गोवा मुक्तीनंतर गेल्या साठ वर्षांतील वाटचाल

स्वातंत्र्यसैनिक राम मनोहर लोहिया यांनी गोमंतकीयांच्या उरात स्वातंत्र्याचा जोश भरला

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा मुक्तिदिनाचा पाया 18 जून 1946 रोजी घालण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक राम मनोहर लोहिया यांनी गोमंतकीयांच्या उरात स्वातंत्र्याचा जोश भरला. तो दिवस आपण क्रांती दिन म्हणून दरवर्षी साजरा करतो. गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी वर्षात आजच्या क्रांती दिनाचं महत्व अधिक वाढतं. गेल्या साठ वर्षांत गोव्याने काय कमावलं याविषयी दोन शब्द….

हेही वाचाः गोव्याच्या पुर्ननिर्माणासाठी हवी एक चळवळ

18 जून हा दिवस गोमंतकीयांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान दिलेले स्वातंत्र्य सैनिक तथा समाजवादी विचाराचे पाईक असलेल्या डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोमंतकीयांच्या अंगी गोव्यातील वसाहतीवादी राजवटीच्या अत्याचारी व्यवस्थेविरूद्ध लढा उभारण्याची इच्छाशक्ती बाणवली. लोहिया यांच्या नेतृत्वात समस्त जनता एकवटली. गोमंतकीयांच्या आणि स्वतंत्र भारतातील अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतीवीरांच्या सुमारे 15 वर्षांच्या अखंडित लढ्यामुळे 1961 रोजी गोवा मुक्त झाला.

गोवा मुक्तीची बिजं 18 जून 1946 मध्ये रोवली गेली होती. म्हणूनच हा दिवस आपण क्रांती दिन म्हणून साजरा करतो. गोव्याला स्वातंत्र्य मिळून आता 60 वर्षं पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुक्तीनंतरचा गोवा कसा घडला, कसा वाढला याचा ऊहापोह करणं आवश्यक आहे.

हेही वाचाः चोर्ला घाट महामार्गावरून अवजड वाहतुकीला बंदी

गोव्याचे मुख्यमंत्री दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांनी खर्‍या अर्थाने गोव्याचा कायापालट केला. कला, क्रीडा, सहकार, सामाजिक, शिक्षण या सर्व क्षेत्रांचा विकास केला. खास करून भाऊसाहेबांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीयच.

मधल्या काळात गोव्यात पायाभूत सुविधा जसे रस्ते, पूल आदी उभे राहिले. मात्र आधुनिक विकासाचा पाया माजी संरक्षणमंत्री तथा माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर उर्फ भाई पर्रीकर यांनी घातला. आयआयटीमधून उच्चशिक्षण घेऊन भाईंनी गोव्यात अत्याधुनिक आणि अद्ययावत सुविधा निर्माण केल्या. त्यांचा दुरदृष्टीकोन आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता अवर्णनीय होती. राज्यातील प्रत्येक भव्यदिव्य प्रकल्पामागे भाईंचीच दृष्टी होती.

विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची वाटचालही भाईंनी घालून दिलेल्या आदर्शांवर सुरू आहे. वैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉ. सावंत यांचाही आधुनिकतेवर अधिक विश्‍वास असून माहिती आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन अधिकाधिक विकास कसा साधता येईल, याकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं.

गेल्या साठ वर्षांत गोव्याने बहुतांश क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कला आणि क्रीडा क्षेत्रासह विशेषतः शिक्षण क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. हे सर्व करत असताना दीड-दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जगाला ग्रासलेल्या कोरोना महामारीने सर्वांचं कंबरडं मोडलं. महाकठीण काळातही गोवा सरकारने कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवून राज्याची अर्थव्यवस्था सुरू होईल या दिशेने पावले टाकली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कुशल नेतृत्वाखाली राज्य सरकारने कोरोनाच्या प्रंचड प्रतिकूल परिस्थितीतही विकासकामांत खंड पडू दिला नाही. तसंच आरोग्य, सेवा, शिक्षण, पायाभूत सुविधा, नागरी पुरवठा, कृषी अशा अनेक क्षेत्रात उत्तम कामगिरी केली.

