याच एखाद्या व्यक्तीला पुढचा मागचा काहीही विचार न करता परकं करुन मोकळे होणार? अशाप्रकारे गोवा राज्याच्या क्षेत्रफळाइतका छोटा विचार करुन तुम्ही आम्ही नेमकं काय सिद्ध करु पाहत आहोत?

हेही वाचा : कोरोना आणि म्युकरमधून बरा झालेल्या सचिन तुभेची गोष्ट

हेही वाचा : सरकारी नोकरीः विक्रमाच्या पाठीवरचा वेताळ

शिवी नव्हे हा तर स्वॅग!

जन्म कुठे घ्यायचा? हे कुणाच्या हातात आहे का? आणि असलं जरी तरी जगायचं कुठे? करायचं काय? हे ठरवण्याचा मूलभूत अधिकार नाकारणं, जास्त वेदनादायी नाही का? छोटा-मोठा असा भेद होऊच शकत नाही. घाटी म्हणून हिणावल्यानं घाटी लोकांचा अपमान होत नाहीच, हे तर ‘मी शिवाजी राजे भोसले’मधल्या सचिन खेडेकरनंही ठासून सांगितलं होतंच. घाटावर जसा शिवाजी महाराजांना प्रभाव आहे, तसाच तो इथे गोव्यातही आहे, हे विसरुन चालणार नाहीच. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोव्याला हे माहीत आहे की छत्रपतींचे वारसदारही घाटावरचेच आहेत. त्यांनाही गोव्यातील जनता घाटी म्हणून हिणावणार आहे का?

मुळात ‘घाटी’ ही शिवी नसून, तो घाटावरच्या लोकांचा ट्रेडमार्क आहे. ‘घाटी’ हा एक स्वॅग आहे. हां.. पण तो स्वॅग पाहण्यासाठी एकदा पूर्वग्रह बाजूला ठेवून घाटी कुणाला म्हणायचं आणि कुणाला नाही, याचा विचार सूज्ञ असलेली गोव्यातली लोकं करतील का? माहीत नाही!

हेही वाचा : चिपळुणातील महापुराचं कव्हरेज करायला चाललेल्या पत्रकाराचा अंगावर काटा आणणारा अनुभव

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!