अपूर्णतेचा परिपूर्ण संघर्ष : आधे अधुरे

अर्जुन धस्के | प्रतिनिधी

पणजीः ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असु द्यावे समाधान … जगदगुरू संत तुकोबारायांचे हे शब्द म्हणजे सुखी मानवी जीवनाचं सार आहे. परंतु हे लिहीण्याच्याही अगोदर आणि नंतरही हे सार समजावून घेण्याची वृत्ती दुरापास्तच. उलट मानवाच्या महत्वाकांक्षा वाढतच आहेत. सत्ता, संपत्ती याच्याही पलिकडे जेव्हा आपल्या मनाला अवतीभवती अशी काही अपूर्णता भासते, तेव्हा ती परिपूर्ण करण्यासाठी सुरू होतो एक धगधगता संघर्ष. या संघर्षात आपली स्वप्नं, नातीगोती, आयुष्य यालाही धग लागते. पण हा प्रवास काही अंतीम ध्येयापर्यंत पोहोचत नाही.

1969 सालची साहित्यकृती

साधारण 1969 साली प्रसिद्ध साहित्यिक मोहन राकेश यांनी आपल्या ‘आधे अधुरे’ या नाटकाच्या माध्यमातून मांडलेलं हे वास्तव आजही तितकंच भीषण आणि गडद भासतं. किंबहुना येत्या 2000 वर्षांतही याची तीव्रता वाढत जाईल आणि तेव्हाही या नाटकातून दिलेला संदेश महत्त्वाचाच ठरेल. काही साहित्यकृतींचा आशय हा असा अजरामर असतो. जीवनाचे अंतरंग उलगडणारं हे आशयगर्भ आणि गंभीर नाटक तसं रंगमंचावर उभा करायला खूप अवघड. परंतु गोवा कला अकादमीच्या काॅलेज ऑफ थिएटर आर्ट्सच्या विध्यार्थ्यांनी या नाटकाचा आशय रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केला. या निमित्ताने एक सकस नाटयानुभव रसिकांना पाहता आला त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत तितकं थोडंच.

मोहन राकेश यांचं विपुल लेखन

प्रसिद्ध नाटककार मोहन राकेश यांनी विपुल लेखन केलं. नाटकाबरोबरच कथा, कादंबरी, प्रवासवर्णन यावरही त्यांची छाप आहे. हे नाटक त्यांनी 1969 साली लिहीलं. हा आशयप्रधान चित्रपटांचा कालावधी. मानवी जीवनाचे अनेक पैलू विविध कथांच्या माध्यमातून या काळात अनेक कलाकारांनी रसिकांसमोर आणलं. जसे काही चांगले संदेश अनेक चित्रपटांनी या काळात दिले, तसंच या चित्रपटसृष्टीतील कलाकार, त्यांची लाईफस्टाईल याचा प्रभाव काही अंशी समाजावर पडत होता. ही प्रक्रिया वाढत्या क्रमाने आजही सुरूच आहे. हा संदर्भ इथे घेण्याचं कारण म्हणजे साधारण मानवाच्या महत्त्वाकांक्षा एका वेगळया पातळीवर नेण्यासाठी हे घटक थोड्याफार प्रमाणात कारणीभूत ठरले. गलेलठ्ठ पगार, महागडी कार, ऐषोआरामात राहणं यामागे धावण्याची वृत्ती हा त्याचाच परिपाक म्हणावा लागेल.

बदलत जाणाऱ्या परस्थितीचा सुंदर वेध

मोहन राकेश यांनी या सर्व बदलत जाणाऱ्या परस्थितीचा खूप सुंदर असा वेध आपल्या या नाटकात घेतलाय. आपल्या व्यापारात असफल झालेल्या महेंद्रनाथचा त्याची पत्नी सावित्री नेहमीच तिरस्कार करायची. सावित्रीच्या नोकरीवर घर चालायचं. दोघांमध्ये टोकाचा संघर्ष असला तरी सामाजिक बंधन म्हणून त्यांना एकत्र राहणं गरजेचं होतं. जसं स्त्रीलाच काय, पण पुरुषालाही अशा स्थितीत वेगळे होण्याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र संस्कृती येथे देत नाही. ही हतबलता फार चांगल्या पद्धतीने लेखकाने अधोरेखित केलीये. महेंद्रनाथमध्ये सावित्रीला कधीच परिपूर्णता वाटत नाही. त्यासाठी ती अशा परिपूर्ण व्यक्तीच्या शोधात असते. हा शोध सुरू असतानाच या कुटूंबात जो एक संघर्ष सुरू आहे, त्याची झळ कुटूंबातल्या अन्य व्यक्तींनाही बसते. जुनेजा, शिवजित, जगमोहन, मनोज आणि सिंघानिया अशी पात्र सावित्रीच्या या महत्त्वाकांक्षेला अधिक गडद करत जातात. महेंद्रनाथ आणि सावित्रीच्या दोन्ही मुली आणि मुलगा अशोक हे या परस्थितीचे बळी ठरलेले दिसतात. थोडक्यात, सामाजिक बदलांचा कुटूंबावर होणारा अनिष्ट परीणाम या माध्यमातून अतिशय समर्थपणे समोर येतो.

