गोव्यातील पहिल्या पंचायत निवडणुकीची कहाणी…

या निवडणुकीत 31 पंचायती बिनविरोध निवडून आल्या होत्या.

Goan Varta Live | प्रतिनिधी

सुहास बेळेकर

गोवा 19 डिसेंबर 1961 रोजी स्वतंत्र झाला. त्यानंतरच गोव्याच्या जनतेला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. 20 डिसेंबर 1961 पासून ते भारताचा केंद्रशासित प्रदेश म्हणून संघराज्यात सामील झाले. हे सामीलीकरण पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात आले होते. या संदर्भातला घटना दुरुस्ती (बारावी) कायदा 27 मार्च 1962 रोजी लागू झाला होता. ही घटना दुरुस्ती तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मांडली होती. हा कायदा संमत झाला आणि गोवा अधिकृतरीत्या भारतात सामील झाला. या काळात प्रथम मेजर जनरल के. पी. कँडेथ यांची सत्ता होती. त्यानंतर हा ताबा लेफ्टनंट गव्हर्नर टी. शिवशंकर यांच्यााकडेे देण्यात आला. सल्लागार मंडळाच्या साहाय्याने त्यांनी काही काळ राज्यकारभार चालवला. तेच लेफ्टनंट गव्हर्नरपदी असताना लोकनियुक्त सरकारसाठी पहिली निवडणूक होण्याआधी राज्यात प्रथम पंचायत निवडणुका घेण्यात आल्या.

24 ऑक्टोबरला झालं मतदान

या निवडणुका 24 ऑक्टोबर 1962 रोजी घेण्यात आल्या. या निवडणुकांसाठी रीतसर प्रक्रिया 11 सप्टेंबर 1962 रोजी सुरू झाली होती. केंद्राकडून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गोवा सरकारने 21 सप्टेंबर 1962 रोजी ही अधिसूचना गोव्याच्या राजपत्रात पुन्हा प्रसिद्ध केली होती. घटनेच्या कलम 240 न्वये राष्ट्रपतींना मिळालेल्या अधिकारानुसार हे नियम जारी करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच म्हणजे 24 सप्टेंबर 1962 रोजी पंचायत निवडणूक प्रक्रिया नियम जारी करण्यात आले होते. 24 सप्टेंबर 1962 सिरीज 1 क्र.32 या राजपत्रात ते प्रसिद्ध करण्यात आले होते. ही अधिसूचना लेफ्टनंट गर्व्हनर टी. शिवशंकर यांनी जारी केली होती. ज्या दिवशी निवडणूक प्रक्रिया नियम जारी झाले त्याच दिवशी निवडणुकीची घोषणा करणारी अधिसूचनाही जारी झाली होती. ही अधिसूचना मुख्यसचिव बी. के. सन्याल यांनी काढली होती. निवडणुकीची ही प्रक्रिया 9 ऑक्टोबरपासून अर्ज स्वीकारून होणार होती ती 24 ऑक्टोबर रोजी मतदानानंतर मतमोजणी करून संपणार होती.

मतदारांत अभूतपूर्व उत्साह

प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी लोकांत अभूतपूर्व उत्साह होता. कारण ते आयुष्यात प्रथमच मतदान करीत होते. मतदार यादीत नोंदणी केलेल्या सर्वांना मतदानाचा हक्क मिळाला होता. सकाळी 8 वाजता मतदान सुरू होणार असल्याने बरेच लोक आधीच येऊन मतदान केंद्रांवर राहिले होते. पुरुष आणि महिला दोघांचाही उत्साह दांडगा होता. काही महिला आपल्या मुलांना कडेवर घेऊन रांगेत राहिल्या होत्या. काही मतदान केंद्रांवर पुरुष आणि महिला मतदारांनी वेगळ्या रांगा लावल्या होत्या. काही मतदान केंद्रांवर रांगा बर्‍याच लांबल्या होत्या. पण जशजशी उन्हे वाढू लागली तशी मुले व त्यांच्या आया कंटाळू लागल्या. त्यांची केविलवाणी दशा पाहून केंद्रावरील अधिकार्‍यांनी त्यांना आधी मत देण्याची व्यवस्था केली. बहुतेक मतदान केंद्रे प्रशस्त शाळांत किंवा गावच्या चावड्यात होती. उमेदवार मतदारांना त्यांचे नाव, मतदार क्रं आणि मतदार यादीतील पान क्रमांक नोंद केलेल्या चिठ्ठ्या देत होते, जेणे करून मतदान केंद्रात त्यांचे नाव शोधणे सोपे जावे. पण सगळेच मतदानाच्या पद्धतीला नव्याने सामोरे जात असल्याने अशा चिठ्ठया सर्व मतदारांना देऊ शकले नव्हते. त्यामुळे काही मतदार थेट जाऊन मतदान केंद्राधिकार्‍यासमारे उभे राहिल्याने त्याचे नाव शोधण्यास वेळ लागत होता.

