प्रा. गोपाळराव मयेकर : मुंबईतले शिक्षक ते गोव्यातले शिक्षणमंत्री

प्रा.गोपाळराव मयेकर यांच्या गतस्मृतींना उजाळा देण्याच्या हेतूने 'गोवन वार्ता लाईव्ह'च्या बेव पोर्टलवर वाचकांसाठी हा लेख

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोव्याचे माजी शिक्षणमंत्री गोपाळराव मयेकर यांचं २२ जुलैला निधन झालं. ते माजी खासदार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, गोमंतक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष होतेच. शिवाय वक्ते, लेखक, कवी, शिक्षक म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्यांच्या भेटीचा हा वृत्तांत दैनिक गोवदूतमधे सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. प्रा.गोपाळराव मयेकर यांच्या निधनाने त्यांच्या गतस्मृतींना उजाळा देण्याच्या हेतूने ‘गोवन वार्ता लाईव्ह’च्या बेव पोर्टलवर वाचकांसाठी हा लेख देत आहोत.

हेही वाचाः ‘या’ सरकारी बाबुंचं ‘हनिमुन’ संपवणार मोदी सरकार !

म्हापसा गणेशपुरी टेकडीवर बंगल्यांची गर्दी आहे. त्यातला ‘रविबिंब’ हा एक बंगला प्रा. गोपाळराव मयेकरांचा. दुपारची वेळ असते. मयेकर सर झोपले असतील असं वाटून आपण बेल वाजवायला मागेपुढे करतो. पण दरवाजा उघडल्यावर कळतं, सर फक्त जागेच नाहीत, तर कामात अगदी नखशिखांत बुडालेले आहेत. सर अत्यंत हसर्‍या चेहर्‍याने आपलं स्वागत करतात.

हेही वाचाः संपत्तीवर ज्येष्ठांचा वास्तविक हक्क; मुलं फक्त ‘लायसन्सधारक’ असतात

बोलण्यात विचारांची सलगता

शाळेतल्या कागदानुसार त्यांची जन्मतारीख १० मार्च १९३४ पण जन्मपत्रिकेनुसार ती २६ मार्च. तीच ते धरून चालतात. म्हणजेच परवाच्या बुधवारी सर ऐंशी वर्षांचे होतील. सरांच्या शरीरावर वयाच्या खुणा दिसतात. त्यांच्या हालचाली मंदावलेल्या आहेत. पण बायपास आणि त्यानंतर आलेला अर्धांगवायू या आघातांच्या तुलनेत ते कडक आहेत.

पांढर्‍याशुभ्र वेशातले सर अगदी प्रसन्न दिसतात. मात्र त्यांच्या चेहर्‍यावरचं समाधान त्याहीपेक्षा प्रसन्न असतं. आणि ते बोलायला सुरुवात करतात तेव्हा तर सगळंच विसरून जायला होतं. ज्ञानेश्वर माउलीचा आशीर्वाद असलेली त्यांची वाणी ऐकत राहावी अशी वाटते. खणखणीत आवाज. स्पष्ट शब्दोच्चार. विचारांची सलगता. आपण दंग होऊन जातो.

हेही वाचाः कामुर्लीत २.१० लाखांचे ड्रग्ज जप्त

अशीय फोटोेबायोग्राफीमागची कल्पना

‘माझा जन्म मुंबईचा. मी तिथंच घडलो. माझ्या आयुष्यातला अठ्ठावीस वर्षांचा काळ तिथं गेला,’ सर सांगतात. सांगताना थांबतात. ‘थांबा, मी तुम्हाला दाखवतो ती मुंबई.’

आतल्या खोलीत भरपूर पुस्तकं असतात. टेबलावर बारीक बारीक नोट्स काढलेल्या अनेक वह्या. तिथंच एक कम्प्युटर. सर कम्प्युटरसमोर बसतात. सराईतपणे कम्प्युटर सुरू करतात.

शांतपणे एकेक फोल्डर उघडून चाईल्डहूड नावाच्या फोल्डरमधे पोचतात. त्यात असतो मुंबईमधल्या गिरणगावातला करीरोडचा परिसर. त्यांचं बालपण गेलं त्या गूळवाल्या चाळीचं रेखाचित्र. आईवडिलांचे फोटो. शिरोडकर हायस्कूल. त्यातले शिक्षक. असं बरंच काही. प्रत्येक फोटोशी जोडलेल्या स्मृती आणि त्यावर सरांकडे असणारं सांगण्यासारखं इतरही.

