प्लीज! भाषावादाचं राजकारण करू नका

मराठी विरुद्ध कोकणी वादावर पुन्हा ठिणगी

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

आम्ही गोंयकार. देशातल्या प्रत्येक राज्यांना आपल्या प्रादेशिकत्वाचा जसा अभिमान आहे, तो अभिमान आम्हालाही आहे. कोकणी ही आमची मातृभाषा. दुर्दैवाने गोवा मुक्त झाला त्यावेळी शिक्षणात कोकणीचा अवलंब करण्या इतपत या भाषेचा विकास झाला नव्हता. सहजिकच मराठी शिक्षणाचा प्रसार झाला. आज बहुतांश गोंयकारांचे शिक्षण मराठीतून झाले पण म्हणून कोकणीच्या अभिमानात कुठेच कमी राहीलेली नाही. जे कुणी भाषीक दंभाचे दर्शन घडवतात आणि एकमेकांच्या भाषांचा द्वेष करतात त्यांच्याबाबत बोलून कुत्र्याचं शेपूट सरळ करण्याचा प्रयत्न करण्यात काय अर्थ आहे.

कोकणी- मराठी भाषिक वादाचे चटके या राज्याने सोसले आहेत. कोकणीला राज्यभाषेचा दर्जा मिळाला. मराठीला सहराज्यभाषेचा दर्जा मिळालाय,असं म्हटलं जायत पण त्यातून मराठीचे नुकसान तर झालेले नाही पण कोकणी राज्यभाषा झाली असली तरी त्याला अपेक्षित विकास झालेला नाही हे देखील तेवढेच खरे. वेगवेगळ्या अकादम्यांना किती अनुदान मिळते यावरून भाषेच्या स्वाभिमानाची तीव्रता ठरत असेल तर ते दुर्दैवीच म्हणावे लागेल.

कोकणी तरणाट्यांनी शनिवारी अस्मिताय दिस म्हणजे अस्मिता दिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा केला. 16 जानेवारी हा जनमत कौलाचा दिवस. गोव्याच्या इतिहासात या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण व्हावे की गोवा हा संघप्रदेश असावा यावरून निवडणूक झाली. या निवडणूकीत गोंयकारांनी संघ प्रदेशाला पसंती दिली. गोंयकारांनी आपला कौल विलिनीकरणाला दिला असता तर आजच्या घडीला गोवा हा महाराष्ट्राचा एक जिल्हा म्हणून राहिला असता. गोव्याची एक वेगळी ओळख, संस्कृती, भाषा, परंपरा आहे. गोव्याचे वेगळंपण टिकलं नसतं तर या सगळ्या गोष्टींवर गडांतर आलं असतं आणि त्यामुळे जनमत कौलावेळी गोंयकारांनी दिलेला कौल हा खूपच महत्वाचा ठरतो याबाबत कुणाचेही दुमत असू नये. तर राज्यभरात हा अस्मिताय दिवस साजरा केला जातो. परंतु गोंयकार तरणाट्यांच्या नावाने पर्वरी येथील गोमंतक मराठी अकादमीच्या वास्तुसमोर अस्मिताय दिवस साजरा करण्याची ही कल्पना नेमकी कुणाला का सुचली आणि यामागे नेमके काय राजकारण आहे, हा खरोखरच विचार करण्यासारखाच प्रश्न आहे. यामागे कुणाचा नेमका काय डाव आहे.

कुणाचं षडयंत्र?

कुणीतरी पुन्हा इथे भाषावाद पेटवण्याचे कारस्थान तर रचत नसेल. अस्मिता दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करता येणे शक्य होते. कोकणीचा प्रशासनात वापर व्हावा, अधिकाधिक सरकारी पातळीवर कोकणीचा वापर व्हावा, कोकणीतून सरकारी गॅजेट प्रसिद्ध व्हावे, सरकारी अधिकाऱ्यांना कोकणीचे प्रशिक्षण मिळावे, कोकणीतून सरकारी पत्रव्यवहार व्हावा आदी मागण्यां करून खऱ्या अर्थाने अस्मिता दिवस साजरा करता येणे शक्य होते. ते न करता गोमंतक मराठी अकादमीच्या दारातच अस्मिता दिवस साजरा करण्याचा हा अट्टाहास कुणी केला. कोवळ्या तरणाट्यांना विशेष आमंत्रित करून त्यांना तिथे भाषण देण्यास लावण्याची ही क्लुप्ती नेमकी कुणाची आणि त्यातून नेमकं काय साध्य करण्याचं षडयंत्र रचलं जातय, या सगळ्याच गोष्टींकडे बारीकपणाने विचार करणे गरजेचंच ठरणार आहे.

दिल्लीतून पडली ठिणगी

दिल्लीत आम आदमी पार्टीने कोकणी अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सहजिकच ही खरोखरच स्वागतार्ह गोष्ट असल्याने त्याचे गोव्यात स्वागत होणे स्वाभाविकच आहे. या घोषणेनंतर काही तथाकथित मराठीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. काही मराठी वृत्तपत्रांनीही ह्यात आपले हात धुवून घेतले. दिल्लीत मराठी अकादमी यापूर्वीच स्थापन करण्यात आलीय. आता कोकणी अकादमी स्थापन केली म्हणून पोटात दुखायचे काही कारणच नव्हते. परंतु काही लोकांना आपल्या अकलेचे घोडे पुढे दामटण्याची सवयच लागली आहे. अशा अर्धवट घोड्यांवर आपला डाव लावून काही लोक आपली पोळी भाजून घेत असतात हे काही नवे नाही. या एकूणच प्रकरणाचे द्वंद्व फेसबुक, व्हॉटसअपवर सुरू झाले. एकमेकांवर चिखलफेक, आरोप- प्रत्यारोप झाले. हे सगळे ठिक होते. समाज माध्यमांवर हे रोजच चालतं.