मतदारांना आल्या अनेक अडचणी

प्रथमच मतदान करण्याची वेळ असल्याने कित्येक मतदारांना काय करावे हे समजावून सांगावे लागायचे. मतदान केंद्रांपासून 100 मीटर अंतरावर हस्तलिखित पत्रके लावलेली होती. सुशिक्षित मतदारांना त्याचा उपयोग होत होता. या निवडणुकीत अंदाजे 50-60 टक्के मतदान झाले होते. या मतदानाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावाने मतदान पेटी ठेवण्यात आली होती. त्या पेटीवर उमेदवाराचे चिन्ह लावण्यात आले होते. मतदाराला ज्याला मत द्यावेसे वाटते त्या उमेदवाराच्या नावाच्या (चिन्हाच्या) पेटीत आपली मतपत्रिका टाकायची अशी ही व्यवस्था होती. मतदानपद्धती गुप्त होती. जेवढे उमेदवार तेवढ्या पेट्या अशी सोय होती. मतदार कोणाला मत घालतोय हे दिसू नये अशा पद्धतीने या पेट्या ठेवण्यात आल्या होत्या. मतदान संपल्यानंतर तेथेच मतमोजणी सुरू करण्यात आली. जेवढे गाव तेवढी मतदान केंद्रे असल्याने प्रत्येक मतदानकेंद्रावरचा निकाल मिळून तो जाहीर करेपर्यंत दुसरा दिवस उजाडला होता. त्यामुळे पूर्ण अधिकृत निकाल 25 ऑक्टोबर 1962 रोजी जाहीर झाला.

31 पंचायती बिनविरोध

या निवडणुकीत 31 पंचायती बिनविरोध निवडून आल्या होत्या. हा निकाल 19 ऑक्टोबर 1962 रोजी जाहीर करण्यात आला होता. एकूण 149 पंचायतींसाठी निवडणूक झाली होती आणि जागा होत्या 1039. प्रत्येक पंचायतीत 1 एक जागा महिलांसाठी राखीव होती. या पंचायती लोकसंख्येच्या प्रमाणात 5, 7 व 9 सदस्यीय होत्या. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ही निवडणूक एका विरुद्ध एक उमेदवार अशी नव्हती. सध्या जसे एका जागेसाठी कितीही उमेदवार उभे राहतात आणि त्यातला सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार विजयी होतो, तशी ही निवडणूक नव्हती. पंचायतीत 9 जागा आहेत आणि निवडणुकीसाठी 15 उमेदवार उभे राहिले आहेत तर त्यातले सर्वांत जास्त मते मिळवलेले पहिले 9 उमेदवार विजयी ठरवले जायचे. प्रत्येक पंचायतीत महिलांसाठी एक जागा राखीव होती. त्यासाठी एकाच महिलेने उमेदवारी दाखल केली तर तिलाच विजयी घोषित केले जायचे, पण एकापेक्षा जास्त महिलांनी उमेदवारी दाखल केली तर ज्या महिलेला जास्त मते मिळाली तिला विजयी घोषित केले जायचे. जर महिला उमेदवारच निवडणुकीत नसला तर त्याठिकाणी नंतर महिला उमेदवार स्वीकृत करण्याची सोय होती. या निवडणुकीत 40 पंचायतीत महिला उमेदवारांनी निवडणुका लढवल्या नव्हत्या. त्यांच्या जागी नंतर महिला उमेदवार स्वीकृत करावे लागणार होते. काही पंचायती जशा बिनविरोध निवडून आल्या म्हणजे जेवढ्यास तेवढे उमेदवार उभे राहिले होते, तशाच प्रकारे काही ठिकाणी पुरेसे उमेदवार उभे न राहिल्याने त्या ठिकाणी उमेदवार नंतर स्वीकृत करावे लागले होते.

महाराष्ट्रातून आले होते अधिकारी…

या निवडणुकीत हत्ती, बैल, तलवार, बैलगाडी, माप, हात, झाड, घर, साप, पक्षी, मासा, सायकल, माणूस, चंद्र, वाघ, छत्री, मोटर कार, कुत्रा, बोकड, ङ्गूल, आंबा, अननस, नारळ, केरोसिनचा डबा, घड्याळ, खूर्ची व शिडी अशा 27 निशाण्या दिल्या होत्या. याशिवाय आणखी गरज पडली तर निवडणूक अधिकार्‍याला यापेक्षा वेगळे चिन्ह निवडणूक निशाणी म्हणून देण्याचा अधिकार होता. देशाने गोव्यापूर्वी दहा वर्षे निवडणुकीचा अनुभव घेतला होता. गोव्यासाठी हा अनुभव नवीन होता. तरीही लोकांनी मतदानात उत्स्फूर्त सहभाग दर्शवला होता. निवडणुकीच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र आणि तत्कालीन मैसूर राज्यातून अधिकारी आणण्यात आले होते. गोव्याच्या राजकीय जीवनाची सुरूवात पंचायत राजनेच झाली. आता पंचायत राज बरेच रूळले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!