राष्ट्रकार्याला समर्पित द्रष्टे व्यक्तिमत्त्व : नरेंद्र मोदीजी

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राष्ट्रकार्याचा गौरव करणारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लिहिलेला हा खास लेख

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः लोकशाहीच्या परिघामध्ये लोकप्रतिनिधींची प्रत्येक क्षणाला परीक्षा होत असते. त्यात उत्तीर्ण होण्यासाठी जे धैर्य, समर्पित वृत्ती आणि द्रष्टेपण लागते, ते सर्व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींजवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आज वाढदिन. त्यानिमित्त त्यांच्या राष्ट्रकार्याचा गौरव करणारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लिहिलेला हा खास लेख…

तमाम गोमंतकीयांच्या वतीने मी आमचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि भारतमातेची अखंड सेवा करण्यासाठी त्यांना निरामय आयुरारोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

गेल्या सात वर्षांत गोव्याला केंद्र सरकारकडून अभूतपूर्व मदत मळाली आहे. मूलभूत साधनसुविधांचा विकास, रस्त्यांचा विस्तार व जाळे विणणे आणि सामाजिक कल्याणासाठी ही मदत गोव्याला मिळाली आहे. मोदीजींचे द्रष्टेपणाने समाजातील सर्व घटकांसाठी अविरत कार्यरत राहण्यामुळे गरीब, महिला, शेतकरी, मागासवर्गीय यांच्या जीवनात, मानसिकतेत प्रचंड फरक पडला आहे. त्यांना केवळ सक्षम करणेच नव्हे तर त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्याचे महान कार्य मोदीजींनी केले आहे.

लोकशाहीच्या परिघामध्ये लोकप्रतिनिधीची परीक्षा प्रत्येक क्षणाला होत असते. आजपासून जवळपास २० दिवसांनी म्हणजे दि. ०७ ऑक्टोबर २०२१ रोजी मोदीजींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला २० वर्षे पूर्ण होत आहेत. ज्याचे उत्तरदायित्व २०१४सालपर्यंत त्यांनी समर्थपणे सांभाळले. २०१४साली त्यांना जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिले. ही तसे पाहायला गेले तर एक असामान्य कामगिरी आहे. उत्तम प्रशासन, दूरदर्शी नेतृत्व आणि सचोटी याचा वस्तुपाठ असलेली त्यांची कारकीर्द खरोखरच स्पृहणीय आहे. त्यांच्या कट्टर विरोधकांनीही त्यांच्या प्रामाणिकतेवर, सचोटीवर कधीच शंका घेतली नाही. सार्वजनिक जीवनात एखाद्या लोकनियुक्त प्रतिनिधीने कसे वागावे, कसे बोलावे आणि कसे आचरण ठेवावे याचा आदर्श मोदीजींनी घालून दिला आहे. राष्ट्रासाठी, राष्ट्रातील लोकांसाठी आपण कसे समर्पित कार्य केले पाहिजे, कसे सेवेला वाहून घेतले पाहिजे याचे मापदंड मोदींनी घालून दिले आहेत. यासाठीच संपूर्ण भारतभर ज्याचे आयोजन होणार आहे, तसेच गोव्यातही वीस दिवसांच्या ‘सेवा और समर्पण अभियान’ दि. १७ सप्टेंबर ते दि. ०७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आयोजित केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या योजनाबद्ध, अविरत आणि समर्पित कार्यपद्धतीमुळे कशाप्रकारे कोट्यवधींच्या आयुष्यात फरक पडला आहे, सकारात्मक बदल झाले आहेत या विषयी सर्वांना जागृत करणे आणि गरिबातल्या गरीब माणसासाठी कल्याणकारी योजना राबवल्याबद्दल त्यांना धन्यवाद देणे, हा या अभिमानामागील उद्देश आहे.

लसीचा पहिल्या डोस सर्वच्या सर्व पात्र गोमंतकीयांना देण्याचे अभूतपूर्व कार्य केल्याच्या पार्श्वभूमीवर मी हे लिहीत आहे. आदरणीय मोदीजी आणि केंद्र सरकारने प्रभावीपणे संपूर्ण देशभर राबवलेला लसीकरणाचा यशस्वी कार्यक्रम माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. करोना या साथरोगाचा प्रादुर्भाव जेव्हापासून भारतात सुरू झाला, तेव्हाच त्याला पायबंद घालण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यातही विलगीकरण आणि लसीकरण याचे महत्त्व त्यांनी सर्वांत आधी ओळखले. लसींचे संशोधन आणि विकास करण्यावर त्यांनी भर दिला. औषध कंपन्यांना आवश्यक असलेले परवाने, शासकीय पाठबळ पुरवले. त्यामुळेच आज आपण संपूर्ण देशभरात लसीकरण प्रभावीपणे करू शकलो. जगातली सर्वांत मोठी लसीकरण मोहीम आपण यशस्वी करून दाखवली. करोना साथरोगाच्या कठीण काळातही ‘वसुधैव कुटुंबकम’ या भारतीय मूल्याचा विसर त्यांना पडला नाही. आपल्या देशात जशी त्यांनी लस पुरवण्याची व्यवस्था केली तशीच त्यांनी जगभरातही सर्व गरजू देशांना लसीचा पुरवठा केला. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात साथरोग ही प्रचंड मोठी समस्या असतानाही त्यातून मार्ग काढीत पुढे घेऊन जाणार एक द्रष्टा, दृढ लोकनायक म्हणून नरेंद्र मोदीजींनी देश सांभाळला.

