तरूणाईचे ‘मार्ग’दर्शक गुरूनाथबाब केळेकर अंतरले

Goan Varta Live | प्रतिनिधी
तरूणाईवर पूर्ण विश्वास ठेवून जीवनभर कार्यरत राहिलेली एक अखंड धडपड वयाच्या 91 व्या वर्षी अखेर शांत झाली. मंगळवार 19 रोजी पहाटे गुरूनाथ केळेकर या संसाराला अंतरले.
एक चळवळी विचारवंत म्हणून ओळख असलेले गुरूनाथबाब हे होतेच मुळी अष्टपैलू व्यक्तीमत्व. स्वातंत्र्यसैनिक, साहित्यीक, कोषकार, पत्रकार, प्रकाशक, सामाजिक कार्यकर्ते, मार्गदर्शक आणि गांधी-नेहरूंच्या विचारांना सातत्याने डोळ्यांसमोर ठेवून स्वतः त्यांचे अनुकरण करून त्याच ध्येयाने जगणारे विचारवंत.
त्यांचे पार्थिव बुधवार 20 जानेवारीला मडगांव हरी मंदिर चाळीसमोरील कामत बिल्डिंगमधील त्यांच्या घरी सकाळी 9.30 पासून अंतिमदर्शनासाठी ठेवलं जाईल. यानंतर 11.30 वाजता मडगांवातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.

त्यांचे पुत्र समीर केळेकर, हे आयआयटीएन आहेत. गुरुनाथबाब हे अधिकतर पणजीत आपल्या दोन्ही डॉक्टर कन्या चित्रा आणि संजीवनी यांच्यासोबतच राहायचे. तिथेच 19 रोजी पहाटे 3.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहीलेले गुरुनाथबाब रोजनिशीच्या आपल्या सवयीप्रमाणे सोमवारी संध्याकाळी चिंबल येथे त्यांचे सहकारी नागेशबाब करमली यांची भेट घेऊन आणि त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करून आलेले. गरजू कार्यकर्ते आनी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ‘जीवनायन’ ही संस्था घडवण्यात या दोघांचेही मोठे योगदान होते. या संस्थेच्या कार्यासंबंधी माहिती देणारा सविस्तर लेख त्यांनी अलिकडेच 14 जानेवारीच्या ‘भांगरभूंयं’ या कोकणी दैननिकांत प्रसिद्ध केला होता. कदाचित हा त्यांचा शेवटचा लेख ठरावा.
स्वातंत्र्यसैनिक म्हणून गौरव केलेले गोवा सरकारचे ताम्रपत्र, कोंकणी भाषा मंडळाचा कोंकणी सेवा पुरस्कार, महात्मा गांधी यांच्या ‘सत्याचे प्रयोग’ या अनुवादीत पुस्तकासाठी मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार हे त्यांना प्राप्त झालेले काही महत्वाचे बहुमान.
17 आणि 18 फेब्रुवारी 1990 असे दोन दिवस पेडणे येथे आयोजित अखिल भारतीय कोंकणी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तेव्हा ‘मळबपिशें लागिल्ल्या कोंकणी जॉनाथॉनांक’ (आभाळवेड लागलेल्या कोकणी जॉनाथॉनाला) असे आवाहन तरूणाईला करून त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाला केलेली सुरूवात अजूनही अनेकांच्या स्मृतीत आहे. (Jonathan Livingston Seagull by Richard Bach)

आपल्या विशिष्ट्य भाषाशैलीतून लोकांच्या थेट ह्रदयाला भीडण्याची ताकद त्यांच्यात होती. एकमेकांना भेटतो त्यावेळी ‘हॅलो, कसा आहे’ किंवा ‘हाव आर यू’ असे न बोलता ‘बरें गोंय’ असं म्हणून एकमेकांना हटकूया ही त्यांची शिकवण आज अनेकजण अवलंबितात.
सभोवतालच्या राजकारणाने भरलेल्या जगात वावरताना आम्ही मतदार म्हणून नव्हे तर भारतीय संविधानाची मुल्ये सांभाळणारे नागरीक बनून जगूया आणि माणूसकीच्या वाटेने चालूया ही त्यांची आखणी एक शिकवण.