हेही वाचाः ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारे मृत्यू सरकारने गालिच्याखाली लपवले

राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊन वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये देशातील पहिल्या मेरिटाईम क्लस्टर योजनेला मान्यता दिली. देश-विदेशातील उद्योजक आणि उद्योगांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने 2019 मध्ये ताळगाव-पणजी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये व्हायब्रंट गोवा, ग्लोबल एक्सपो आणि समिटचे आयोजन केलं होतं.

बेराजगार युवा-युवतींना रोजगार – नोकरी सुलभपणे उपलब्ध व्हावी यासाठी पणजी येथे मॉडेल करिअर सेंटरची स्थापन केली. सरकारचं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आता एक करिअर सेंटर म्हणून काम करत आहे. या सेंटरद्वारे बेरोजगार युवा-युवतींना त्यांच्या कार्यक्षमतेनुसार आणि योग्यतेनुसार नोकरी किंवा रोजगार करण्यासंबंधी समुपदेशन केलं जातं. ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या विकासासाठी तसंच येथील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकारने धेंपो विश्व ग्राम शाळांबरोबर सामंजस्य करार केला आहे.

राज्य सरकारने राज्यात पायाभूत सुविधा निर्मितीवर भर दिला आहे. स्व. मनोहर पर्रीकर यांनी काणकोण बायपास महामार्गाचं उद्घाटन करून तो लोकांसाठी खुला केला. गालजीबाग, तळपण आणि माशे नदीवरील चौपदरी पूल लोकांसाठी एक वरदान ठरला आहे. दक्षिण गोव्यातील झुआरी पूल आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. डिचोली येथे बाजार प्रकल्प उभारण्यात आला. धारबांदोडा येथे नवीन सरकारी संकुल सुरू करण्यात आलं. मये-डिचोली येथील तलावाचं सुशोभिकरण केलं. तसंच बंजी जंपिंग सुविधा उभारली. सुमारे 16 कोटी रुपये खर्च करून मये तलावाचं सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आलं. तलावापर्यंत जाणार्‍या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणासह सुमारे 40 दुचाकी, 57 चारचाकी आणि 10 प्रवासी बस उभ्या करता येतील इतकं मोठं वाहनतळही उभारण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने कदंब परिवहन महामंडळास 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या. यामुळे कदंब महामंडळ आता प्रदूषणविरहित हरित दळणवळणाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य सरकारने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी राज्यात विविध प्रकल्प सुरू केले. तसेच उपक्रमही राबवले. नावेली येथे मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम उभारलं. ओपा येथे खांडेपार नदीवर नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारलं. फोंडा येथे एनएच 4-ए वर नवीन उड्डाणपूल (ग्रेड सेपरेटर) बांधण्यात आला. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून राज्यात रस्त्यांचे जाळं निर्माण केलं जात आहे. पर्वरीतील 3 सरकारी शाळांचे उद्घाटन केलं आहे. माशेल येथे नव्याने बसस्थानक उभारलं.

आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचं संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने साखळी किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी पायाभरणी केली. सावईवेरे येथील शासकीय प्राथमिक शाळेची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली. सावर्डे मतदारसंघातील काले येथे रेल्वे ओव्हर ब्रिजची पायाभरणी झाली असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर याचा स्थानिकांना लाभ होईल. भंडारवाडा ते विठ्ठलपूर-साखळीला जोडणार्‍या वाळवंटी नदीवरील पूलाचीही पायाभरणी केली आहे.