‘मज दान कसे हे पडले?’ नावाचं सरांचं आत्मचरित्र आहे. वयाच्या सत्तरीत लिहिलेला मोठ्या ए फोअर साईजच्या सहाशे पानांचा हा ग्रंथ. आता त्यापुढे जात सगळ्यांना सहज वाचता यावं असं नवं आत्मचरित्र लिहिण्याची तयारी सुरू आहे. फोटोंचा हा संसार त्याचसाठी उभा केलेला आहे. कुठून कुठून जमा केलेले फोटो. हजारो फोटोंमधून निवडक फोटोंची वेचणी. त्या प्रत्येक फोटोविषयी थरथरत्या हाताने लिहिलेली टिपणं.

काम मोठं आहे. सोपं नाही. पण ते नियमित सुरू आहे. आपले अनुभव नव्या पिढीपर्यंत पोचावेत यासाठी ही सगळी धडपड आहे. फोटोंच्या मदतीनं लिहिलं तर तरुण वाचतील अशी खात्री आहे. पु. ल. देशपांडेंनी अशीच ‘चित्रमय स्वगत’ नावाची फोटोेबायोग्राफी लिहिलीय. तसंच हे काहीतरी आहे.

हेही वाचाः ‘भारतीय पॅनोरमा’साठी प्रवेशिका पाठवण्याचं ‘ईफ्फी’चं आवाहन !

मुंबईतल्या बालपणानं संघर्ष शिकवला

त्यांचं बोलणंही अगदी चित्रमय असतं. बोलताना सगळं डोळ्यांसमोर उभं राहतं. फोटोंची गरजही उरत नाही. त्यांची स्मृती अगदी तल्लख आहे. माणसं, त्यांची नावं, स्थळं सगळं बारीकसारीक लक्षात असतं. कधीकधी तारखा विसरतो असं म्हणतानाच ते अनेक तारखा सहज बोलताना सांगून जातात. अगदी लहानपणाचंही त्यांना सगळं लख्ख आठवतं.

हेही वाचाः ‘गोवन वार्ता लाईव्ह’ला रिकार्डो यांची Exclusive प्रतिक्रिया; निवडणूक लढवण्यावर म्हणाले की..

‘आज मी जो आहे तो मुंबईमुळेच. माझं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. मुंबईने मला परिस्थितीशी संघर्ष करायला शिकवलं. सर्व बाजूंनी मला घडवलं. तिथं मला वक्तृत्वाचे धडे मिळाले. मी खेळ शिकलो आणि तिथंच मी अभ्यास करायलाही शिकलो. उथळ गोष्टी करण्याऐवजी मुळात शिरून शिकण्याची मानसिकता मुंबईने दिली.’ गिरणीत काम करणार्‍या आईवडलांचा हा मुलगा सांगत होता.

‘मुंबईतला माणूस पुन्हा मुंबईत जातो, असं म्हणतात. पण माझ्याबाबतीत असं झालं नाही; कारण मुंबईशी माझा संपर्क तुटला नाही. कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त, कार्यक्रम, व्याख्यानांच्या निमित्त माझं मुंबईला जाणं सुरूच राहिलं,’ ते सांगतात.

हेही वाचाः या आहेत त्या १० गोष्टी ज्यावर पावसाळी अधिवेशनात गाजणार

अनपेक्षितपणे राजकारणात

बायको सासरी जाण्याऐवजी मीच सासरी आलो, असं ते गमतीनं त्यांच्या गोव्याला येण्याचं वर्णन करतात. १९६२ ला ते धेंपे कॉलेजात संस्कृत, मराठीचे प्राध्यापक म्हणून गोव्यात आले. त्याआधी ते मुंबईला जिथं शिकले त्या, त्यांच्या प्राणप्रिय शिरोडकर हायस्कूलमधे शिक्षक होते.

गोव्यात पूर्वजांच्या भूमीशी नाळ पुन्हा जुळली. इथं ते रमले. राहणं म्हापशात आणि नोकरी पणजीत होती. थोडं सामाजिक काम, लिखाण, भाषणं सुरू झाली. आणि अचानक पाचच वर्षांनी ते गोव्याचे मंत्री बनले.

‘मी कॉलेजात शिकवत होतो. बाहेर म्हापशातले महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कार्यकर्ते तास संपण्याची वाट बघत उभे होते. ते माझे मित्रच होते. तास संपला. त्यांनी मला सांगितलं, तुम्हाला निवडणूक लढवायचीय. आपल्याला उमेदवारी अर्ज भरायला जायचंय. मी त्यांचं ऐकलं. कारण मला नवा अनुभव घ्यायचा होता.’

