आई एक चळवळ…

भुकेलेल्यांसाठी अन्नपूर्णा, उन्हात वावरणाऱ्यांसाठी सावली

राजेंद्र केरकर | प्रतिनिधी

केरी-सत्तरीः अंतिम विधी केल्यानंतर चितेवरती आईचा जळणारा मृतदेह मानवी जीवनाच्या नश्वरतेची प्रचिती देत होता. कारुण्यसिंधू आईचा मृत्यू माझ्यासाठी यातनादायी होता. तीन मुली आणि एकुलता एक मुलगा यांच्या पालनपोषण आणि शालेय शिक्षणाची जबाबदारी पेलताना वडिलांच्या तुटपुंज्या पगारावरती गुजराण करणं त्याकाळी बरंच प्रतिकूल होतं. आपल्या चारही मुलांचं वर्तमान आणि भवितव्य सुदृढ व्हावं म्हणून तिची धडपड अखंड होती. सहा जणांच्या कुटुंबाचा भार त्याकाळी प्राप्त होणाऱ्या सरकारी पगारातून सहन करणं आवाक्याबाहेर असताना, तिचा संघर्ष अविरतपणे चालू होता.

हेही वाचाः गोवा किनारी विभाग व्यवस्थापन जनसुनावणीच्या वेळी लोकशाहीचा खून

डिचोलीतील साळ गावात तिचं बालपण दारिद्ऱ्याशी झुंज देत व्यतित झालं. न कळत्या वयात पितृछत्र हरवल्याकारणानं कष्टाची कामं करून आपल्या आईला संसाराचा रहाटगाडा चालवण्यास मदत करावी लागली. लग्न झाल्यावरही जगण्यासाठीचा हा संघर्ष आणखी तीव्रपणे करावा लागला. आपल्या थोरल्या बहिणीच्या घरी कामाला असलेल्या एका बेघर व्यक्तीशी संसार करताना तिला पदोपदी चिवटपणे झुंज द्यावी लागली. डिचोलीतील झांट्ये काजू कारखान्यातही कष्टाचं काम करावं लागलं. अशा परिस्थितीतसुद्धा ती किंचित डगमगली नाही.

हेही वाचाः नारायण राणेंचं खातं ईडी, सीबीआयचाही बाप आहे !

डिचोली – पाजवाडाहून कालांतराने जेव्हा सत्तरीतील वाघेरी – बोलेरी डोंगरांच्या सावलीतल्या वडिलोपार्जित केरी गावात राहायला आल्यानंतर काटकसर करून वडिलांना स्वत:चं घर घोटेलीत उभं करता यावं म्हणून ती अपरिमितपणे धडपडली. वडिलांप्रमाणे आई निरक्षर असूनही आपली चारही मुलं शिकावी यासाठी रात्र रात्र जागून शिवणकामाची जबाबदारी स्वीकारली. शिवण कामातून होणाऱ्या अर्थार्जनावरती आपल्या संसाराचा डगमगता डोलारा तिने सांभाळला.

हेही वाचाः भाजप सरकारकडून सर्वसामान्यांची लूट; गेल्या सहा वर्षांत 300 टक्के लुटमार

आपला मुलगा डॉक्टर – इंजिनिअर व्हावा असं प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं. दहावी इयत्तेत विज्ञानासारख्या विषयात नेत्रदीपक गुण प्राप्त केल्यानं आपल्या मुलाने अकरावीत विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन डॉक्टर इंजिनिअरचं शिक्षण घ्यावं असं तिला वाटायचं. परंतु मला कला शाखेत प्रवेश घेऊन भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याची महत्त्वाकांक्षा होती. त्यामुळे मी जेव्हा कला शाखेत प्रवेश घेण्याबाबत आग्रह धरला, तेव्हा तिने आढेवेढे न घेता मला कोणतीच आडकाठी आणली नाही. कालांतराने पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर काहीकाळ पत्रकारिता करून हायर सेकंडरीत विद्यादानाचा पेशा पत्करल्यावरही तिने कोणत्याच स्वरूपाची हरकत घेतली नाही. तिचा भाऊ भारतीय नौदलात विक्रांत युद्धनौकेवर असल्यानं भारत – पाकिस्तान युद्धात सहभागी होता. तर माझे वडील गोवा लिबरेशन आर्मीद्वारे गोवा मुक्ती संग्रामात सक्रिय असल्यानं तिच्यात उपजतच असलेल्या राष्ट्रीय बाण्यामुळे देव, देशाविषयी संस्कारांचे बाळकडू मला प्राप्त झालं. जेव्हा सत्तरीतल्या ग्रामीण भागात अंधश्रद्धा, बुवाबाजी, जुगार, मद्यपान, अमली पदार्थ सेवन यांच्याविरुद्ध चळवळ सुरू केली तेव्हा निर्माण झालेल्या कटुता दूर करण्यासाठी, त्याचप्रमाणे अराजक प्रवृत्तींच्या विरोधात लढण्यासाठी मला मोठं पाठबळ दिलं. हाती घेतलेल्या कामामुळे निर्माण झालेल्या लोक प्रक्षोभाचा सामना निर्भयपणे करण्यात तिने वेळोवेळी दिलेली आत्मशक्ती आणि ऊर्जा प्रतिकूल परिस्थितीत दिलासादायक ठरली होती. इतिहास, समाजशास्त्र ज्ञानशाखांच्या अध्ययनामुळे माझ्यात निर्माण झालेली इतिहास, पुरातत्त्व संशोधनाची आवड आणि सामाजिक कार्य करण्याबाबत ऊर्मी प्रज्वलित करण्यात एका निरक्षर मातेची धडपड माझ्यासाठी पोषक ठरली. त्यामुळे मी पेडणे ते काणकोणपर्यंतच्या गावोगावी पायाला भिंगरी बांधल्यागत भटकंती करून माझ्यातली ज्ञानतृष्णा भागवू शकलो. तिच्या प्रोत्साहनामुळे जीवनातल्या महन्मंगल आणि दिव्यत्वाचा वेध घेण्याची माझी धडपड सफल ठरली.