स्व. मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीदिनी काकोडा येथे घनकचरा व्यवस्थापन सुविधेची पायाभरणी करण्यात आली. स्वच्छ गोवा.. हरित गोवा… या उद्दीष्टपूर्तीसाठी राज्य सरकारने नागरिक, शिक्षण संस्था, खासगी आस्थापन आणि उद्योगांना सौर ऊर्जा बसविण्यासाठी प्रेरित करण्यात केले. सरकार टेरेस किंवा गच्चीवर सौर ऊर्जा बसविणार्‍या घरांना आणि शैक्षणिक संस्थांना 50 टक्के तर व्यावसायिक आणि उद्योगांना 20 टक्के अनुदान देतं.

कोरोना काळात शाळा, महाविद्यालये तसंच इतर शैक्षणिक संस्था बंद ठेवल्या होत्या. अद्यापही अनेक शिक्षण संस्थांचे वर्ग बंद आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारच्यावतीने डिजिटल इंटीग्रेटेड सिस्टम ऑफ होलिस्टिक टीचिंग अँड व्हर्च्युअल ओरिएंटेशन्स (डीआयएसएच टीएव्हीओ) ही प्रणाली सुरू करण्यात आली. या प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाचं व्यासपीठ विकसित केलं.

ग्रामीण भागातील 100 टक्के घरांना जलवाहिन्यातून पाणीपुरवठा करणारं गोवा पहिलं राज्य बनलं आहे. सरकारने ग्रामीण भागातील सर्व 2.3 लाख घरांचे यशस्वीरित्या व्यवस्थापन केले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) या योजनेंतर्गत स्थानिक स्त्रोतांचा वापर करून जलवाहिन्यांना प्राधान्य दिल्यानं राज्याने हे यश संपादन केलं. या योजनेंतर्गत गोव्यातील सुमारे 2.3 लाख ग्रामीण भागातील कुटुंबांना जलवाहिन्यांची जोडणी देण्यात सरकार यशस्वी ठरले आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ या कार्यक्रमांतर्गत गोव्याला स्वावलंबी बनविण्यासाठी गाव पातळीवर कृती योजना सुरू केली गेली. कोरोना महामारीने देश आणि राज्यासमोर अनेक आव्हाने निर्माण केली आहेत. राज्याची अर्थव्यवस्था सेवा आणि पर्यटन क्षेत्रावर अवलंबून आहे. कोरोना काळात सरकारसमोर आर्थिक आव्हान निर्माण केलं. यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने नाविन्यपूर्ण रणनीती आखली. यासाठी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था दृढ करण्याचे प्रयत्न केले गेले. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था वाढविण्यासाठी काय करता येईल, याचा आढावा घेऊन तसंच विचारविनिमय करून विविध निर्णय घेण्यात आले.

लोकांना अधिक चांगली आरोग्य सेवा देता यावी यासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय सुरू करण्यात आलं. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंर्गत बांबोळी येथील गोमेकॉत सुपर स्पेशॅलिटी विभाग बांधले गेले.

हेही वाचाः २१ जून पासून शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती

12 ऑगस्ट 2020 रोजी मोबाइल इन्स्टॉलेशन, नेटवर्क कनेक्टिव्हिटी इत्यादी बाबींसह दूरसंचार क्षेत्रात कार्यक्षमता वाढविण्यासाठी गोवा टेलिकॉम इन्ङ्ग्रास्ट्रक्चर पॉलिसी 2020 ला मंजुरी देण्यात आली. पुढील वर्षं हे गोवामुक्तीचं हिरक महोत्सवी वर्षं आहे. यानिमित्त सरकार वर्षभर विविध विकासाचे उपक्रम, कार्यक्रम राबवत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारची सुरू असलेली कामगिरी अत्यंत कौतुकास्पद असून सरकारच्या कार्याला आपणही साथ द्यायला हवी. तरच खर्‍या अर्थाने विकासाची क्रांती घडून येईल…..

संदेश साधले, माध्यम प्रमुख, गोवा प्रदेश

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!