वसा सावित्रीचा, वटवृक्ष पूजनाचा

सावित्रीचा वसा घेऊन जगणं उन्नत करू…

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः सत्यवान सावित्री हे एक आपल्या भारतीय संस्कृतीतील आदर्श जोडपं. सहजीवनाची समरसता म्हणजे काय असतं याचं एक महत्त्वपूर्ण प्रतीक या जोडप्याच्या माध्यमातून अनुभवता येतं. सावित्रीविषयी लोकमनात अपार आदर आहे. भारतीय स्त्री मन हे प्राचीन काळापासून नवरा, मुलं संसार यांच्या भोवताली स्वतःच्या जीवनाची इतिकर्तव्यता मानत आलेलं आहे.

हेही वाचाः …तर फेक अकाऊंट 24 तासात होणार बंद !

अश्वपती राजाची मुलगी, नवसानं झालेली, ब्रह्मपत्नी सावित्रीच्या कृपाशीर्वादाने ही मुलगी राजाच्या घरी जन्माला आली होती. सावित्री देवीच्या कृपेने खूप वर्षांनी घरात पाळणा हलला. म्हणून तिचं नाव सुद्धा त्यांनी ‘सावित्री’ असंच ठेवलं. वर्षामागून वर्षं उलटली. मुलगी उपवर झाली, स्वयंवराचे बेत आखण्यात येऊ लागले. एखाद्या राजघराण्यातील राजबिंड्या व्यक्तित्वाशीच लग्न करून घ्यायचं या विचारानेच राजा अश्वपतीची धावपळ सुरू झाली. सावित्री ही रूपवान, जस्वी हुशार, तिच्याशी बरोबरी करणारं व्यक्तिमत्त्व राजपुत्राच्या रूपाने भेटतच नव्हतं. तिची तेजस्विता बघूनच तिला वरमाला घालण्याची त्यांना भीती वाटत होती. तिच्या पित्याने, राजा अश्वपतीने सावित्रीला तिच्या तोडीचा वर शोधून आणण्यासाठी तिलाच राजपुरोहिताबरोबर  पाठवलं. वनवासात असलेल्या राजा द्युमतसेन यांचा पुत्र सत्यवानाला तिनं बघितलं आणि सावित्रीने सत्यावानाला मनोमन आपला पती मानलं. घरी पोहोचल्यावर जेव्हा ती सत्यवानाविषयी आपल्या पित्याला सांगते, तेव्हा तिथे हजर असलेले नारदमुनी या लग्नाला सत्यवान अल्पायुषी आहे म्हणून आक्षेप घेतात. नारदमुनींनी सत्यावनाविषयी सांगितलेली भविष्यवाणी ऐकून अश्वपती राजा सावित्रीला सत्यवानाशी लग्न करण्यास नकार देतो. असं असलं तरीही सावित्री आपल्या निर्णयावर अढळ राहते.

सत्यवान हा खरंतर शालव नगरीचा राजपुत्र. मात्र त्याच्या पित्याच्या अंधपणाचा शत्रूपक्षांनी फायदा उठवून त्यांना राज्यभ्रष्ट केलं. आणि म्हणूनच या कुटुंबाला विजनवसात आयुष्य कंठावं लागत होतं. विजनवसातील त्यांचे दिवस खूप कठीण. परंतु या अशा कठीण समयी धीरोदात्तपणे वागणारे हे कुटुंबीय सावित्रीच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाहीत. सुंदर, पराक्रमी, सुशील आणि प्रामाणिक असा सत्यवान सावित्रीला वरावासा वाटला. वडिलांनी विरोध केला तरीही सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली. भविष्यवाणी प्रमाणे लग्नानंतर फक्त एकच वर्ष सावित्रीचा संसार सत्यवाना सोबतीने होणार होता. विधिलिखित असंच होतं, आणि घडलंही तसंच! लाकडं आणण्यासाठी गेलेल्या सत्यवानाचा मृत्यू ओढवतो. मृत्यू कधी होणार हे सावित्रीला अगोदरपासून माहितीच होतं. सत्यावानाच्या मृत्यूला चार दिवसांचा अवधी असताना आपल्या पतीच्या जीवनदानासाठी सावित्री तीन रात्रीचं सावित्रीव्रत करायला सुरुवात करते. इकडे यमराज सत्यवानाभोवती घिरट्या घालत असतो. परंतु सावित्रीच्या पातिव्रत्याच्या तेजासमोर तो निष्प्रभ ठरत जातो. तरीही एका निसटत्या क्षणी चौथ्या दिवशी सरपणासाठी लाकडं आणण्यासाठी गेलेल्या सत्यावानाला यमराज घेरतोच. सावित्री तर सावलीसारखी सत्यावनाच्या सोबतीनेच असते. निष्प्राण झालेल्या आपल्या पतीचं डोकं मांडीवर ठेवून ती बसली. ज्या एका विशाल वृक्षाखाली ती बसली होती, तो वटवृक्ष होता! यमदूत सत्यवानाचे प्राण हरण करण्यासाठी आले खरे, परंतु सावित्रीच्या तेजपुंज व्यक्तित्वासमोर त्यांना काहीही जमलं नाही. यमराज स्वतः सत्यवानाचे प्राण हरण करून जात असता सावित्री त्याच्या मागून मागून जात राहिली. यमराजानी तिला हरतर्हेनें परत जायला भाग पाडलं. तिनंही तेवढ्याच चातुर्याने त्याला बोलण्यात गुंतवून ठेवलं. त्यांच्या या प्रवासात सावित्रीने आपल्या सासऱ्याची दृष्टी, तसंच त्यांचं गेलेलं राज्य परत मिळवून घेतलं आणि मग यमराज बोलण्यात गुंतलेत ही संधी साधून तिने त्याच्याकडून ‘सौभाग्यवती भव’ असा आशीर्वादही घेतला. यमराज येथेच तर शब्दात अडकले. सावित्रीला अखंड सौभाग्य देऊन त्यांनी तिला दिलेला आशीर्वाद खरा करायचा असेल तर मग सत्यवानाचे प्राण त्याला हरण करता येणार नव्हते. त्यालाही ते कळलं. सावित्रीच्या हुशारीवर खुश होऊनच त्याने सत्यवानाचे प्राण तिच्या हवाली केले.