एक्शन रिएक्शन

आता कोकणीवर आरोप करणारी एक व्यक्ती ही गोमंतक मराठी अकादमीच्या एका महत्वाच्या हुद्दावर आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु ही व्यक्ती समाज माध्यमांवर व्यक्तीगत स्वरूपात रिऍक्ट झाली होती. संस्थेने पत्रक काढून अथवा संस्थेच्या व्यासपीठावरून कोकणीवर आरोप किंवा कोकणीचा द्वेष करण्याची कृती काही घडलेली नव्हती. परंतु अशा प्रसंगी स्वतःला बुधवंत म्हणून घेणारे काही लोक आपला डाव साधतात. इथेही तेच घडले.

कुणीतरी एका सराला हा विषय पेटवण्याची बुद्धी सुचली. त्यांनी लगेच फोनाफोनी सुरू केली. तरणाट्यांची एक फौज तयार केली. व्हॉटसअपवर मेसेजीस टाकल्या. बरं मेसेजीस केवळ कोकणीत नव्हे बरं का, रोमी लिपीतूनही पाठविण्यात आले. म्हणजे हा जो काही कट शिजवला गेला त्यामागचे जे कुणी सर आहेत ते बरेच पुढारलेले होते हे काही लपून राहीले नाही. समाज माध्यमावरील एखाद्या चर्चेला अशा पद्धतीने सार्वजनिक मुद्दा बनवून त्यातून समाजमन दूषीत करण्याचे हे प्रयत्न योग्य आहेत आहे.

परिपक्व विरूद्ध अपरिपक्वता

तिथे काही मोजक्याच तरणाट्यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली. त्यात बहुतांश तरणाट्यांनी आपल्या वैचारीक परिपक्वतेचे दर्शन घडवले. एका मराठी शिक्षिकेनेच इथे भाषण दिले. कोकणी हा आपला स्वाभिमान आहे,.असंही त्या म्हणाल्या. पण आणखी एका तरणाट्याने आपल्यातील वैचारीक अपरिपक्वतेचे दर्शन घडवलंच. कदाचित या एकूणच कटाचे मास्टरमाईंड असलेल्या सरांनी त्याला योग्य मार्गदर्शन दिलेलं नसेल. राहूल नाईक पोटाच्या बेंबीपासून बोलला. पण काय बोलला हे त्याचे त्यालाच जेव्हा कळले असेल तेव्हा त्याची स्वतःची मान शरमेने खाली गेलेली असेल यात शंका नाही.

बरं फेसबुकवर हे सगळं जेव्हा लाईव्ह सुरू होतं तेव्हा हे तरणाटेच दिसत होते पण सभोवताली या तरणाट्यांची प्रेरणास्थाने असलेली मंडळी मात्र आजूबाजूला उभी होती म्हणे. आता तिथे एका गाढवाचा पुतळा आणला गेला होता. या पुतळ्यासमोर कोकणी आरती सादर करण्याचे प्रयोजन समजले नाही. आता या एकूणच प्रकरणाची पार्श्वभूमी ज्यांना माहित असेल त्यांनाच हे कळेल. ही पार्श्वभूमीही याठिकाणी स्पष्ट करण्यात आली नाही. कुणीतरी एका मराठीप्रेमीने कोकणीत एकही आरती नाही,असा आरोप केला होता. त्याला उत्तर म्हणून याठिकाणी ह्याच मराठीप्रेमीचे प्रतिक म्हणून तयार केलेल्या गाढवाच्या प्रतिमेसमोर कोकणी आरती सादर करण्यात आली. कोकणी भक्तीगीत सादर करण्यात आले.

ज्यांना प्रत्यक्ष या घटनेची पार्श्वभूमीच ठाऊक नाही ते लोक या प्रकाराकडे काय म्हणून पाहतील. लोक काहीही म्हणोत, त्याचे तथाकथित मास्टरमाईंडवाल्यांना काहीच पडून गेलेले नसणार. फक्त लोकांची माथी भडकवावीत आणि दोन्ही गटांनी एकमेकांना आव्हान- प्रतिआव्हान देऊन मैदानात उतरावे. राज्याची शांतता बिघडवून राजकीय व्यवस्था अस्थिर बनवावी आणि हे सगळे पाहून मस्त मजा बघत राहावी हाच काय तो त्यांचा डाव. बाकी कुणी काहीही नाटकं आणि तियात्रं करोत. मनोरजंन म्हणून त्याकडे पाहायचं आणि आपलं काम करत रहायचं. भाषावादाची भूतं उरकून काढून एकमेकांची डोकी फोडण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या या छुप्या खलनायकांपासून सावधान एवढंच सांगावसं वाटतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!