गावडा समाजातल्या भाडेली
( बाजारात गडीकाम करणाऱ्या महिला) यांच्या प्रामाणिकपणाचा आणि कष्टांचा गौरव करण्यासाठी त्यांनी त्यांचा सत्कार घडवून आणला होता. त्यांच्याकडून स्फुर्ती घेऊनच दत्ता दामोदर नायक यांनी मडगांव नगरपालिका उद्यानासमोर भाडेलींचे शिल्प उभारले आहे.
Deeply pained by the demise of veteran freedom fighter Shri Gurunath Kelekar. His contribution to the liberation movement of Goa and public life will always be remembered. My thoughts and prayers are with his family in this hour of grief. pic.twitter.com/ESCbiE6dwc
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) January 19, 2021
निरंतर स्वातंत्र्यसैनिक
गोवा मुक्ती संग्राम चळवळीतील ते एक अग्रणी सैनिक. 1954 वर्षी 21 जून रोजी त्यांना अटक झाली आणि 13 महिने ते आग्वाद कैदेत राहीले. त्यानंतर जुलै महिन्यात त्यांची सुटका झाली एवढेच त्यांचे योगदान नाही. त्यांचे चुलतबंधू रविंद्रबाब केळेकार यांच्याकडून स्फुर्ती घेऊन 21 व्या वर्षी त्यांनी मुक्तीसंग्रामात उडी घेतली होती.

गोव्याचे भाग्यविधाते आणि पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पहिल्याच सरकारात मंत्री राहीलेले स्वातंत्र्यसैनिक अँथनी डिसोझा आणि अण्णा देशपांडे यांच्यासोबत ते वावरत होते. या दोघांचाही थांगपत्ता शोधण्यासाठी त्यांना पोर्तुगीज शिपायांनी बरीच मारबडव केली होती पण शेवटपर्यंत त्यांनी अजिबात सुगावा लागू दिला नाही.
शाळा आणि ग्रंथालयांनी फिरून शिक्षक, वाचक आणि विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसंग्रामांत सहभागी होण्यासाठी ते आवाहन करायचे. कैदेतून बाहेर पडल्यावर सांस्कृतिक, शैक्षणिक आणि साहित्यीक कार्यक्रमांतून त्यांचे स्वातंत्र्यसंग्रामाचें कार्य सुरूच होते.
गोंयचे सुटके झुजारी, मार्गाचे संस्थापक, कोंकणी मोगी, गांधीवादी आनी म्हजे मार्गदर्शक गुरूनाथबाब केळेकार संवसाराक अंतरले. तांका म्हजीं आर्गां. तांच्या घरच्यांचे दुख्खांत हांव सहभागी आसां. pic.twitter.com/KepQbhiYCR
— Digambar Kamat (@digambarkamat) January 19, 2021
गोवा मुक्तीनंतर महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचे महत्वाचे कार्य मागील 59 वर्षे ते करीत होते. गांधी यांचे ‘सत्याचे प्रयोग’ हे आत्मचरित्र कोंकणींतून अनुवादीत करणे, पं. नेहरू यांची सचित्र यात्रा घेऊन गोवाभर फिरणे, नेहरूंचे सगळे साहित्य एकत्रित करून मडगावात ‘नेहरू केंद्र’ उभारणे असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. हे नेहरू केंद्र अजूनही कार्यरत आहे.
पोर्तुगीज संसदेत गोव्याचा प्रतिनिधी म्हणून गोव्याच्या राष्ट्रवादी चळवळीचा पाया घट्ट करणारे फ्रान्सिस लुईस गोम्स हे गोमंतकीयांसमोर पोहचले ते केवळ गुरुनाथबाबांमुळे. मडगांव कोमुनिदाद इमारतीजवळील त्यांच्या पुतळ्याकडे ते तरूणाईला बोलावून त्यांच्या कार्याची माहिती देणारे कार्यक्रम आयोजित करायचे.