सत्यवान सावित्री संदर्भातील ही कथा परंपरेने आपल्या पर्यंत चालत आलेली आहे. शेकडो वर्षांपासून प्रवाहित होत असताना त्यात  असंख्य बदल झालेले… कथानकात सुद्धा वेगळेपणा जाणवेल. असं असलं तरीही या दोघांचं नातं मात्र लोकमनात अढळ राहिलं. सावित्रीने सत्यवानासाठी जे व्रत करून आपलं सौभाग्य अखंड टिकवलं, तसंच आपलंही सौभाग्य टिकायला हवं यासाठी इथल्या मालनीनी सावित्रीला आदर्श मानून वटपौर्णिमेचं व्रत अंगिकारलं. ज्येष्ठ पौर्णिमेला पावसाची सोबत या व्रताला असते. पावसाचं पाणी पिऊन वड परीतृप्ती अनुभवत असतो. फणस, आंबा अशा फळांचा मौसम जरी ओसरत आलेला असला, तरीही ही फळं व्रतासाठी आवश्यक मानली जातात. वडाच्या पानांचे द्रोण करून त्यात ही फळफळावळ घालतात. त्यातच अनशीच्या दोऱ्यात गुंफलेले काळ्या पिड्डूकाचे पाच मणी हे सौभाग्याचं प्रतीक म्हणून घालण्यात येतात. वडाच्या झाडाला पांढरं सुत, पांढरा धागा गुंडाळून सात फेरे मारून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, अशी मागणी करीत पतीसाठी आयुष्य मागितलं जातं.

हेही वाचाः सिंधुदुर्गात ‘डेल्टा प्लस’ रुग्णाच्या परिसरात 6 बिल्डिंग 14 दिवसांसाठी सील !

पूर्वीपासून स्रियांचं आयुष्य हे तिचा नवरा, मुलं आणि संसार या भोवतीच फिरत राहिलेलं आहे. “पावसावाचून काय करावं जमिनीला… भरतारावाचून सुख नाही कामीनीला..” अशी तिची विचारधारा… अशीच परंपरा तिने सण, उत्सव, व्रत वैकल्यातून अंगिकारली. वर्षं सरली… सभोवताली आमूलाग्र बदल झाला… स्त्रियांचं विश्व विस्तारत गेलं. तरीही परंपरेने चालत आलेले रूढी रिवाज प्रवाहित होत राहिले. एक काळ होता की त्यावेळी मनोरंजन, विरंगुळा यासाठी कोणतीच साधनं नव्हती. उंबरठ्या बाहेरचं विश्व ही तिला माहिती नव्हतं. त्यावेळी तिने मनःपूर्वक पारंपरिकता सांभाळून, निसर्गाशी विनम्र होऊन या व्रतांचं पालन केलं. त्यातून त्यांना मानसिक बळ प्राप्त झालं. वडाची पूजा केली ती प्रत्यक्षात वडाला फेरे घालूनच! ती परंपरा आहे म्हणून प्रतिकात्मक गुजरून घ्यायचं असे त्यात भाव नव्हते. आजकाल गृहिणींचं जीवन बरंच धावपळीचं झालेलं आहे. घर, नोकरी, मुलं आणि बाकी सर्व सांभाळताना त्यांची दमशाक होते. तशी ती होणारच. परंतु असं आहे म्हणून वडाची फांदी तोडून त्याची पूजा `वड’ म्हणून करणं कितपत संयुक्तिक आहे ? याचा विचार शिकली सवरलेली स्त्री करु शकते. किंबहुना तिने तसा विचार करायला हवा.

हेही वाचाः आज उद्या जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता, Yellow Alert जारी!

