बाबा

Goan Varta Live | प्रतिनिधी
डॉ. रुपेश पाटकर
काही माणसं अशी असतात की, त्यांचा प्रभाव आयुष्यभर उरतो. माझ्या जीवनावरदेखील अशाच एका व्यक्तीचा प्रभाव आहे. जिला जाऊन आज 14 वर्षे लोटलीत. चौदा वर्षांपूर्वी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी ते गेले; पण त्यांच्याकडून शिकलेल्या गोष्टी माझ्या मनावर दगडासारख्या कोरल्या गेल्या आहेत. माझ्यात ज्या काही चांगल्या आणि वाईट, दोन्ही प्रकारच्या गोष्टी आहेत, त्या त्यांच्यामुळेच! ही प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणजे माझे बाबा. मी अनेकदा हा विचार करतो की माझ्या व्यक्तिमत्वावर ते कसा काय प्रभाव टाकू शकले?
माझे बाबा शेतकरी होते. आमची बागायती होती. आमच्याकडे अनेक मजूर कामाला असत. त्या मजुरांसोबत बाबादेखील काम करत. पावसाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्यावेळी चिखलाने माखलेल्या कपड्यातील बाबा मला अजून स्पष्ट आठवतात. ते स्वतः नांगरणी चिखलणी करत. मागच्या दारी आंघोळ करून ते घरात येत. त्यानंतर मला घेऊन बसत. अंक, पाढे, श्लोक वगैरे नेहमी असे. रात्री झोपताना कुशीत घेऊन ते मला गोष्ट सांगत. मी पाच वर्षांचा असताना रोज थोडी थोडी रामायणाची गोष्ट ते मला ऐकवत. सकाळी पुन्हा शेतात जाताना ते मला अनेकदा शाळेत सोडत. आम्ही त्यावेळी राहत असलेल्या घरापासून आमचे शेत दोन अडीच किलोमीटरवर होते. बाबा सकाळी सायकलने जात. दुपारी एकच्या सुमारास जेवायला येत. जेवणानंतर वामकुक्षी घेऊन अडीच पावणेतीनला पुन्हा शेतात जायला निघत, ते काळोख पडल्यानंतरच परतत. दिवसभर ते बाहेर असत, पण संध्याकाळचा वेळ त्यांनी मला दिला नाही, असे कधीच घडले नाही.
बाबांमुळेच गणित झालं पक्कं…
मी शाळेत जाऊ लागल्यानंतर ‘आज शाळेत काय शिकवले?’ हा त्यांचा संध्याकाळच्या आमच्या भेटीतला पहिला प्रश्न असे. मग उड्या मारत किंवा खिडकीवर चढून मी त्यांना काय शिकवले ते सांगे. कधी ते मला एखाद्या कवितेची चाल लावून देत, तर कधी इतिहासाच्या पुस्तकात नसलेली जास्त माहिती देत. अभ्यासाच्या बाबतीत त्यांच्यात आणि माझ्यात एका विषयाच्या बाबतीत टोकाचे मतभेद होते. मतभेद कसले, त्याबाबतीत ते एकतर्फी हुकूमशहा होते. तिथे त्यांची सारी माया, प्रेम, कनवाळूपणा अदृश्य होई. तो विषय म्हणजे गणित. ‘गणित’ मला जमत नव्हते अशातला भाग नव्हता; पण तो विषय मला आवडत नसे. साधी गुणाकार- भागाकाराची उदाहरणे सोडवायची म्हटली तरी डोके भणभणायला लागे, इतका तिटकारा. तर ‘गणित’ हा बाबांचा आवडीचा विषय. त्याहीपुढे म्हणजे ज्याचे गणित चांगले तो विद्वान असा चुकीचा समज त्यांना होता. त्यात होई असे की नावडता विषय असल्यामुळे मी नाराजीने तो हातात घेई. नाराजी असल्यामुळे चूका वाढत आणि मग बाबांचा ओरडा खावा लागे. पण त्यांनी चिकाटी सोडली नाही, त्यामुळे दहावीत मला दीडशेपैकी एकशे अडतीस गुण गणितात मिळाले. पण त्यावर बाबांचा यक्षप्रश्न होताच, ‘बारा गुण का कमी पडले?’
