तेरा अहंकार, तेरा इगो तुझे मारेगा

गोव्यात असो वा देशभर या अंहकारानेच काँग्रेस पक्षाचा बळी घेतला

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः ‘जयकांत शिकरे, तेरा अहंकार, तेरा इगो (ego) तुझे मारेगा.’ सिंघम चित्रपटातील अजय देवगणच्या तोंडचं हे वाक्य खूप प्रसिद्ध आहे. अहंकाराच्या परिणामांचा आणि दुष्परिणामांचा अनुभव मानवजात नेहमीच घेत आली आहे. पण हे वाक्य काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या नेतृत्वाला मात्र तंतोतंत लागू होतं. गोव्यात असो वा देशभर या अंहकारानेच काँग्रेस पक्षाचा बळी घेतला आहे.

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीपासून ते सरकार चालवण्यापर्यंत हे आम्ही केलं, हे आमच्यामुळे मिळालं या अहंकाराने काँग्रेस पक्षाला पछाडलंय. काँग्रेसची गोव्यातील आजची परिस्थिती आणि माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो यांचा तृणमूल काँग्रेस प्रवेश हा याच दृष्टीकोनातून बघावा लागेल. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पार्टी विसर्जित करा असं महात्मा गांधीजींनी सुचवलं होतं. पण सत्तेत रममाण झालेल्या काँग्रेस नेत्यांनी काही ते ऐकलं नाही आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला, ज्याला काँग्रेसचा स्वातंत्र्योत्तर इतिहास आणि आताची परिस्थिती साक्षीदार आहे.

कोणत्याही संघटनेत जर संघटनेपेक्षा नेतृत्व मोठं झालं, तर त्याचा त्या संघटनेला किंवा पक्षाला फायदा होतो. कारण त्या नेत्याची वा नेत्यांची नाळ त्या संघटनेकडे किंवा पक्षाकडे जोडलेली असते. पण कोणताही पक्ष किंवा संघटन हे व्यक्तीकेंद्रित झाले, तर त्यात त्या संघटनेचे व पक्षाचं नुकसान होतं. काँग्रेसचं नेमकं हेच झालं आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांची निष्ठा ही पक्षापेक्षा व्यक्तीवर झाली. यामुळेच तर २०१७ साली गोव्यातील काँग्रेसवर नामुष्की ओढवली व त्यांनंतर तर पूर्ण अधोगतीच झाली व होत आहे. फालेरो यांचा तृणमूल प्रवेश हा याच मालिकेतील पुढचा भाग आहे.

बंगालमधील सलग तिसऱ्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसचा वारू चौफेर उधळण्याच्या प्रयत्नात आहे. २०२४ साली दिल्लीचे तख्त ताब्यात घेण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. त्यासाठी त्यांना सर्वात जवळची म्हणजे ईशान्येतील राज्ये हवी आहेत. त्यांच्या या विस्तारवादी महत्वाकांक्षेला मदत करण्यासाठी २००७ सालापासून १० वर्षं काँग्रेस पक्षाचे ईशान्येतील राज्यांचे प्रभारी म्हणून काम पाहिलेले फालेरो यांच्यासारखा मोहरा जर जाळ्यात सापडत असेल तर तो त्यांना हवाच आहे. खरं म्हणजे लुईझीन फालेरो यांच्या प्रवेशापेक्षा हा तृणमूलचा लुईझीन फालेरो यांच्यात प्रवेश आहे, असं म्हणायला हरकत नाही. जसजसा काळ जाईल तसतशी या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट होत जाईल.

आज वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी गोव्यात येण्याचा चंगच बांधला आहे. एखादे उत्पादन विकावं त्या पद्धतीने आपल्या पक्ष आणि नेत्यांचं ब्रँडिंग करून मार्केटिंग करण्याचा प्रयत्न चालला आहे. गोव्याचे छोटे मतदारसंघ व २५ ते ३० हजार मतदारांचा आकडा त्यांना आकर्षित करीत आहे. म्हणून तर अवघ्या ६ ते ८ महिन्यात निवडणुक लढवून सत्ता स्थापन करण्याची गर्जना केली जात आहे. यापूर्वीही गोव्यात हे प्रयोग झालेत. पण सुजाण, सुसंस्कारीत व स्वभावाने कमी बोलणाऱ्या गोंयकारांनी मतपेटीतून यापूर्वी आपली राजकीय प्रगल्भता दाखवली आहे. ‘आप’ काय किंवा तृणमूल यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पार्टीचे जे काही नुकसान व्हायचे ते होत आहेच आणि यापुढेही होईल यात शंकाच नाही. काँग्रेस मधील नेत्यांबरोबरच गोव्यातील काही स्थानिक नेते ‘आप’चा पाहुणचार झोडल्यानंतर आता तृणमूलच्या बंगाली भोजनाच्या निमंत्रणाची वाट पहात आहेत. वरवरून जरी गोवा आणि बंगाली संस्कृतीत मांस, मच्छी आणि विश्रांती असं साधर्म्य दिसत असलं, तरी राजकीयदृष्ट्या ते फसवं आहे. आता काँग्रेसी अहंकाराच्या वणव्यापुढे हे तृण टिकणार का मुळासकट जळून जाणार हे येणारा काळच सांगेल.

नाहीतरी बंगालची दुर्गा गोव्यात आल्यानंतर शांतादुर्गा झाली आहे हे कसं विसरून चालेल?

-नरेंद्र सावईकर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!