वाहून गेलेल्या रस्त्याची वर्षपूर्ती! पेडणेकरांनो विसरलात तर नाही ना?

वर्ष झालं, हायवेचं काम कुठपर्यंत आलं

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

मुंबई गोवा महामार्ग. माझ्या आवडीच्या मार्गांपैकी एक. वर्षभरापूर्वी गोव्यात येण्यासाठी जेव्हा निघालो होतो, तेव्हा पत्रादेवीपर्यंतचा प्रवास अत्यंत सुखकर झाला होता. मागच्या चार एक वर्षात गोव्यात येणं झालं नव्हतं. त्यामुळे गोव्यातील रस्त्याची अवस्था कशी असेल, याबाबत काहीच कल्पना नव्हती. सकाळी पाच-साडे पाच वाजता पनवेल सोडलं होतं. दिवसभर गाडी चालवून थकवा आला होता. अंधार होण्याआधी काही करुन गोव्यात प्रवेश करायचं, हे मनाशी पक्क केलं होतं. त्याप्रमाणे एक्सलरेटवर जोर देणं अधूनमधून सुरु राहिलं.

13 जुलै 2020 रोजी पडलेला खड्डा!

तोंडावर आपटलो

दिवस पावसाचे होते. मध्ये-मध्ये पावसामुळे वेग कमी होतच होता. संध्याकाळी ५, साडे पाच वाजताच्या सुमारास गोव्यात शिरलो. पत्रादेवी चेकपोस्ट पार करुन जसजसा पुढे येऊ लागलो, तसंतसं इतका वैताग आला गाडी चालवण्याचा की काही विचारु नका. गोव्यातला रस्ता महाराष्ट्रापेक्षा जास्त चांगलाय, असं गाडीत बायकोला सांगितलं होतं. पण गोव्यात सुरु ज्या कंत्राटदाराकडून हायवेचं काम सुरु आहे, त्याने बायकोसमोर अगदी तोंडावर पाडवलं मला.

अपेक्षाभंग!

वर्षभरापूर्वी गोव्यात येत असताना रस्ता इतका वाईट असेल, याची कल्पना नव्हतीच. पत्रादेवीपासून जसजसे पुढे येत गेलो, तसतसा रस्ता आणखीनच खराब होत गेला. त्यात अंधार पडू लागला. गाडीचा वेग आणखी कमी झाला. खड्ड्यांचा अंदाज येईना. डायव्हर्जनमुळे आणखीनंच गडबडून जायला होत होतं. तळपायाची आग मस्तकात जाऊ लागली. मुंबईच्या ट्रॅफिकमधून बाहेर पडल्यानंतर इतर ठिकाणी ट्रॅफिकलेस ड्रायव्हिंगचा आनंद घ्यायला अनेक जण मुंबई गोवा प्रवास करतात. मी देखील त्यापैकी एकच. पण यावेळी अपेक्षाभंग झाला.

रस्ता मोठा होतोय आणि पोकळही!

कसेबसे रात्री उशिरा हळूहळू पणजीत पोहोचलो. त्यानंतर गोव्यात सुरु असलेल्या या हायवेच्या कामाबद्दलच्या एक एक गोष्टी ज्या डोळ्यांसमोर आल्या त्या अत्यंत विदारक होत्या. मुंबई गोवा हायवे हा निसर्गानं संपन्न आणि नटलेला असा देखणा मार्ग. वळणवळणाचे नागमोडी रस्ते, चढ उतार, घाट, आजुबाजूला हिरवाई, कौलारु घरं, रस्त्यालगत असणारी मंदिरं असं सगळंकाही या मार्गावरुन प्रवास करताना डोळ्यांनी सुखावून जायचं. पण आता या मार्गावरुन प्रवास करताना फार वाईट वाटतं. रस्ते मोठे होत आहेत. पण पोकळ होत आहे, हे लवकरच समोर आलं.

हेही वाचा : इतका वेळ का लागतोय? हायकोर्टानं मुंबई-गोवा हायवेच्या कामावरुन केंद्राला सुनावलं

नकोशी वर्षपूर्ती

भारतीयांची स्मृती फार चांगली नाहीये, असा एका उपहासात्मक टोला नेहमीच हाणला जातो. पण पेडणेकरांना सगळं लक्षात राहतं. पेडणेकर म्हणजे हुशार आणि कधीच कुठली गोष्ट न विसरणारे म्हणून ओळखले जातात ते उगाच नाही. गोवन वार्ता लाईव्हचे संपादक किशोर नाईक गावकर यांनी १३ जुलैला लिहिलेली पोस्ट फेसबुकवर अचानक समोर आली. रस्ता वाहून गेल्याच्या घटनेला वर्ष झाल्याची आठवणही तिनंच करुन दिली. वाहून गेलेल्या या रस्त्याचे फोटो पाहिले की आजही अंगावर काटा येतो. हा दिवस पोरस्कडे आणि आजूबाजूच्या गावातील लोकं कधीच विसरु शकत नाहीत.

हेही वाचा : एमव्हीआरला बसणार 28 कोटींचा फटका

या घटनेला आज वर्ष पूर्ण झालं. मधल्या काळात गोवनवार्ता लाईव्हनं या हायवेवर तासाभराचा एक सविस्तर रिपोर्टही केला होता. त्यावेळी या हायवेच्या कामातील सावळा गोंधळ समोर आला होता. रस्त्यांना पडलेल्या भेगा, बांधकामातील त्रुटी यावरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न झाला.

पाहा व्हिडीओ –

खरंतर आता या मार्गावरुन प्रवास करणं आणखीनंच धोकादायक बनलंय. या मार्गावर बनवण्यात आलेले छोटे फ्लायओव्हर लॉक तोडून बाहेर आलेत. रस्त्यांवर अजूनही खड्डे जसेच्या तसे आहेतच. हायवेचं काम ज्या गतीनं सुरु आहे, त्यावरुनही टीका, आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. लोकांच्या जिवाशी खेळ कसा केला जातो, याचं उत्तम उदाहरण मुंबई गोवा महामार्गावरुन विशेषतः पणजी ते पत्रादेवी प्रवास केल्यावर लगेचच येईल.

हेही वाचा : पत्रादेवी ते कोलवाळ पूलापर्यंतचा रस्ता अत्यंत धोकादायक

भाबडी आशा

पोरस्कडेजवळचा १०० मीटर रस्त्याचा अर्धा भाग पावसामुळे नदीत वाहून गेला होता. या घटनेला वर्ष पूर्ण झालं. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण वर्षपूर्तीच्या निमित्तानं आता एक गोष्ट ठळकपणे जाणवू लागली आहे. पत्रादेवीपासून पणजी शहरात आणणार हा हायवे येत्या काळात अनेक अर्थांनी वादाच्या भोवऱ्यात सापडण्याचीच जास्त शक्यता आहे. बांधकाम जेव्हा केव्हा पूर्ण व्हायचं तेव्हा ते देवाच्या कृपेनं होईल, अशीच भाबडी आशा या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांमध्ये आहे. पण जेव्हा हे काम पूर्ण होईल, तेव्हा पायाखालून जशी जमीन सरकते, तसा रस्ता सरकला नाही, म्हणजे मिळवलं!

हेही वाचा : BABU AZGAONKAR | सेकंड हॅन्ड गाड्या एमव्हीआरकडून गिफ्ट दिल्या गेल्या?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!