या क्षणी मला माझे गुरू आणि पितृतुल्य असलेले स्व. मनोहरभाई पर्रीकर यांचे एक वाक्य स्मरते. ते म्हणाले होते, ‘मोदींचे गोव्यावर वात्सल्य आहे आणि गोव्याचे मोदींवर पितृवत प्रेम आहे’. पणजीत झालेल्या भाजपच्या कार्यकारी समितीच्या २००२सालच्या आठवणी ते अनेकदा सांगायचे, जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदीजींवर विश्वास अधोरेखित केला होता. त्याच राष्ट्रीय कार्यकारी समितीने तसाच संपूर्ण विश्वास दाखवत २०१४च्या लोकसभेची पक्षीय धुरा मोदीजींच्या हाती सोपवली.

त्यांना निवडणुकीच्या प्रचार मोहिमेचे प्रमुख करण्यात आले. २०१२साली निवडून आल्यामुळे मला हा सर्व घटनाक्रम खूप जवळून पाहण्याची संधी मिळाली. २०१४साली पंतप्रधान झाल्यानंतर दिल्लीबाहेर जाहीर कार्यक्रम घेण्याचा मान गोव्याला प्रथम दिला. प्रत्येक गोमंतकीयासाठी हा अभिमानाचा क्षण होता. स्वर्गीय मनोहर पर्रीकर आणि मोदीजी यांची मैत्रीही आमच्या हृदयपटलावर कोरली गेली आहे.

एक स्वयंसेवक, प्रचारक, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान हा मोदीजींचा प्रवास प्रत्येक कार्यकर्त्यासाठी विलोभनीय, अभ्यासनीय आणि प्रेरणादायी आहे. जगातील सर्वांत मोठी संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठबळ आणि जगात सर्वांत मोठ्या असलेल्या राजकीय संघटनेचा विश्वास यासह मोदीजींनी घेतलेले कष्ट, त्यांची समर्पित वृत्ती यामुळे आज ते यशोशिखरावर आहेत.

गोव्यासाठी पंतप्रधान मोदीजींच्या हृदयात एक हळवी, वेगळी जागा आहे. त्यामुळे एक मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान मोदीजींच्याकडून आणि मंत्रिमंडळाकडून पाठबळ आणि मदत मिळाली. देशाच्या पटलावर गोव्याला कधी नव्हे तेवढे स्थान आणि ओळख भाजपच्या कारकिर्दीत मिळाली.

२०१४पासून श्रीपादभाऊंना केंद्रीय मंत्रिपद, स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांना संरक्षण मंत्रिपद आणि श्री. राजेंद्र आर्लेकरजींना राज्यपालपद. भाजपने राष्ट्रीय राजकारणात गोव्याला विशेष स्थान आणि महत्त्व दिले आहे, जे यापूर्वी कुठल्याच राष्ट्रीय पक्षाला देणे शक्य झाले नाही.

मोदीजींनी जी कामगिरी गेल्या सात वर्षांत केली आहे, त्याचे सविस्तर वर्णन, विवेचन करायचे तर मला किमान आणखी एक लेख लिहावा लागेल. आपल्या सांस्कृतिक मूल्यांचे जतन करण्यासाठी, लोककल्याणासाठी आणि राष्ट्राचे अर्थकारण मजबूत करण्यासाठी त्यांनी अनेक धाडसी योजना त्यांनी राबवल्या. जन धन योजना, आयुष्मान भारत, स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्टार्ट अप इंडिया, निश्चलीकरण, जीएसटीचा निर्णय व अंमलबजावणी, कलम ३७० हटवणे, सिटिझन अमेंडमेंट कायदा, रामजन्मभूमीत राम मंदिराच्या निर्माणास प्रारंभ आणि खूप काही.. २०१४साली जाहीरनाम्यात दिलेले प्रत्येक वचन त्यांनी पाळले. राष्ट्रकार्यासाठी कटिबद्ध आणि लोककार्यासाठी वचनबद्ध असलेला असा नेता भारताने पहिल्यांदाच पाहिला.

माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याला मोदीजी हे एक प्रेरणास्थान आहे. त्यांचे सर्वोच्च स्थान हे भारतीय जनता पक्षामध्ये असलेल्या लोकशाहीचेच द्योतक आहे. मला त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्य करायला मिळत आहे, हे माझे खूप मोठे भाग्य आहे. त्यांचे मार्गदर्शन माझ्या सरकारसाठी ते कायमच दीपस्तंभाप्रमाणे असेल.

मी पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि लवकरच त्यांनी गोव्याला आदरातिथ्याची संधी द्यावी, अशी इच्छा व्यक्त करतो.

डॉ. प्रमोद सावंत
माननीय मुख्यमंत्री, गोवा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!