हेही वाचाः JOB ALERT | जीएमसीमध्ये नोकरीच्या संधी; लगेच अर्ज करा

विद्यार्थिदशेपासून आमचं घर हे ग्रामीण भागातल्या गरजू आणि उपेक्षितांना तिच्या वात्सल्यसिंधू व्यक्तित्वामुळे आल्हाददायक असा आधारवड ठरलं आणि त्यामुळे काहीजणांची ती अन्नपूर्णाच झाली.  ज्या समाजात माझं बालपण गेलं तिथे पदोपदी जातीयतेचं प्राबल्य असल्यानं अस्पृश्यता हा मानवतेला लागलेला भयानक कलंक असताना त्याचं पालन करणं म्हणजे गावगाडा सुरळीत ठेवणं अशी मानसिकता पाहायला मिळते. अशा वातावरणात ग्रामीण भागात सामाजिक समरसतेचं पालन हे एक दिवास्वप्न ठरतं. परंतु असं असताना आपल्या पुत्राच्या शब्दांखातर, त्याच्या आत्मसन्मानाला किंचितही ठेच लागू नये म्हणून या मातेनं पायतळी अंगारही हसत हसत सहन केले. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे एका छोटेखानी कुटुंबाचं रूपांतर विशाल कुटुंबात झालं. तिच्या मायेच्या शीतल छायेत असंख्य विद्यार्थी आले आणि एक अक्षर ओळख नसलेली स्त्री त्यांच्यासाठी जीवन शिक्षण देणारी उत्साही आणि शिस्तप्रिय शिक्षिकाही झाली. त्यामुळे तिच्या छत्रछायेखाली होऊन गेलेले विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या प्राप्तीबरोबरच जीवनात उत्तुंग भरारी घेण्यात सफल ठरले. 

हेही वाचाः ओबीसी समाजातील 27 मंत्र्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान

आपल्या एकुलत्या एका मुलाने शिक्षण घेतल्यानंतर नोकरी पत्करून घर संसार थाटावा अशी स्वाभाविक इच्छा तिने बाळगली असली तरी, जेव्हा आपल्या मुलाचा संसार बंदिस्त चौकटींचं उल्लंघन करून विस्तारू लागला तेव्हा त्याच्या मार्गात अडथळा येऊ नये, त्याने पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता व्हावी यासाठी तिने नित्य धडपड केली. आणि त्या चळवळीचा ऊर्जा स्रोत बनली. सामाजिक, सांस्कृतिक, पऱ्यावरणीय चळवळीनिमित्त रात्री-बेरात्री येणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांची ती अन्नदात्री झाली. त्यांच्या खडतर जीवनात आनंदाचे उत्साहाचे क्षण निर्माण करण्यात तिची माया ममता कारणीभूत ठरली. साठ सत्तर कार्यकर्त्यांच्या खाणाजेवणाची व्यवस्था करताना ती कधीच थकली भागली नाही. तर उलट दुप्पट उत्साहाने कार्यप्रवण व्हायची. त्यामुळे सर्वार्थाने त्यांच्यासाठी ती माउलीचं रूप ठरली.

हेही वाचाः देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट, कोरोनाबळी मात्र वाढले

गोव्याच्या जलसुरक्षा संदर्भात आणि नैसर्गिक प्राणवायूची अक्षय कोठारे ठरणाऱ्या जंगलांना कायमस्वरूपी सुरक्षाकवच लाभावं म्हणून आपल्या मुलाने आरंभलेला लढा त्याच्यावरती ना-ना संकटे आमंत्रित करण्यास कारणीभूत ठरलेला असताना तिने ध्यानीमनी नसताना त्याचं समर्थन केलं. शिवीगाळ, अपशब्द ऐकून कधी ती डगमगली नाही, की मुलाच्या यशाने हुरळून गेली नाही. आपल्या मुलाने जो मार्ग पत्करला तो जरी काटेरी आणि पदोपदी रक्तबंबाळ करणारा असला तरी तो सत्याचा आहे यावर तिची अढळ श्रद्धा आणि विश्वास होता. आणि त्यामुळे त्याच्या वाट्याला आलेली अवहेलना व्याप तापाची झळ सहन करावी लागली म्हणून कधी कुरकुर केली नाही की, मार्गातला धोंडा बनली नाही. या उलट प्रत्येक वेळी भरभक्कम आधार व होऊन भयानक अशा वादळवाऱ्यात अभंग राहिली आणि शीतल छाया अखंडपणे प्रदीर्घ काळ देत राहिली. पैशाची श्रीमंती, बडेजाव मिरवण्याऐवजी मुलाने निर्माण केलेला लोकसंग्रह तिने संपन्न, समृद्ध केला. भुकेलेल्यांसाठी अन्नपूर्णा बनली, उन्हात वारा वावरणाऱ्यांसाठी सावली झाली आणि त्यामुळे शरीरात बळ असेपर्यंत न थांबणारी, न थकणारी एक चळवळ म्हणून जीवन जगत राहिली.

(सौजन्यः गोवन वार्ता)

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!