आज निवडणुकांच्या बातम्या वाचताना सर सांगतात त्यावर विश्वास बसत नाही. पण तो काळ वेगळाच होता. विलीनीकरणासाठी घेण्यात आलेल्या मतदानात महाराष्ट्रवादाचा पक्ष हरला होता. तरीही त्याच्याच नंतरच्या निवडणुकीमधे गोव्याने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला भरभरून मतदान केलं.

हेही वाचाः गुणाजी मंद्रेकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुणगौरव

गोव्यात महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री

सर म्हापशाचे आमदार बनले. ‘मी मंत्री बनेन किंवा त्यासाठी काही लॉबिंग करावं लागतं हे मला माहीत नव्हतंच. पण मला अचानक निरोप आला. मी मंत्रिपदाची शपथही घेतली,’ सर सांगतात.

भाऊसाहेब बांदोडकरांच्या मंत्रिमंडळात सर शिक्षण, पर्यटन, बांधकाम अशा पाच महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री बनले. आज मुख्यमंत्र्यांचा बंगला असलेल्या महालक्ष्मी बंगल्यावर त्यांचं बिर्‍हाड आलं. 

मंत्रिपद आलं तसं गेलंही. अडीच वर्षांनंतर भाऊसाहेबांशी झालेल्या मतभेदानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे मोठं राजकारण घडलं. पाच वर्षं झाली तशी आमदारकीही संपली होती. याच आमदारकीपायी कॉलेजातल्या नोकरीचाही राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे ते बेकारच होते.

हेही वाचाः खूशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना २८ टक्के डीए लागू

दोन वर्षांची खासदारकी

तेवढ्यात १९७४ ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड इथं कॉलेजचे प्राचार्य बनण्याचा प्रस्ताव आला. तिथं जाऊन त्यांनी एक आदर्श कॉलेज उभारलं. पण पुन्हा मातृभूमीनं हाक दिली. १९८२ ला ते म्हापशाच्या बांदेकर कॉलेजाचे प्राचार्य बनले. त्यात पुन्हा अनपेक्षितपणे राजकारणात ओढले गेले.

१९८९ ला ते उत्तर गोव्यातून खासदार बनले. पण ती नववी लोकसभा फार काळ टिकली नाही. त्यांचा खासदार म्हणून कार्यकाळ कसाबसा दोन वर्षांचा होता. या काळात अनेक लोक त्यांनी जोडले. जनतेची सेवा केली. खूप प्रवास केला.

हेही वाचाः तुयेतील ‘ती’ घरं ९० वर्षानंतर आज होणार प्रकाशमान

ज्ञानेश्वरी जगण्याचा आधार बनली

सर राजकारणात राहिले. पण त्यात अडकले नाहीत. मोठमोठी पदं भूषवली, पण ती तितक्याच निर्लेपपणे सोडलीही. हे शक्य झालं याचं श्रेय ते त्यांच्या आध्यात्मिक पार्श्वभूमीला देतात.

‘लहानपणी आमच्या चाळीच्या गॅलरीत भजनं होत असत. मी ती मनापासून ऐकायचो. आमच्याच त्या गॅलरीत रेडी गावावरून आलेला अवधूत पाटकर नावाचा वारकरी काही दिवस राहायला होता. त्याच्याकडे मी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी पाहिली. ती वाचली आणि मी तिच्यात अडकलो. पुढे तो माझ्या अभ्यासाचा विषय बनला आणि व्याख्यानांचाही.’

ज्ञानेश्वरीवरची सरांची रसाळ व्याख्यानं फक्त गोव्यातच नाहीत तर महाराष्ट्रातही आकर्षणाचा विषय बनली होती. त्यांच्या व्याख्यानांची पुस्तकं आली. ऑडियो कॅसेट निघाल्या. त्यासाठी त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. आजही ज्ञानेश्वरी त्यांच्या जगण्याचा आधार आहे.

खासगी आयुष्यात अनेक चढउतार पचवून आजही ते नवनवे प्रकल्प हाती घेत आहेत. अजूनही त्यांची व्याख्यानं सुरू आहेत. तरुणांना मार्गदर्शन करण्याचं व्रत सुरू आहे. एक समृद्ध आयुष्य जगण्याचं समाधान ते अनुभवत आहेत.

सचिन परब

(सौजन्य कोलाज)

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!