फ्रान्सिस लुईस गोम्स यांचा पुतळा मोडल्यानंतर त्याची नव्याने उभारणी करणे, लोहिया मैदान स्वच्छ करून तिथे लोहिया यांचा पुतळा उभारणे आणि 18 जून समिती स्थापन करून राम मनोहर लोहीया यांचे कार्य गोमंतकीयांसमोर मांडण्यासाठी त्यांनीच तर पुढाकार घेतला होता.
जनसामान्यांचा पत्रकार
गुरूनाथबाब यांचा मुळचा पिंडच पत्रकाराचा. गोवा मुक्तीनंतर 11 मार्च 1962 या दिवसापासून त्यांनी ‘नवें गोंय’ (नवा गोवा) हे पाक्षिक सुरू केले. ते 1970 पर्यंत चालवले. यानंतर ‘गोंयचो मोग’ (गोव्याचे प्रेम) हें साप्ताहिक रोमी कोंकणींतून चालवले.
1980 च्या दशकात कोंकणीतून दैनिक हवे म्हणून नवें गोंय
प्रतिष्ठानाची स्थापना त्यांनी केली. कामगार नेते ख्रिस्तोफर फोंसेका यांना सोबत घेऊन 67 दिवसांची पदयात्रा गोवाभर काढली. यासाठी लोकांकडून निधी जमा केला. त्यातून ‘नवें गोंय’ हे रोमी कोंकणींतलें सायंदैनिक काही काळ त्यांनी चालवले. पुढे निधीअभावी त्यांचे हे सायंदैनिक बंद पडले. या पदयात्रेत गोव्यातील अनेक विद्यार्थी आणि युवकांनी मोठ्यासंख्येने सहभाग घेतला होता.
दुसरीकडे दैनिकांतून आणि इतर पाक्षिक, साप्ताहिकांतून त्यांचे स्तंभलेखन सुरूच होते. मुद्देसूदपणाने विचारांची मांडणी करणे आणि लोकांना साधेपणाने कळेल अशा भाषेत ते लिहायचे. त्यांच्या लेखणीतून ते वाचकांना जणू संमोहीतच करायचे. भारतीय संविधानांतील मुल्ये, गांधीवाद आणि नेहरूंची विचारधारा घेऊन केलेले त्यांचे लिखाण संग्रहीत करून पुढील पिढीसाठी सांभाळून ठेवण्यासारखे आहे.

बालसाहित्यीक
गुरुनाथबाब यांच्या विचारांची जेवढी खोली तेवढीच लहान मुले आणि युवकांच्या काळजाला हात घालण्याची त्यांची प्रगल्भता होती. आपली पत्नी कुमुदिनीयांना घेऊन ‘मारुती’ हें बालसाहित्याचे मासिक त्यांनी सुरू केले. हे मासिक बरेच लोकप्रिय बनले. याबरोबरच त्यांच्या संजीवनी प्रकाशन संस्थेने बालसाहित्याची कमीत कमी 30 पुस्तके प्रकाशित केली आहेत.
गुरुनाथबाब हे केवळ लेखन करून किंवा पुस्तके प्रकाशित करून थांबले नाहीत. ही पुस्तके लहान मुलं आणि वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी कोकणी साहित्य यात्रा आयोजित करून गावांगावांत कोंकणी साहित्याचा प्रचार केला. ‘चाचा नेहरू मुलांच्या भेटीला ’ ही बालसाहित्याची यात्रा गोवाभर फिरवली. गोव्यातील दरएका मुलाकडे किमान एक कोंकणी पुस्तक असावे ही इच्छा बाळगून ते अविरतपणे काम करीत राहीले.
महात्मा गांधी यांच्या ‘सत्याचे प्रयोग’ या पुस्तकाच्या अनुवादासाठीचा त्यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार मिळाला. त्यांचे तेवढेच महत्वाचे पुस्तक मागील ऑगष्ट महिन्यात प्रकाशित झाले ते म्हणजे ‘कसे होते गांधीजी’. महात्मा गांधी यांच्या जीवनपटच त्यांनी या पुस्तकातून उभा केलाय. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांनी हे पुस्तक लिहीलंय.
