शेतीही कॉर्पोरेट सेक्टर होण्यासाठी प्रयत्नशील : राजशेखर रेड्डी

अर्जुन धस्के | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : केवळ भरमसाट पाणी आणि खतांचा असंतुलित मारा केल्यामुळे कृषिप्रधान भारतातल्या शेतकऱ्याला आणि शेतीला अतिशय वाईट दिवस आले. हे चित्र बदलून विषारी रासायनिक खते आणि औषधांपासून शेती मुक्त करण्यासाठी प्रतिभा बायोटेकच्या माध्यमातून कार्यरत आहेत ते कंपनीचे एमडी श्री. राजशेखर रेड्डी. कृषी जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशात एक नवी हरितक्रांती आणणाऱ्या आणि शेतीला कॉर्पोरेट उद्योगाच्या दर्जासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या कृषी भगिरथांशी ‘सिंधुदुर्ग लाईव्ह ‘च्या मुख्यालय प्रतिनिधी देवयानी वरसकर यांनी साधलेला हा संवाद..

● प्रश्न : शेतीसाठी मायक्रो न्यूट्रियनट्सचे महत्व काय आहे?

● राजशेखर रेड्डी : आपल्या अनेक शेतकरी बांधवांना फक्त युरिया, डीएपी, पोटॅश माहीत आहे, पण एका झाडाला आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी 16 प्रकारचे इलेमेंट्स लागतात. त्यांना आपण तीन प्रकारात विभागूया. एक म्हणजे इसेन्शियल एलिमेंट, ज्याला प्राणाधार मूल किंवा प्राणाधार धातू म्हणूयात. कार्बन, हैड्रोजन व ऑक्सिजनचा यात समावेश होतो. या तिघांचा 90 टक्के सहभाग असतो, पण याबद्दल शेतकऱ्यांना शून्य टक्के माहिती आहे. किती कार्बन किंवा पीएच सांभाळायचे हे माहीतच नसते. या विरुद्ध युरिया, डी ए पी व पोटॅशचा फक्त 5 टक्के क्रियाभाग असतो, पण यावरच 100 टक्के लक्ष दिले जाते. त्यावर जास्त पैसे खर्च केले जातात. तसेच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सल्फर हे सेकंडरी आहेत. त्यांचाही रोल महत्वाचा आहे. याबद्दलही शेतकऱ्यांना माहिती नाही. सूक्ष्म मूलद्रव्यांमध्ये मँगेनिज, फेरस, बोरॉन, मॉलिक्युनम, कॉपर, फेरस, क्लोरीन यांचा समावेश असतो. यातील क्लोरीन जमिनीतून मिळते. या सर्व सूक्ष्म मूलद्रव्यांचा वनस्पतीच्या जीवनात वेगवेगळा रोल आहे. उदाहरणार्थ मॉलिक्युनम, एका एकरसाठी 50 ते 100 ग्रॅम लागते. हे नायट्रोजनला नैसर्गिक घटकात बदलते. पण या मूलद्रव्याची कमतरता असेल तर ते कसे परिवर्तित करेल?नायट्रेटला नायट्राईड मध्ये रूपांतरित होणे आवश्यक असते, पण या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. शेतकऱ्यांना ही 16 मूलद्रव्ये कशी, कधी व किती प्रमाणात वापरायची, याचे ज्ञान देणे आवश्यक आहे. हे जर त्यांना समजले तर त्यांना कधीच नुकसानीला सामोरे जावे लागणार नाही. वनस्पतीला झालेला आजार ओळखण्यासाठी एक आठवडा ते दहा दिवस लागतात. शेतकरी पहिल्यांदा बघतील, ट्रायल घेतील, नाही झाले तर परत ट्रायल घेतील, पण यात वेळ जाऊन सर्व शेतीवर याचा परिणाम होईल. म्हणूनच वनस्पतीची रेझिस्टन्स पॉवर वाढविणे आवश्यक आहे. पण भारतात हे होत नाही, हे दुर्दैव आहे. सध्या कोरोनामुळे अनेक जण त्रस्त आहेत, पण ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांच्याजवळ कोरोना फिरकणारही नाही. तसेच वनस्पतीचे आहे. जर त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर त्यांना काहीच होणार नाही.

● प्रश्न : बायोकेमिकल हे इको फ्रेंडली कसे आहेत?