गोव्याच्या रंगभूमीच्या इतिहासातले सोनेरी पर्व

विषय थोडा गुंतागुंतीचा असला तरी साधी भाषा आणि आशयप्रधान संवाद यामुळे रसिक पहिल्यापासून शेवटपर्यंत कथेत गुंतत जातात. या नाटकाचा पहिला प्रयोग ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या दिग्दर्शनाखाली 1969 साली दिशांतर नाट्य संस्थेच्या माध्यमातून झाला होता. अनेक मराठी कलाकारांनीही हे नाटक रंगमंचावर साकारलंय. ज्येष्ठ अभिनेते डाॅ. मोहन आगाशे यांचा यात आवर्जुन उल्लेख करावा लागेल. गोवा कला अकादमीच्या काॅलेज ऑफ थिएटर आर्टसच्या विध्यार्थ्यांनी हे शिवधनुष्य पेललंय. कारण त्यांना जेेष्ठ रंगकर्मी प्रो. अफसर हुसेन यांचं बहुुमोल मार्गदर्शन मिळालं. नाटकाचे समकालीन संदर्भ प्रत्येक ठिकाणी आशयाला अधिक परिणामकारक करत असतात. प्रो. अफसर हुसेन यांच्या दिग्दर्शनात ते प्रत्येक ठिकाणी जाणवत होते. प्रत्येक प्रसंगात आपला जीव ओतून कलाकारांनी तो प्रसंग अक्षरक्षः जिवंत केले. नाटकाचा आशय, संवादलेखन, नाट्यनिर्मिती, तांत्रिक बाजूंची सक्षमता आणि अभिनयाचा कस लागणारे असे काही जुन्या काळातल्या नाटककारांचे परंतु आजही तोच संदेश देणारे असे नाट्यप्रयोग प्रो. अफसर हुसेन यांच्यासारख्या अनुभवी कलावंतांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने उभे राहत आहेत, हे गोव्याच्या रंगभूमीच्या इतिहासातले सोनेरी पर्व आहे.

कसदार आणि अनुभवी दिग्दर्शन

जीवनाच्या बऱ्या-वाईट अनुभवातून तावुनसुलाखून निघालेल्या आणि जीवनाच्या उत्तरार्धात पोहोचलेल्या वयस्कर व्यक्तीरेखा विद्यार्थीदशेत साकारणं, हे तसं खूप अवघड. परंतु प्रो. अफसर हुसेन यांचं कसदार आणि अनुभवी दिग्दर्शन या सर्व व्यक्तीरेखांना परिपूर्ण करत जाते आणि एक आशयघन, अंतर्मुख करणारा नाटयानुभव रसिकांसमोर ठेवते. प्रसंगांपेक्षा संवादांमध्ये अधिक नाट्य असतं, तेव्हा पार्श्वसंगीत आणि प्रकाशयोजना हे एक आव्हान असतं. पण अगदी नेपथ्यापासून या तांत्रिक बाजूही कलाकारांनी समर्थपणे साकारल्या. एक रसिक म्हणून मनाला सर्वांत जास्त भावतो तो एकूणच सादरीकरणातला सफाईदारपणा. प्रत्येक पात्राचं अचूक टायमिंग, रोजच्या बोलण्यातले शब्द नसले तरीही अचूक पाठांतर आणि रंगमंचावरची शिस्त यामुळे नाव ‘आधे अधुरे’ असलं, तरी या नाट्यप्रयोगाने एक ‘परिपूर्ण’ असा नाट्यानुभव रसिकांना दिला.

पात्रपरिचय

काळ्या सुटवाला – केदार मेस्त्री, मार्क फर्नांडिस, सावित्री-दिव्या गावस, बिन्नी – देविशा वळवईकर, किन्नी – संपदा गावस, अशोक – गौतम नाईक, रौनक गौरव, महेंद्रनाथ – श्रवण नाईक, शिवराज मलिक, सिंघानिया – सिद्धांत खांडेकर, निखिल म्हार्दोळकर, जगमोहन – अमितकुमार, जुनेजा – अजय फोंडेकर, साईश गावकर, सहकलाकार – गौरेश नाईक, रोहीत सतरकर, विशाल गावडे, मार्क फर्नांडिस, श्रुंगी शेठ, केदार मेस्त्री.

पडद्यामागील कलाकार

संकल्पना, दिग्दर्शन – प्रो. अफसर हुसेन, प्रकाशयोजना – गंगाराम नार्वेकर, कोरिओग्राफी – ममता हुसेन, पार्श्वसंगीत – सचिन चौगुले, नेपथ्य – शिवराज मलिक, रंगमंच व्यवस्था – केदार मेस्त्री, वेषभूषा – देविशा वळवईकर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!