गोवा मुक्त झाल्यानंतर 1963 साली मे महिन्यात प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू पहिल्यांदाच गोव्यात आले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांतील भाषणांचे संकलन गुरूनाथबाब यांनी केलेय. ‘Nehru in Goa’ हें त्यांचे पुस्तक आज एक दुर्मिळ संदर्भग्रंथ बनलेय.
कोकणी भाषेवर प्रभूत्व मिळवण्यासाठी त्यांनी काढलेला कोकणी शब्दकोष आजही अनेक नवोदीत तसेच प्रतिथयश लेखक वापरतात. लोकांमध्ये फिरून त्यांनी कोकणी शब्दांचे संकलन करून हा शब्दकोष तयार केला होता. अकॅडॅमिक सोबतच साहित्याच्या चौफेर प्रांगणात त्यांनी कोकणी भाषेसाठी अविश्रांत काम केलेय.
क्रांतीकारी मार्ग
‘मार्ग’ या त्यांनी घडविलेल्या अभियानाने तर देशभरात क्रांती केली. ‘मार्ग संस्कृती’ ही संकल्पना जनमानसात रूजवली. पादचारीसहीत वाहन चालकांनी रस्त्यावर कसे वागावे यासाठी त्यांनी राज्यव्यापी अभियान चालवले. मागील सरकाराकडून त्यांच्या या अभियानाला अनुदानही प्राप्त करून देण्यात आलं. या अनुदानाचा वापर करून त्यांनी गोमंतकीय विद्यार्थ्यांना देशाच्या वेगवेगळ्या राज्यांत भ्रमंती करून त्यांना नागरीक चळवळीचे महत्व पटवून दिले. देशातील अनेक विद्वानांच्या सहाय्याने त्यांनी मार्ग संस्कृतीवर अनेक परिषदांचेही आयोजन केले.
फक्त वाहनचालकांतच नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये काम करून त्यांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूकीत सुसुत्रता आणून ‘वाहतूक पहारेकरी ’ तयार केले. विद्यार्थिच वाहतूक नियंत्रित करण्याच्या कामात गुंतले. ही परंपरा मडगांवात आजही चालू आहे. कुठल्याच कार्यक्रमावेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून त्यांनी पार्किंग व्यवस्थेचे अभियानही राबवले. शाळा ते कॉलेजपर्यंत काम करून तयार झालेले सुमारे 70 हजार विद्यार्थी आज गोवाभर पसरलेत. गावांगावात तयार केलेले मार्ग कार्यकर्तेही हे अभियान यशस्वीपणे पुढे नेत आहेत.
सिटीझन फर्स्ट
आम्ही या देशाचे प्रथम नागरीक, मग इतर कोण कोण आहोत असं ते नेहमीच सांगत. यासाठी Insitute of Citizenship & Civic Sense Education ही संस्था त्यांनी हल्लीच नव्वदी ओलांडतेवेळी स्थापन केली. त्यातून गोवाभरात 10 शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांचे नागरी क्लब स्थापन केले.
संविधानांत फक्त नागरीकांचे हक्क सांगितले नाहीत तर प्रत्येक नागरीकाचे कर्तव्यही अधोरेखीत केलंय. ही गोष्ट ते नेहमीच शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना ठासून सांगत. त्यातूनच या देशाचे समर्थ नागरीक घडवण्याचे ध्येय बाळगून गुरूनाथबाब यांनी केलेले कार्य आजच्या घडीला तेवढंच गरजेचं आहे.
ही अशी दूरदृष्टी असलेले आणि अखंड कार्याची ज्योत हाती घेऊन अविश्रांतपणे काम करणारे गुरूनाथबाब आज निजधामाला पोहचले आहेत. त्यांनी पाया घातलेली ही चळवळ यापुढेही थांबता कामा नये.
या चालत्या- बोलत्या चळवळीला आदरपूर्वक नमन !
(पत्रकार संदेश प्रभूदेसाय यांनी गोवा न्यूज वेबपोर्टलसाठी मूळ कोकणीतून लिहीलेल्या लेखाचा मराठी अनुवाद )