● राजशेखर रेड्डी : वनस्पतीसाठी काही किटक जसे उपयुक्त आहेत, तसे काही हानिकारक आहेत. रासायनिक फवारणी केली की सरसकट सर्वच कीटक मरून जातात, पण तेच जर ऍग्रो बेस वापरले तर त्याचा चांगला उपयोग होईल. उदाहरण ध्यायचे झाले तर किलीओथीस या कीटकांचा प्रादुर्भाव झाला आणि ऍग्रो बेस कीटकनाशकाची फवारणी केली तर फक्त तेच कीटक मरतील, रासायनिक फवारणी मुळे सर्व शेती, जनावरांचे खाणे, सर्वच प्रदूषित होते. कारण आपण पिकाची कापणी केली की उर्वरित गायी-गुरांना खाण्यास देतो, एकूणच यामुळे पक्षी, माणूस, जनावर सर्वानाच त्याचा त्रास होतो.

● प्रश्न : सध्या कोरोनामुळे अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्यात. काही जण नोकऱ्या सोडून आलेत आणि त्यामुळे ते आता पुन्हा शेतीकडे वळू लागले आहेत. अशा तरुणांना तुम्ही काय सांगाल?

● राजशेखर रेड्डी : खरय, अनेक तरुण आपल्या मूळ गावी परतत आहेत, अन्नधान्य हे सर्वांना आवश्यक आहे. त्याशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणूनच या सर्व तरुणांनी शेतीकडे वळताना त्याची पूर्ण माहिती घ्यावी. शास्त्रीयदृष्टया त्याची माहिती घ्यावी. अनेक शेतकऱ्यांना त्यांची मुले शेतकरी झालेली नको आहेत. कारण शेतकरी झाल्यावर त्यांना तेवढा नफा झालेला नाही. ते आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकत नाहीत. आता कोरोनामुळे शेतीसाठी चांगले वातावरण तयार झालं आहे. हा बदल आपल्यासाठी इनोव्हेटिव्ह आहे. शेतीसाठी उतरणाऱ्या सर्वांना सरकारने मदत केली पाहिजे. त्यांना चांगला दर मिळवून दिला पाहिजे. एखादी अन्य वस्तू उत्पादित करायची असेल तर त्याची किंमत किती असेल, हे अगोदरच ठरले जाते. मात्र एखादे पीक घ्यायचे असेल तर ते तयार झाल्यावर त्याची किंमत काय असेल हे कोण सांगू शकत नाही. उदाहरण ध्यायचे झाले तर टोमॅटोचे घ्या. कधी त्याची किंमत एक रुपयांच्या खाली जाते तर कधी साठ रुपयांच्या वर. जेव्हा किंमत मिळते तेव्हा सर्वच टोमॅटो पिकवायला लागतात. त्यामुळे भरपूर पीक आल्याने दर एकदम उतरतो, तसेच कांद्याचेही झाले होते. म्हणजेच काय तर शेती उत्पादनाचा दर ठरवण्याची एक पद्धत ठरवली तर असे नुकसान होणार नाही. हे संपूर्ण देशात व्हायला पाहिजे. त्यामुळे ग्राहक व शेतकरी या दोघांनाही त्याचा फायदा होईल. शेतकरी आणि ग्राहकामधील दलालाला जर काढून टाकले तर ग्राहकाला व शेतकऱ्याला चांगला दर मिळेल आणि शेतीउद्योग कॉर्पोरेट सेक्टरमध्ये गणला जाईल. अनेक तरुण पुन्हा शेतीकडे वळतील.

● प्रश्न : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल?

● राजशेखर रेड्डी : 12 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात प्रतिभा बायोटेकने आपले काम सुरू केले. आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक कंपन्या आपले उत्पादन विकण्यासाठी काम करतात पण आम्ही माहिती देतो आणि ती कशी व केव्हा वापरायची हे सांगतो. त्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मी पुणे, नाशिकमधील काही शेतकऱ्यांना भेटी दिल्या आहेत. ते खूप अभ्यासू आहेत व चांगले काम करत आहेत. काही चुकाही करत आहेत. मी त्यांच्याबरोबर एक बैठक घेऊन त्यांनाही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी खूप मेहनत घेतात. त्यांना 16 मूलद्रव्यांची योग्य माहिती व शिक्षण दिले तर ते ही खूप चांगली शेती करू शकतात.

● प्रश्न : महाराष्ट्रात आपले युनिट आणखी विस्तारण्याचा काही मानस आहे का?

● राजशेखर रेड्डी : हो, आमचे एक युनिट अकोला येथे सुरू आहे. शंभरहून अधिक कर्मचारी, 4 मॅनेजर यांच्यामार्फत शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण व माहिती दिली जात आहे. त्याचा रिझल्टही चांगला मिळत आहे.

● प्रश्न : सर, आपण आपला अमूल्य वेळ देऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगली व उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल संपूर्ण टीमतर्फे आपले आभार मानते. शेती लवकरच एक कॉर्पोरेट सेक्टर होईल, अशी चांगली आशा बाळगूया. धन्यवाद !

● राजशेखर रेड्डी : नक्कीच त्यासाठी माझे तळमळीने प्रयत्न राहतील. धन्यवाद !

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!