एकदम घराला लागून नसणार, परंतु काही किलोमीटरवर एखादं तरी झाड असणार, तिथंही जायचं नसेल तर वडाचं एखादं रोपटं आणून त्याची पूजा करून ते एखादया जागेत लावता येईल. वडाचं झाड हे मानवाला मोठ्या प्रमाणात प्राणवायू प्रदान करणारं झाड आहे आणि आजची जी परिस्थिती संपूर्ण जगावर ओढवली आहे ती म्हणजे कोरोना महामारीशी आपली चाललेली झुंज आणि त्यात  जीवन मरणाचा मानवी जीवन करीत असलेला संघर्ष बघितला तर तो प्राणवायूसाठी चाललेला आहे. वड तर सर्वात जास्त प्राणवायू आपल्याला देतो. म्हणूनच आपण आताची वटपौर्णिमेचे जे व्रत करायचं असेल ते वडाचं रोपटं लावून करायची. एरव्ही बाजारात विक्रीसाठी वडाच्या फांद्या तोडून आणण्याची जणूकाही स्पर्धाच सुरू झाली होती. एकाच वेळी शेकडो फांद्या तोडल्या आणि त्याची विक्री केली तर पैसे मिळणार.. गृहिणीच्या ही आता वडाकडे जाण्यासाठी वेळ नाही, जाणे जमत नाही अशा सबबी असणारच. पण फांद्या तोडलेल्या वडाची काय अवस्था होईल ? याचा सुजाणपणे विचार करायला हवा.

एखादं व्रत फक्त करायचं म्हणून करायचं… अशा भावाने ते केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळणार तरी कसं? कोरोना पूर्वी तर व्रत करताना फांद्यांचा वापर वारेमाप केला जायचा. शिवलीलामृतमध्ये  सांगितलं गेलं आहे की वडाच्या फांद्या छाटणं म्हणजे भगवान शंकराचे बाहू कापून टाकल्याचं पातक लागतं. यावर्षी व्रत करताना वडाच्या झाडाला फेरे मारण्याचा संकल्प मनात करूया आणि हे फेरे मारत असताना, मास्क, सामाजिक अंतर राखणं तसंच हाताची स्वच्छता राखून व्रत केलं, तर ते अधिक संयुक्तिक ठरेल.

हेही वाचाः अहो, ऐकलंत का, पुरुषांनीही साजरी केली वटपौर्णिमा !

सावित्रीने आपल्या सत्यवानाचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःचं बुद्धिकौशल्य पणास लावलं. वरसंशोधन करताना  स्वतः राजकन्या असूनही तिनं धनदौलत असलेला नवरा शोधला नाही, तर विचार-आचाराची बरोबरी साधणारा प्रांजळ मनाचा सहचर तिनं निवडला. आजच्या सावित्रीने ही व्रताचा हा वसा घ्यायला हवा. मानवी जीवनात निसर्ग महत्वाचा घटक असून, हे एव्हाना कळून चुकलेलं आहे. मग या निसर्गाला राखून त्याचं संवर्धन-संरक्षण करणं ही आजची गरज आहे. व्रत वैकल्ये ही निव्वळ कर्मकांड किंवा परंपरेने चालत आलेली आहेत म्हणून साजरी न करता ती डोळसपणे करायला हवीत. पतीसाठी आयुष्य, आरोग्य मागताना सहजीवन कसं एकमेकांच्या जोडीनं आनंदी होईल याचा विचार करावा. त्यासाठी असपापसतील सुसंवाद, नात्यांमधील पारदर्शकता आणि एकमेकांचा आश्वासक आधार होत एकमेकांना वाढवत नेणं यातूनही नात्यांमधील वीण पक्की होते. त्यातून जगण्याची वृद्धी होते. आज नितळ, निरोगी, निरामय आयुष्याची गरज आहे. ज्याच्या बरोबर आयुष्य काढायचं आहे त्याचा सहवास हवाहवासा वाटायला हवा. एकाला जखम झाली तर त्याची वेदना दुसऱ्याच्या हृदयात उमटायला हवी. अविश्वासाने नाही तर विश्वासाने नातं टिकतं, वाढतं, वटवृक्षासारखंच विस्तीर्ण होत जातं. अशा नात्याची परीतृप्ती आयुष्याच्या अंतापर्यंत अनुभवता येते. हे असं नातं वडासारखं टवटवीत राहतं.

हेही वाचाः Corona 2nd Wave & Loss | ८४ दिवसांत २ हजारपेक्षा जास्त कोरोना बळी

कोरोना महामारीमुळे नाही म्हटलं तरीही मनांवर मरगळ साचलेली आहे. ती दूर सारूया. मनात नसताना एकमेकांबरोबर एक जन्मसुद्धा सहजपणे आपण राहू शकत नाही, तेथे सात जन्म कसे काय काढू शकणार? वरवरचं नको… आतून बदलुया… सत्यवान सावित्रीचं सहजीवन वडाच्या साक्षीने विस्तारूया. झाडं लावू.. निसर्ग वाढवू… सहजीवनाची सोबत आनंदी करू… सावित्रीचा वसा घेऊन जगणं उन्नत करू…

(हा लेख दैनिक नवप्रभाच्या अंकात छापून आला आहे.)

पौर्णिमा केरकर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!