त्यांच्यामुळे माझ्या शैक्षणिक वर्तनात घडलेली दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या हस्ताक्षरात घडलेली सुधारणा. रोज पाच ओळी शुद्धलेखन काढून घेऊन त्यांनी माझे हस्ताक्षर सुधारून घेतले. लोक आश्चर्याने विचारतात, ‘तुम्ही खरेच डॉक्टर आहात ना? डॉक्टरच अक्षर इतकं चांगलं पाहिलं नाही’.
चिकित्सक आणि अभ्यासू…
माझे वडील शेतकरी असले तरी ते फार चिकित्सक आणि अभ्यासू होते. त्यांनी शेती विज्ञानातील कोणतीही औपचारिक पदवी घेतली नव्हती, पण ते स्वयंअध्ययनाने त्यातले तज्ज्ञ बनले होते. त्यांचे अध्ययन इतके चाले की बाबा हा शब्द उच्चारताच माझ्या डोळ्यांसमोर बाकड्यावर बसून पुस्तक वाचणारे बाबा उभे राहतात.
शेतीबाबत त्यांच्यापुढ्यात कोणताही प्रश्न उभा राहिला की त्यांचा अभ्यास सुरू होई. मग ते अनेक पुस्तके धुंडाळत, त्यासाठी रात्री उशीरापर्यंत जागत, विद्यापीठाच्या किंवा कृषी संशोधन केंद्राच्या तज्ज्ञांशी पत्रव्यवहार करत आणि या प्रक्रियेतुन मिळालेल्या उत्तरांचा ते प्रयोग करून पाहत आणि या सगळ्या प्रक्रियेबाबत त्यांची माझ्याशी आणि आईशी चर्चा सुरू असे.
व्यसनांचा होता तिटकारा
त्यांना दारू, सिगरेट, जुगार वगैरे व्यसनांचा कमालीचा तिटकारा होता. त्यांचे काही जवळचे नातेवाईक हे सोशल ड्रिंकर होते. त्यांच्या या वर्तनाचा बाबांना भयंकर राग येई. दारूविषयीचा त्यांचा राग इतका टोकाचा होता की शिमग्याच्या सणात प्रामुख्याने दारू प्यायली जाते म्हणून तमोगुण पसरवणारा हा सण बंद केला पाहिजे, असे ते म्हणत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांनी दारूविषयी आणि इतर व्यसनांविषयी व्यक्त केलेल्या तिटकाऱ्यामुळे मी आयुष्यात या गोष्टी कधी करू धजावलो नाही.
अन्न वाया न घालविण्याचे संस्कार
एकदा लहान असताना मी ताटात भात टाकला. बाबा म्हणाले, ‘अन्न फुकट घालवणं हे पाप आहे.’
‘पण बाबा, मला तो नको आहे. आणि आपल्याकडे तर खूप आहे. त्यातला एवढासा भात फुकट गेला तर काय झालं?’, मी म्हणालो.
बाबा त्यावर संतापले,’भात रुजवून काढायला खूप कष्ट पडतात. ते कष्ट तू केलेस का? दुसऱ्याने केलेले कष्ट असे उधळण्याचा तुला काय अधिकार? तुला हे सर्व मिळतंय म्हणून तू फेकून देतोस. पण आपल्या देशात असंख्य मुलं अशी आहेत, ज्यांना एकवेळदेखील पुरेसं अन्न मिळत नाही.’
आज जेव्हा मला कोणी ताटात वाढलेलं अन्न फुकट घालवताना दिसतं तेव्हा मला बाबांसारखाच राग येतो.
त्यांनी माझ्या शिक्षणाची खूप काळजी घेतली. पण ही काळजी घेत असताना ते नेहमीच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हे सांगत राहिले की ‘तू आम्हाला पोसावस, बंगला-गाडी घ्यावीस, पैसा-अडका मिळवावास म्हणून मी तुला शिक्षण देत नाही. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजात असंख्य वंचित आहेत, त्यांची तुझ्याकडून सेवा घडावी म्हणून तुला शिकवतोय. मी जीवंत असेपर्यंत मीच तुझा उदरनिर्वाह चालवेन.’ चौदा वर्षांपूर्वी ते जाईपर्यंत मला मिळकतीचा विचार करण्याची गरज पडली नाही!